'क्यासु'

ऋतुगंध ग्रीष्म वर्ष १३ अंक २

हा शब्द १९९१ मध्ये सिंगापूरला आल्यावर समजला. मी अभियांत्रिकी विभागात होतो. माझ्या कामामुळे कंपनीचे नुकसान होऊ नये व कंपनीने आपल्याला या परदेशात काही भरवसा ठेऊन भारतातून पाठवले आहे तर आपली इमेज बिघडू नये म्हणून मी जरा जास्तच काळजी घेत असे. कामाचे तास संपले तरी जास्त वेळ थांबून परत परत केलेल्या कामाची खात्री करत असे. सायरन झाला की माझ्याकडे बघत, हसत हसत इथली लोकल चा...... व म....... मंडळी घरी निघून जायची. त्यांच्या कडूनच माझ्याकरता ' क्यासु ' हा शब्द ऐकला व समजला. सुरवातीला ही थट्टा कि कौतुक हेही समजत नव्हतं.

मग जसा मी इथल्या मातीत मुरू लागलो तेंव्हा याचा अर्थ कळायला लागला.

'क्यासु' चे अर्थ मित्र मंडळींनी अनेक सांगितले. कोणी म्हणे 'घाबरट', तर कोणी 'कंजूष', कोणी म्हणे, फारच पर्टिक्युलर आहे. पण त्याचा जास्तीत जास्त जवळचा व खरा अर्थ म्हणजे ' गमावण्याची भिती ' 

हॉस्पिटलच्या ICU भागाच्या बाहेर बरीच माणसे जमली होती. ठेवलेल्या बाकांवर कोणीच बसले नव्हते. उगीचच प्रत्येक जण इकडून तिकडे येरझा-या घालत होते. कोणीही पांढरा कोट घालून व गळ्यात स्थेतोस्कोप घालून आला किंवा एखादी नर्स आतून बाहेर आली की काहीतरी समजेल या आशेने प्रत्येक जण थोडी पावले त्यांच्या मागे मागे करत. मग ते जुजबी उत्तर देत व आपापल्या कामाला आत निघून जात होते. बाहेर एक छोटेसे मंदिर होते. मधून मधून तिथे जाऊन मंडळी नमस्कार करत होती....... 

शाळेचं आवार जिथे रोज सकाळी ८ वाजल्या नंतर मुले यायला लागतात. आज पहाटे ४ पासून लोकं यायला लागली. बाजूच्या घरातून एकेक जण डोकावून पाहू लागला. कसला आवाज येतोय? कोण या वेळी शाळेपाशी आलंय ? बाल विभागात प्रवेश मिळवण्याचे फॉर्म्स सकाळी ९ वाजता मिळायला लागणार होते. पहाटे चार पासून पालक गेटच्या बाहेर वर्तमानपत्र, चादरी व चटई टाकून रांगेत बसू लागले. कारण फक्त शंभर फॉर्म्स देणार होते म्हणे.... .

सकाळी अलार्म वाजल्यावर जाग आली, दात घासत असताना परत अलार्म वाजला. तशी त्याची सवयच होती , 'स्नूज' रिपीट अलार्म लावायची. भरवसा नाही, जाग नाही आली तर? दात घासून बाहेर आला. तोंड पुसलं. परत एकदा आत जाऊन पहिले, नळ उघडा तर नाही ना राहिला ? तयार झाल्यावर कुलूप लावले व जिन्यापर्यंत गेला. परत आत जाऊन एकदा दार उघडून सगळे नळ व दिवे बंद असल्याचे तपासले. लिफ्टने खाली आल्यावर काय वाटले कोणास ठाऊक. पुन्हा एकदा वर जाऊन कुलूप लावले की नाही हे ओढून पहिले..... 

नवरा नेहमी प्रमाणे उशिरा घरी आला. हूश असा आवाज करत टाय थोडा लूज केला. 'आज बराच उशीर?' असे म्हणत हातातली बॅग घेताना थोडे जवळ जाऊन कपड्याला वेगळ्या अत्तराचा वास नाही ना, हे पत्नीने सहजच तपासले. ' मीटिंग होती वाटते?' एक सहज सरळ टाकलेला चेंडू ' कोण कोण होतं मीटिंग मध्ये?' चेंडूला थोडी गती दिली गेली ' मागच्या तुमच्या कंपनीच्या पार्टीला ती ... ,ती थोडी औट झाली होती बघा ,ती आहे का हो कंपनीत?' चेंडूला थोडा स्विंग ही मिळाला...... 

