शरद ऋतुतील बदलते रंग - एक नवी सुरुवात, एक प्रवास.

ऋतुगंध शरद - वर्ष १२ अंक ४

सौंदर्याच्या कल्पना प्रत्येकाच्या अर्थातच भिन्न असतात. कोणी सुंदर चेहऱ्यावर भाळतात, तर एखादी सुबक कलाकृती कोणाचे मन मोहून घेते. प्रत्येकाच्या आयुष्यातले स्फूर्तिस्थानही वेगवेगळ्या गोष्टींत असते; पण सौंदर्य आणि प्रेरणात्मक संदेश एकाच ठिकाणी सापडणे हा दुग्धशर्करायोग. त्यातही, तो संदेश निसर्गा कडून शरद ऋतुच्या रूपात मिळणे हा योग अलभ्य. खरेच, शरद ऋतुच्या पानगळीची अनुभूति केवळ आल्हाददायकच नाही, तर प्रेरणादायकही असू शकते याची कल्पनाच केली नव्हती कधी.

मुलाच्या पदवीदान समारंभाच्या निमित्ताने या वेळी लंडनच्या ऑक्टोबर महिन्यातल्या दौऱ्यामुळे हाही अनुभव घेता आला. स्कॉटलंड मधील निसर्गसौंदर्या बद्दल ऐकले होते. त्यामुळे नेहमीप्रमाणे मुख्य पर्यटक स्थळे बघायच्या ऐवजी या वेळी लंडन शहराबाहेरचा परिसर आणि स्कॉटलंड इथले निसर्गसौंदर्य बघावे असा जरा वेगळा विचार करून रोडट्रिपला निघालो. ऐन शरद ऋतुत रंग खेळणाऱ्या निसर्गाने टप्प्याटप्प्याला बदलणाऱ्या रंगांमधून रंगपंचमीचा आस्वाद पुरेपूर दिला आणि घेतला.

"पीक डिस्ट्रिक्ट" म्हणजे लंडनच्या शहराबाहेरच्या परिसरातील पहाडी भाग. निसर्गाने इथे हिरव्या रंगांचा शिडकावा मुक्तहस्ताने केला आहे. दूर क्षितिजापर्यंत पसरलेली हिरवीगार कुरणे, हिरव्या मखमलीने झाकलेले डोंगर आणि त्यात स्वच्छंदीपणे चरणारी गाईवासरे   अन् उमदे घोडे. मध्येच हिरव्या रंगाचा विनम्रपणे भंग करून त्याला शुभ्र उठाव देणारा खळाळता फेसाळता झरा. दूरून हिरव्या गालिच्यावर पांढऱ्या ठिपक्यांच्या रांगोळीचा भास होणाऱ्या गुबगुबीत मेंढ्या. पीक डिस्ट्रिक्टचे वारेमाप सौंदर्य डोळ्यात सामावणे कठिण.

"लेक डिस्ट्रिक्ट"मध्ये शिरताच निसर्गाने निळीशार शालच जणु पांघरली. इतके मेघविरहित निरभ्र आकाश, की त्याची नीलिमा तलावाच्या पाण्यात उमटली होती. त्या संथ स्वच्छ पाण्यात प्रतिबिम्ब बघतो आहोत की प्रत्यक्ष स्वतःला, हे ओळखणे एक कोडे होते. तलावात विहार करणारे राजहंस, बदके आणि इतर जलचर जणु स्वतःचेच प्रतिबिम्ब न्याहाळत दिमाखात जलविहार करत होते.

स्कॉटलंडची सीमा ओलांडताच मात्र दानवीर शरद ऋतु अनेक रंगांची उधळण मुक्तहस्ताने करताना बघून डोळ्यांचे पारणे फिटले. स्कॉटलंडच्या शरद रागाला हिरव्या रंगाचा स्वर जसा काही वर्ज्य होता. जादू झाल्यासारखा तो अचानक गायब झाला. झाडांची लाल, पिवळी, गुलाबी, जांभळी, केशरी रसरशीत पाने वाऱ्याच्या मंद झुळुकीने सळसळत डुलत होती. त्या पानांचा सर्वत्र पडलेला रंगीत पाचोळ्याचा सडा जणू उनाड मुलाने खेळताना विस्कटलेल्या रांगोळीची आठवण करून देत होता.

मुलाचा पदवीदान समारंभ बघतानाही शरद ऋतुचा उत्सव बघताना झाला तसाच संमिश्र भावनांचा खेळ मनात चालला होता. शरदातली पानगळ म्हणजे जसा एका ऋतुचा अंत आणि दुसऱ्या ऋतुची सुरुवात, तसेच हा दिवस देखील त्याच्या आयुष्यातील एका पर्वाचा अंत आणि दुसऱ्या पर्वाची सुरुवातच नव्हती का? स्वच्छंदी जीवनाची गळून पडलेली पाने उलटून एक नवी प्रेरणादायक सुरुवात. पुनः नव्या वसंताच्या आगमनाच्या पहाटेची बघितलेली वाट. स्कॉटलंडला जाऊन निसर्ग सौंदर्य बघू असे म्हणणारे आम्ही वाटेत दिसणाऱ्या नयनरम्य दृश्यांचा आनंद घेवून अधिक भारावून गेलो. निसर्गाने कळत नकळत दिलेला संदेश सिंगापुरला परतीच्या वेळी राहूनराहून मनात घोळत होता,"लक्ष्य गाठण्याच्या चढाओढीपेक्षा प्रवासाची मजा घेणे, टप्प्याटप्प्याने जीवनातला रस चाखणे हे खरे जीवनाचे सार".

डॉ. अर्चना कुसुरकर


३ टिप्पण्या: