माझी ३६० मुले

ऋतुगंध वसंत वर्ष १३ अंक १

आज महाविद्यालयातून निघायला ५ वाजले, तसा रोजच उशीर होतो पण आज ५-६ विद्यार्थ्यांच्या पालकांशी चर्चा करायची होती. शेवटचे पालक गेले, मी माझी खोली बंद केली आणि माझ्या शांत झालेल्या वर्गांवर नजर फिरवली. क्षणभर माझ्यासारखेच वर्गही सोमवार पर्यंत मुलांची वाट पाहत असतील असे वाटले. दोन्ही हातातील सामान म्हणजे पुस्तके, लॅपटॉप, पर्स कसेबसे सांभाळत भराभर पायऱ्या उतरून मी गाडीच्या दिशेने जाऊ लागले.

“मॅडम” एक ओळखीची हाक आली, एक बाई लगबगीने माझ्या दिशेने येत होत्या.

“अहो कशा आहात? किती दिवसांनी दिसता आहात? असता कुठें?कधी विद्यापीठांत दिसत नाही, कुठच्या कार्यक्रमाला नाहीं, आहात कुठे?” एकावर एक प्रश्नांचा भडीमार!

“अहो वेळच मिळत नाही,आज शनिवार असून पण ५ वाजले, पालकांच्या भेटीचा दिवस असतो, कसा वेळ जातो कळतच नाही, आणि इतर दिवशी ३ पर्यंत तर मुलांबरोबर असते.”

“मॅडम जरा विद्यापीठात येत जा, मी “-या --” विषयाची विभाग प्रमुख झाले, या वर्षांपासून विद्यापीठाचे पेपर सेट करणार आहे. दोन पुस्तकेही प्रकाशित झाली माझी, अहो या क्षेत्रांत हाच तर खरा मान!! पैसा आहे कुठे? आणि मुलांचे काय ? दरवर्षी येतात आणि जातात...आपण सुद्धा आपली प्रगती पाहायला हवी हो, आपल्याला काय मिळणार? चला, मी येते” आणि माझ्या उत्तराची अपेक्षा न करता धूमकेतू प्रमाणे त्या प्राध्यापिका बाई निघून गेल्या.

मी गाडी घराच्या दिशेने फिरवली आणि डोक्यात विचारांचे एक काहूर माजले. काय मिळवले मी गेल्या ६-७ वर्षांत? पैसा? प्रसिद्धी? पद? मान-मरातब? एखादा पुरस्कार?यातील काहीचं नाही….

१८ वर्षांची ती तरुण मुलें जेव्हा माझ्या वर्गात येत तेव्हा मला फक्त त्यांच्या डोळ्यात असणारी उद्याची स्वप्न दिसायची,त्यांच्या पालकांचा विश्वास दिसायचा आणि माझ्या पेशातील ती कमालीची ताकद दिसायची जी त्यांचे भावी आयुष्य उज्वल करू शकत होती. खरे तर मी शिकवायला गेले होते पण स्वतः च शिकून आले. मला जे मुलांनी शिकवलं ते कुठलही विद्यापीठ शिकवू शकत नव्हतं आणि मी फक्त शिकत गेले.

शिस्त, अभ्यास, वेळापत्रक, परीक्षा यापेक्षां खूप महत्त्वाचं असतं ते म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षकांचं नातं. अनेक कंगोरे असतात त्याला, अनेक नात्यांमधून प्रवास करावा लागतो. वेगवेगळ्या वातावरणात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा मार्ग वेगळा असतो. माझ्या हाती प्रत्येकासाठी फक्त ३ वर्षें होती ज्यात मला ते घडवायचं होतं जे त्यांना आयुष्यभर यश देईल. माझी ३६० मुलें मला सारखी होती पण सगळ्यांचे मार्ग वेगळे होते. फक्त एकच गोष्ट मला डोंगराइतकी अवघड होती ती म्हणजे त्यांना स्वप्न पाहायला लावणे आणि त्यासाठी त्यांच्याशी संवाद साधणे. किती आनंदमयी आयुष्य असते मुलांचे, रोज सकाळी एकमेकांना भेटायची, खळखळून हास्य-विनोद करायची, मी ही त्यात सामील होत असे. हळूहळू आमची मैत्री झाली कि मला त्यांचे आयुष्य जवळून पाहता येई आणि मग त्यांच्या अडचणी, स्वप्नं, भीती समजून घेणे सोपे व्हायचे. कदाचित आपण पालक फक्त त्यांच्या चुकांबद्दल सतत बोलत असतो ज्याने त्यांचे खच्चीकरण होत असते, आत्मविश्वास ढासळतो आणि ते स्वतः वर प्रेम करणे सोडून देतात, स्वतः च्या कृतींबाबतीत साशंक असतात. तू मला खूप महत्वाचा आहेस इतकी जाणीव पुरेशी असते मनुष्याला. हा विश्वास जर पालक आणि शिक्षक ह्या दोघांनी एकावेळी दाखवला तर एक सुंदर आयुष्य घडू शकतं यात वाद नाही.