एकदा मी एका चा...... कुटुंबाला भाड्याकरता घर दाखवत होतो. घर फारच छान होतं. घर उंचावर होतं, हवेशीर होतं. सर्व त्यांना हवे तसे होते. त्यांना आवडले एकदम. मला तर वाटलं चला झालं हे डील सेटल झाले. त्यांनी (टेनन्टने) विचारले ओनर चा...... ऑर म ...... मी म्हटले, 'नो, नो. इट्स इं........ ' ते दोघे थोडा वेळ त्याच्या भाषेत एकमेकांशी बोलले व म्हणाले, सॉरी, आम्ही हे घर घेऊ शकत नाही. मी म्हटले 'का बर? व्हाय व्हाय? ओनर कॅन गिव्ह माइक्रोव्हेव , फॅन ...' तर ते म्हटले , नॉट लाइक दॅट ब्रो , युवर इं ........ एलिफंट गॉड अँड मंकी गॉड व्हेरी पॉवर फुल. दे विल सप्रेस्स आवर गॉड .... लेटर ऑन लॉट ऑफ ट्रॉबल .... ' 

आमचे एक ओळखीचे कुटुंब सिंगापूर सोडून चालले होते... दोघेच राहत होते. म्हणाले ' सामान खूप होतंय , पहा कोणाला देता येत असेल तर' आम्ही त्यांच्या कडे गेलो. त्यांनी दिवाणखान्यात सर्व मांडून ठेवलेलं होतं. अनेक प्रकारची क्रोकरी, मोठी भांडी, मुलांचे खेळ. कपडे, मुस्तफातून आणलेल्या तीन ते पाच किलोच्या धान्याच्या , आट्याच्या पिशव्या. व यातलं बरंचसं ओपन सुध्दा न केलेले. आम्ही विचारलं ' अरे मित्रा , हे काय आहे. इतकं कशाला जमवलंयस?' त्याने उत्तर दिले ' काही नाही रे, इथे सिंगापूरला बरेच वेळा, क्लियरन्स सेल व ऑफर्स असतात ना. तेव्हां घेतले, त्यामुळे थोडेफार जमलंय... आता समजलं सिंगापूरची इकॉनॉमी टॉपला का आहे ते ......वर्षभर फेस्टिव्हल ऑफर्स 

आपल्याला एक माहिती आहे की जिथे कमी उपलब्धता आहे, शाश्वती नाही तिथे माणूसच काय , प्राणी व पक्षी सुद्धा झुंबड लावतो , गर्दी करतो. आपल्याला मिळेल की नाही म्हणून घाबरून असतो व त्याची त्याला इतकी सवय लागते की रोजच्या रुटीन मधेही मनात 'क्यासु' पद्धतीची भीती घेऊन जगतो, धडपडतो.

डॉकटर व पेशन्ट यांच्या जीवाची जितकी घालमेल होत नाही त्या पेक्षा वेटिंग रुम मधल्या नातेवाइकांची होते. शाळेपाशी पहाटे चार वाजता उभं राहिलेल्या पालकानाही नऊ वाजतां फॉर्म्स हातात मिळेपर्यंत धडधडतच असते. रोज बाहेर जाताना जर न चुकता कुलूप लागते तर मग ते लावले की नाही परत एकदा का ओढून पाहावेसे वाटते. नव-याच्या शर्टावर आज लाल डाग तर दिसणार नाही ना? असे रोज का वाटते? .... घरात सगळं भरलेलं असूनही ऑफरच्या किंमतीत परत वस्तू मिळणारच नाही असे का वाटते?... "देव अस्तित्वात आहे की नाही ते माहिती नाही पण असेल तर तो चांगला आहे, रक्षण कर्ता आहे, भलं करणारा आहे, हे माहित असूनही पुरातन काळापासून त्याच्या नावाखाली किती जणांना या देवाने 'क्यासु' केले आहे.

पण एक मात्र खरं की या 'क्यासु' पणाला तसे पाहिले तर मार्किंग नाही, की इतकं केलं तर ठीक ' सेफ' आहे, थोडे जास्त केले तर याची काही गरज नव्हती व त्या पेक्षा जास्त 'क्यासु' गिरी तर शुद्ध वेडेपणा. हे कोण ठरवणार? त्यामुळे 'क्यासु' गिरी नाहीशी होण्याची तरी भीती नाही. 

या वेळी ऋतुगंधला 'भीती ' ही संकल्पना आहे. मला माहिती नाही. 'क्यासु ' हा टॉपिक या थीमला योग्य आहे की नाही? लेख पाठवू की नको?. वाचकांना आवडेल की नाही? आपलं हसू होईल का ?. असे अनेक विचार मनात आले व हा लेख पाठवायला नको असा मनात विचार आला. पण तरी पाठवलाच, कारण तुम्ही लोक लेखकाला 'क्यासु ' म्हणून मोकळे झाला असता ..... 

- श्रीरंग केळकर


1 टिप्पणी: