शहाणीव

ऋतुगंध ग्रीष्म वर्ष १३ अंक २

 सध्याचे दिवस वैशाखवणव्याचे. काहिली होण्याचे. ह्या काहिलीत आधार वाटतो तो अमलताश -बहाव्याच्या पिवळ्या लटकघोसांचा आणि नक्षीदार झालरफुलांच्या ताम्हण वृक्षांचा. आमच्या घराकडे येणारा रस्ता तर दोन्ही बाजुंनी ताम्हणवृक्ष असणारा आणि ह्या दिवसात सुंदर दिसणारा. ताम्हण -महासोना -जारुल अनेक नावांनी ओळखले जाणारे हे सुंदर फूल महाराष्ट्राचे राज्य फूल आहे. असे म्हणतात की पद्म आणि नारद नामक दोन बुद्धांना ह्याच वृक्षाखाली ध्यान करताना ज्ञानप्राप्ती झाली होती.

इतके दिवस मला बुद्धाला ज्ञानप्राप्ती म्हटले कि एकाच एका बोधीवृक्षाची -अश्वत्थ वृक्षाची आठवण व्हायची. पण नुकतेच वाचनात आले कि अठ्ठावीस बुद्धांना ज्या वृक्षांखाली ज्ञानप्राप्ती झाली ते वृक्ष वेगवेगळे होते . .

बुद्धाच्या तुलनेत आपली आयुष्ये अगदी क्षुद्र आणि आपल्याला होणारे साक्षात्कार देखील त्याच प्रमाणात छोटेसे. पण आपापल्या छोट्या आयुष्यात वेगवेगळ्या निमित्ताने साक्षात्कार होत असतात आणि शहाणपण देऊन जात असतात हे देखील खरेच.

वेगवेगळे प्रसंग,अनुभव,माणसे आपली शहाणीव वाढवत असतात. दंतकथा ,आख्यायिका,इतिहास ,संस्कार,वास्तव, भय आणि स्वप्ने ह्यांनी विणलेला एक घट्ट गोफ आपले सांस्कृतिक संचित बनलेला असतो. आपण आयुष्य जगतो, जगभर फिरतो ,ह्या संचिताच्या नजरेतून विश्व पाहतो आणि नकळत आपली शहाणीव क्षणाकणाने वाढवत जातो.

नुकतेच दक्षिण कोरियामधील जेजू बेटावरील संगमबुरी येथे गेलो होतो.आम्ही संगमबुरीला पोचलो तेव्हा आभाळ कसेबसे ढगांना आवरुन उभे होते. कधीही बांध ढासळेल आणि ढग अनावर होऊन कोसळू लागतील अशी स्थिती. थंड हवेमुळे तो झाकोळ देखील अगदी प्रसन्न वाटत होता. थोडा चढ चढून वर गेलो आणि एका अवर्णनीय दृश्याने मन वेधून घेतले. ज्वालामुखीमुळे तयार झालेल्या विवराच्या कडेवर असलेले विस्तीर्ण पठार. त्याच्या बाजूला डोलणारे चमचमते गवताचे पिवळसर सोनेरी तुरे. मुरुमदगडांच्या लांबच लांब नागमोडी रांगा आणि एका बाजूला हिरवळीच्या विस्तारावर विखुरलेली स्मृतिस्थळे. ती स्मृतिस्थळे कोणाची? कधीची ? काहीच कुठे उल्लेख नाही. ती अज्ञात वीरांची स्मृतिस्थळे आणि वाईट शक्तीपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी उभारले गेलेले दगडी पुतळे आपल्याला शतकांचा प्रवास घडवतात पण मनात रुतून राहतो तो एका उंचवट्यावर असलेला, आकाशाच्या पार्श्वभूमीवर मान उंचावून बघत असलेला हरिणाचा पुतळा . पुतळा इतका जुना नाही पण त्या जागेचे गारुड आणि पुतळ्याच्या देहबोलीतून व्यक्त होणारी प्रतीक्षा आणि ओढ आपल्याला अनेक युगे मागे घेऊन जाते.

संगमबुरीची दंतकथा सांगते ती एक अनोखी प्रेमकहाणी. स्वर्गातील जेड सम्राटाची मुलगी मलजात आणि हानगम नावाचा एक तारा प्रेमात पडतात. सम्राटाला कळताच तो त्यांना स्वर्गातून हद्दपार करतो. ढगांच्या वाटेवरून वाऱ्याच्या साथीने ते दोघे येतात पृथ्वीवर संगमबुरीला. तेव्हाही जेजू बेट आणि संगमबुरी निसर्गसुंदर आणि स्वर्गाइतकेच रमणीय असणार. त्यांना ती जागा खूप आवडते , एकमेकांची हवीहवीशी साथ आणि रमणीय जागा .. काळ पंख लावून उडत असणार. इथेच खरे तर ह्या कथेचा सुखांत व्हायला हरकत नव्हती. पण .. 

