आजही मला माझ्या लहानपणीची ती आठवण आणि प्रश्न दोन्ही आठवतायत! आम्ही दर मे महिन्याच्या सुट्टीत गावी जायचो श्रीवर्धनला(कोकण). आणि मग आजीसोबत कोकणात जिथे आंबे,काजू, फणसाची खूप झाडं. आजीला विचारल होतं हे आंबे कसे येतात त्यावर आजीच उत्तर ऐकून खूप मज्जा वाटली होती लहानश्या बी पासून इतकं मधुर आणि मोठं फळ कसं तयार होतं? कदाचित तेव्हा पासून त्या उत्सुकतेपोटी मला झाडं लावायची सवय लागली होती...
पण मुंबईच्या शहरात एक रूम किचन मध्ये इतकी मोठी झाडे लावणं शक्य नव्हते म्हणून मग मी आणि बाबांनी तुळस,सदाफुली, झेंडू, मोगरा, गुलाब, मनी प्लांट, तगर आणि एक-दोन दोन शोभेची ची झाडे गॅलरीमध्ये लावली होती...पुढे लग्न झाल्यावर तीच आवड सासरी पुण्याच्या घरात पण जपली गेली. आज इथे सिंगापुर मध्ये राहून जवळ जवळ ८वर्ष झाली आणि स्वतःच्या घरात आल्यावर मी पुन्हा माझी गॅलरी सजवू लागले. गुलाब, मोगरा, जास्वंदी, तुळस,अनंत, मनी प्लांट आणि त्यात भर आणि कुतुहल म्हणून मिरची, पुदिना, टोमॅटो ही पण झाडे लावली आहेत.
मे महिन्यात कैरीचं पन्ह आपसूकच केल जातं, मी हि केलं पण ह्या वेळेस मी पन्ह्यात थोडा पुदिना घालून सार एकजीव केलं, पहिलाच प्रयत्न होता आणि ते पन्ह घरच्यां सर्वांना आणि येणाऱ्या पाहुण्यांना दिलं . वा वा ! सर्वांना खूप आवडलं. आणि मी उसासा टाकला. मनोमनी खूप आनंद झाला. झाडाजवळ जाऊन त्याला धन्यवाद दिले, कौतुकाने पाहिलं आणि झोपाळ्यावर येऊन पुदिना पन्ह ऐटीत प्यायले.. पहिल्या प्रयत्नातली हि रेसिपी मस्त जमली आणि त्यात विशेष आनंद होता कि घरी उगवलेल्या पुदिन्याची पाने एकजीव केलेली होती. खरंच काय आनंद झाला म्हणून सांगू!
ती पूर्ण कृती मी खूपच एन्जॉय केली अगदी झाड लावण्यापासून, त्यांची काळजी घेण्यापासून ते असा वापरात आणेपर्यंत काय काय, सर्व आठवून मनातल्या मनात खूप खुश होत होती.
आणि त्याच वेळी आई-बाबांना सांगूनही टाकलं की ह्या वेळेस गावी गेलात तर पुदिन्याच झाड नक्की लावा. भरभर वाढ होते आणि काळजी हि जास्त घ्यावी लागत नाही, हो पण प्रेम करावं लागतं बरं !
आता सवयी नुसार सगळ्याच झाडांशी गप्पा होतात, त्यांना कुरवाळल जात आणि मनोमनी त्यांचे आभार पण मानले जातात. म्हणून सर्वांना आवर्जून सांगावस वाटतं कि शक्य असेल तिथे आणि तितकी झाडे लावत जा. अगदी घरातले धणे जरी टाकले कुंडीत तरी कोथिंबीरीचे झाड होते.... घरातल्या आपल्या झाडाची फुले, फळे, भाजी पाहणं आणि त्याचा स्वयंपाकात वापर करून घेणं ह्या सारखा दुसरा आनंदच नाही!
- मीनल लाखे
खूपच सुंदर लिखाण केले आहे.
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर लिखाण केले आहे.
उत्तर द्याहटवा