पालकांना भेटणे खूप गरजेचे होते कारण विद्यार्थी आणि पालक यामधील दुवा हा फक्त शिक्षक असू शकतो. कित्येक मुले आपल्या आई-वडिलांशी बोलायचीच नाहीत, आई-वडिलांनाही आपल्या मुलाला काय करायचे आहे, त्याला काय येते हे महितचं नसायचे, काही अति बिकट आर्थिक परिस्थितीतून आलेली तर काही अति सधन कुटुंबातून, काही विभक्त घरातील तर काहींना घरचं नाही अशी, काही व्यसनांच्या आहारी गेलेली तर काहींना रोजच्या जेवणाची चिंता. मी त्यांच्या बरोबर त्यांचे आयुष्य जगू लागले, त्यांची हार-जीत मला माझीच वाटू लागली आणि नकळत मी त्यांच्या प्रेमात पडले. त्यांच्या बरोबर राहून मी पुन्हा एकदा तरुण झाले आणि त्यांच्या बरोबर त्यांची स्वप्न जगू लागले. त्यांच्या बौद्धिक, सांस्कृतिक व सामाजिक पातळीचा दर्जा उंचावला कि अभिमानाने ऊर भरून यायचा. खूप प्रेमळ असतात मुलें, समजते त्यांना तुम्ही काय करता त्यांच्यासाठी, ती तसेच वागतात जसे त्यांना दिसते. कधी तर माझीच समजूत घालत आणि मला निरुत्तर करत. कित्येक वेळा मला धीर देत, असे वाटायचे कि या जगात आपण कधीच एकटे पडणार नाही. कधी कठोर तर कधी मृदु अशी दोन्ही पात्र एकाच वेळी साकारणे हे फक्त तीच शिकवू शकतात. खरे तर प्रेम करणं पण त्यांच्याच कडून शिकावं. मी आजारी असेन तर मला पाहायला घरी आलेले विध्यार्थी पाहून आजारपण पण पळून जायचं. कधी स्वतः च्या हिंमतीवर शिकणारी मुलें पहिली कि वाटायचे शेर आहेस तू, कोणी नाही हरवू शकत तुला. काही मुलांना साथ लागायची, आधार लागायचा आणि तो मिळताच ती झेप घ्यायची, ऊत्तुंग! मी त्यांच्या पालकांची समजूत काढू लागले, शैक्षणिक तसेच सांस्कृतिक आवड यासाठी त्यांच्याशी भांडले, व कित्येक वेळा विद्यार्थी आणि पालकांबरोबर त्यांच्या अडचणी समजून खूप रडलेसुद्धा . ३६० युवा आयुष्यांचा विचार करताना वेळ कसा निघून जायचा कळायचेच नाही. असो, माझ्या हातून अजाणतेपणी चुकाही घडल्या, त्याची खंत वाटते. काही गोष्टी सांगायच्या राहूनच गेल्या.

आठवड्यातील सहा दिवस आणि दिवसातील ७ तास अशी तीन वर्ष रोज संपर्कात असणारी ही मुलें या पुढे मला रोज दिसणार नाहीत हा विचार मनात येताच भीती वाटायची, आणि त्यांच्या farewell ला अश्रूंचा बांध तुटायचा. कळत-नकळत मी हजारो जन्म घेतले आणि ते जगले सुद्धा…

रोज सकाळी तुमची वाट पाहणारी शेकडो मुलें, त्यांचे निरागस हास्य, त्यांच्या वाढदिवसाचा तो केक चा छोटासा तुकडा, त्यांच्या नोकरीचे पेढे, कृतज्ञता व्यक्त करणारे त्यांचे पालक, त्यांच्या लग्नाच्या पत्रिका, आमंत्रणं आणि त्यांची छोटी बालके पाहून असे वाटते.... नाही मिळवला पैसा, प्रसिद्धी आणि हुद्दा, पण कमावले ते निर्व्याज प्रेम….जगांतील सर्वांत श्रीमंत बाई कदाचित मीच असू शकेन , नाही का ??

- तेजश्री दाते 

1 टिप्पणी:

  1. Teju really excellent short profile of an actual life long experience.
    I was lucky to share some of the beautiful moments of these like your" kid's"birthdays ,synnergy events and your firing sessions to young Majnoos and laillas :-)
    In short you have narrated entire story wonderfully .
    Prf.Nandkishor Pophale

    उत्तर द्याहटवा