त्यांची खाण्याची आवडनिवड आणि सवयी अगदी भिन्न. मलजात फक्त फळे आणि भाज्या खाणार तर हानगम फक्त प्राण्यांचे मास. खाण्याच्या भिन्न आवडींमुळे लवकरच त्यांच्यात भांडणे सुरु होतात . मलजात सांगते कि मला तुझ्या अन्नाचा वास सहन होत नाही. आपण वेगळे राहू या. मलजात संगमबुरी सोडून जाते हानगम तिथेच राहतो .

हरिणाचा पुतळा खरे तर त्या विभागात सापडणाऱ्या प्राण्यांचे प्रतीक म्हणून उभारलेला आहे पण ही गोष्ट ऐकल्यावर मला सारखे वाटत होते की एकमेकांसमवेत घालवलेले सुंदर दिवस आठवत ह्या जागेत हानगमने मलजातची वाट पाहिली असेल आणि ते सगळे सौंदर्य आणि वाट पाहणे त्या पुतळ्यात भिनले आहे. आजही तिथे कधी पाऊस, कधी धुके, कधी ढग तर कधी ऊन असेल सांगता येत नाही. स्थानिक लोक मानतात की हानगमचा मूड बिघडला की असे होते!!!

ह्या दंतकथेला अर्थाचे अनेक पदर आहेत. अगदी भिन्न प्रवृत्तीवर प्रथमदर्शनीच प्रेम जडणे आहे, त्या प्रेमाच्या कबुलीपाठोपाठ येणारी त्याबद्दलची शिक्षा विनातक्रार भोगणे आहे. सतत सोबत राहताना कंगोरे टोचायला लागल्यावर आधी जुळवून घ्यायची धडपड आहे आणि नंतर वैयक्तिक स्वातंत्र्य, प्रेमासाठी गहाण न ठेवता, वेगळे व्हायचा घेतलेला निर्णय आहे. माणसांनी माणसांपर्यंत पोचण्याच्या वाटा डोळ्यांदेखत नाहीश्या होणे आहे. त्या वाटा हरवतानाचा सोसलेला आकांत आहे. स्वप्न पाऱ्यासारखे निसटून जाणे आहे. साऱ्या आकांताच्या पार जात धारण केलेला खंबीरपणा आहे. अटळ एकांत आहे. 

अशा परीक्षेच्या, अवघड निर्णय घेण्याच्या वेळा प्रत्येकाच्याच आयुष्यात वळणावळणावर सामोऱ्या येतात. . निर्णयाची जबाबदारी 'भोगणे ' फार कमी जणांना जमते. अनेकदा परिणामांचे भय वाटून निर्णय घेणेच टाळले जाते आणि मग वाट्याला येतो तो चकवा . न घेतलेले निर्णय जर का घेतले असते तर? त्यांचे परिणाम काय झाले असते? अशा विचारांच्या चकव्यात माणूस गोल गोल फिरत राहतो.

गाठी पडूच नयेत अशी तरकीब शिकवणारा यार जुलाहे प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही. मग एकतर गाठी पडूच नयेत किंवा पडल्याच तर त्यांचीच सुंदर नक्षी बनवून टाकावी ही शहाणीव आपली आपल्यालाच मिळवावी लागते.

ती शहाणीव असतेच चकव्याच्या सीमारेषेवर तिष्ठत . .. आपली वाट पाहत !

वृंदा टिळक



१२ टिप्पण्या:

  1. सुंदर लोककथा आणि त्याला तुमच्या रसाळ कथनशैलीची जोड. खूप छान!

    उत्तर द्याहटवा
  2. शहाणपण + जाणिव यापासून शहाणिव हा फार छान शब्द तयार केलास व्रृंदा. हि शहाणिव तुझ्यात ओतप्रोत भरलेली आहे, हे तुझ्या तरल भावनांच्या अभिव्यक्तितुन व तुझ्या लेखन शेैलितुन दिसतंय.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद ज्योती!! हा शब्द माझादेखील आवडता आहे. संतांनी खूपदा लिहून ठेवला आहे.

      हटवा
  3. प्रत्युत्तरे
    1. हो ना?? मलाही हा शब्द आवडतोच!

      हटवा
    2. आणि धन्यवाद!! असे वेगवेगळ्या देशांतून लोक वाचत आहेत म्हटल्यावर लिहायला उत्साह येतो!!

      हटवा
  4. खूप सुंदर... तुम्ही खूप छान लिहिता...सर्व परिसर डोळ्यापुढे आला न पहाताही..

    उत्तर द्याहटवा