गोंदण

ऋतुगंध वसंत वर्ष १३ अंक १

मानवी मनात भावनांचे अनेक तरंग उमटत असतात. कधी आसपासचा निसर्ग, माणसे,घटना,वस्तू ह्या कारण असतात तर कधी आठवणी! हे तरंग शब्दांत उतरवता येतील का, ह्याचाच ध्यास प्रत्येक लिहू पाहणाऱ्याला असतो. कधी ते जमल्या सारखे वाटते, तर कधी शब्दांत उतरेपर्यंत भावनांनी वेगळेच वळण घेतलेले असते. ह्या भावनांविषयी, त्या निमित्ताने स्वतःशी होणाऱ्या संवादाविषयी वृंदा टिळक लिहिणार आहेत,आपल्या 'स्वगत' ह्या सदरात. 
----–----–----------------------------

ज्याला प्रत्येक गोष्टीत मन गुंतवून जगायची सवय, त्याच्या कपाळावर हुरहुरीचे गोंदण जन्मजातच असते. एके ठिकाणहून दुसरीकडे जाताना नव्याची उत्सुकता असते, तर जुन्याच्या वियोगाची हुरहूर असते. स्वप्ने नक्षत्रांची पडत असली तरी पायांना असलेली मातीची ओढ सरत नाही. सतत दुसऱ्या वाटा ,दुज्या गावचा वारा खुणावत असतोच. 

ज्यांची लेकरे परदेशात त्यांना असा अनुभव खूपदा येतो. मुलांची ओढ तर असतेच असते पण स्वत:च्या गावी उभ्या केलेल्या विश्वातही पाय गुंतलेला असतो. नुकताच असा अनुभव आला आणि मग "आवा निघाली पंढरपुरा" ह्या गीताचे प्रत्यंतर आले. ह्या भारुडात संत तुकाराम सांगतात, एका आजीला विठोबाच्या दर्शनाची ओढ लागलेली असते ,ती पंढरपूरच्या वारीला जायला निघते. पण घरातल्या दूधदुभते, तिखटमिठाचे पाळे ,उखळ मुसळ अशा सगळ्या ऐहिक गोष्टीत तिचा जीव अडकून राहतो. 

तसेच माझेही झाले.लाडक्या लेकीकडे जायच्या कल्पनेने खूप आनंदात तर होतेच पण मग झाडांचे काय होणार? त्यांना पाणी कोण घालणार? हे सगळी काळजी मनाला ग्रासून टाकत होती. पाण्याची व्यवस्था केली. ती काळजी मिटली . नंतर लक्षात आले ,कि खूप झाडांना कळ्या आल्या आहेत. त्या मी नसताना फुलणार. मग परत मनात हुरहूर. ती फुले पाहायला मी नसणार . म्हणजे फुलांचे उमलणे व्यर्थच जाणार.

आता मी नसले तरी कळ्या फुलायच्या राहणार आहेत का? त्यांचे फुलणे मी पाहायलाच हवे हा मनाचा आग्रह कशासाठी? हा मनात जागलेला ,आपण वाढवलेल्या झाडांवरच्या हक्काचा अभिनिवेश तर नव्हे? ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्याविषयी मनात नकळत हक्क का जागायला लागतो ? आपण फुलांच्या मायेत गुंतलेलो असतो. पण फुलांना त्याचे काय?फुलणे हा त्यांचा धर्म ते निर्ममपणे निभावत असतात. कोणी त्यांच्याकडे बघा,कौतुक करा किंवा न करा !

कौतुकावरून आठवले, जगभरात ज्याचे सगळ्यात जास्त कौतुक होते, त्याच्या असण्याचे ,फुलण्याचे उत्सव साजरे होतात असे फुल म्हणजे साकुरा -चेरी ब्लॉसम. जपान , तैवान ,कोरिया , ब्रम्हदेश , भारत ,चीन इत्यादी देशात आढळणारा हा चेरी ब्लॉसम जगभर ओळखला जातो तो मात्र साकुरा ह्या जपानी नावाने. कारणही तसेच! कारण जपानी माणसांइतके जगातील दुसऱ्या कोणाचे भावविश्व साकुराने व्यापलेले नाही. त्यांच्या कविता, कादंबऱ्या ,गीते, चित्रपट सगळ्यात साकुरा दिसतोच दिसतो. केवळ साहित्यात न राहता तो त्यांच्या रोजच्या जगण्यात देखील असतो. कपडे , रुमाल, मग्ज , पिशव्या ,छत्र्या सगळ्यावर साकुराची चित्रे. फुललेल्या साकुराखाली स्नेहीजनांनी भेटणे , खाणे आणि प्रामुख्याने ओसाके पिणे ,पारंपरिक वेशात फोटोसेशन्स करणे .. किती म्हणून त्या साकुराचे कौतुक !!! दरवर्षीच्या त्याच्या फुलण्याचे वेळापत्रकच आधी प्रसिद्ध होते आणि मग त्याप्रमाणे प्रवासाचे बेत आखले जातात. 

एवढा कौतुकाचा धनी असलेला, सतत सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारा साकुरा जेव्हा कोरियातील डोंगररांगांमध्ये ,हजारोंच्या संख्येने फ़ुललेला पाहिला तेव्हा परत 'फुलांचा धर्म फुलण्याचा , निर्ममपणे बहरण्याचा' हे जाणवून गेले. तिथे त्यांच्याकडे पाहत राहायला कोणी नव्हते.ना त्यांचे कोडकौतुक होणार होते ना त्यांच्या फुलण्याचा उत्सव साजरा होणार होता. पण त्यांचे फुलणे दुसऱ्या कोणाच्या असण्यावर,कौतुकावर थोडीच अवलंबून होते? अंतरात जोपासलेले अस्तित्वाचे कण न कण जणू त्याला पूर्णत्वाला न्यायचे होते. कोणी पाहायला नाही ह्याचा त्याला ना खेद होता ,ना खंत , ना हुरहूर !!

.. अवघे आठवडाभराचे त्याचे फुलणे. पण फुलणे असे कि शिल्लक काही राहू नये. असे जगणे माणसाला जमले असते तर किती चांगले झाले असते ! इतके बेभानपणे स्वत:ला उधळून देणे साकुरालाच जमते. सगळ्या फांद्या फुललेल्या,पानांचा पत्ता नाही. तेवढीही जागा फुलांवाचून राहायला नको अशीच जणू झाडाची इच्छा असावी. फांद्या तर अंगांगी फ़ुललेल्याच असतात पण जुने जरठ खोड देखील त्या मायेतून सुटत नाही. त्यावर देखील नाजुकश्या कळ्या उमलत असतात. सगळं गाव ज्या करड्या करारी कर्तबगार माणसाच्या दराऱ्यापुढे नम्र असावे ,कोणाची बोलायची हिंमत नसावी, तो माणूस आपल्या नातीबरोबर असताना मात्र परत कोवळा होऊन जावा तसे काहीसे ह्या खोडावरल्या फुलांकडे पाहताना वाटते. 

त्या फुलांचे अवघे आठ दिवसांचे आयुष्य संपते, पाकळ्या झाडाखाली,वाऱ्याबरोबर गळू लागतात.क्षण एक पुरे प्रेमाचा असे तर तेव्हा झाडाला वाटून जात नसेल? पण ... नाही. केवळ सुंदर फुले म्हणजेच जीवन असे झाडाला वाटत नसावे . फांद्यावरची ती जागा अजिबात रिकामी राहत नाही. लगेच तिथे पाने दिसू लागतात आणि पाहता पाहता फुलांनी बहरलेले असताना पांढरे गुलाबी दिसणारे झाड हिरवेगार होऊन जाते. तेही एक वैभवच असते. पानांच्या मधून हळूच फळे डोकावू लागतात आणि जीवनचक्र अविरत चालू राहते. 

आयुष्याची अनित्यता सांगणारे हे साकुरा मग प्रतीक होऊन गेले ते जपानी संकल्पनेचे - मोनो नो आवारे... आयुष्य असो वा प्रेम, सौंदर्य असो वा परिस्थिती ,त्यात परिवर्तन अटळ आहे. नित्य असे काहीच नाही, सारेच अनित्य आहे हे मानवी आयुष्यात, जगण्याच्या मोहापायी विसरले जाणारे तत्व साकुरा किती सुंदर रीतीने,नजाकतीने सांगत राहतो! एकदा हा विचार जाणवला ,कळला आणि वागण्यात रुजवताही आला की मग हुरहूर ती कसली वाटणार? हुरहुरीचे गोंदण मग जणू चंदनटिळा होऊन जाईल! 

-वृंदा टिळक 


२ टिप्पण्या:

  1. "पण फुलणे असे कि शिल्लक काही राहू नये. असे जगणे माणसाला जमले असते तर किती चांगले झाले असते!" ,
    "हुरहुरीचे गोंदण मग जणू चंदनटिळा होऊन जाईल!" .... काय सुंदर लिहिलंय !!मस्त आहे हे सदर.

    उत्तर द्याहटवा