ऋतु राग मालिका – भाग चौथा .

नमस्कार मंडळी, ऋतु राग लेखमालिकेच्या चौथ्या भागाकडे आज आपण वळूयात. आत्तापर्यंत तीन ऋतुंमध्ये शास्त्रीय संगीताच्या अनुषंगाने साजेश्या रागसंगीताचा एक विचार मी मांडत आलेलो आहे. का कुणास ठाऊक पण ह्या ऋतुमानाप्रमाणे बदल होत असलेल्या निसर्गचक्रावर बारा स्वरांचे कोंदण असल्याचा भास वेळोवेळी येत असतो. 

सरलेल्या भाद्रपदातला चिखल जरा घट्ट आणि चिकट पण मऊ. खडेही धुतलेलले स्वच्छ. तेव्हा याच दिवसांत जीवनशैलीचा आधार असलेल्या त्या ओल्या मातीचा गोळा घेऊन त्याचा आपण मागल्या ऋतूमध्ये गणपती केला; तेरड्याच्या किंवा खड्यांच्या गौरी केल्या आणि त्यांना सारी पाने-फुले अर्पण केली. हा भारतीयांचा विधी म्हणजे निसर्गाच्याच विविध आविष्कारांचे रुपक नाही का ? हळूहळू भाद्रपद सरला. आणि नक्षत्रांचे तेज अश्विनात झळाळू लागले. अधून मधून मेघांचे आवरण आणि उगवत्या, मावळत्या नक्षत्रांचे दर्शन काही निराळाच बाज निसर्ग घेऊन येतोय.. पश्चिमेकडे नक्षत्र झुकले की त्याचे तेज जरा मंद होऊ लागते; किचिंतसा तांबूसपणा त्याच्यावर चढतो. आकाशभर लखलख करणारया सोनेरी-रुपेरी तारकांत तांबूस तारे जरा मंद पण काही औरच दिसायला लागतात. 

सूर्याचा अस्त संध्याकाळी नेहमीच विलोभनीय असतो. पण शुक्राचा रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी होणारा अस्त हा निसर्गाचा एक लहानसाच पण मोठा हृद्य आविष्कार आहे.. शुक्र मंदावतो आणि पूर्वेकडून दाटीवाटीने आकाशांत येणाऱ्या नक्षत्रांचे तेज खुलते. उत्तरेचा तो ध्रुव, सप्तर्षी, शर्मिष्ठा, ध्रुव मत्स्य या ताराकापुंजाना स्वत:भोवती फेर धरायला लावतो.. 

आता तुम्हांला प्रश्न पडला असेल कि शरद ऋतूसाठी इतकी प्रस्तावना करायचं कारण काय !.. तर ह्या ऋतूमध्ये साजेसा असं राग म्हणजे मालकंस.. त्याचा प्रहर रात्रीचा तिसरा .. म्हणजे आलं का लक्षात ! शुक्राच्या अस्ताशी आणि पसरलेल्या चांदण्यांच्या प्रकाशात ह्या रागाच्या स्वरांची गुंफण करा.. मग बघा.. शरद ऋतूचं सौदर्य कसं समोर येतं.. आणि मंग वसंत, ग्रीष्म, वर्षा ऋतूमध्ये आपल्या प्रियकराची वाट पाहणारी “ती” यौवना आपसूक म्हणू लागते..

शारदशोभा आली, गेली.... रजनीगंधा फुलली, सुकली... 
चंद्रकलेसम वाढुन विरले.... अंतरीचे हेतू

हा आता हे बाबूजींनी केदार रागात बांधलेलं कडवं आहे.. मग इथे अजून थोडं नीट ऐकलं तर इथे नितांत सुंदर केदार मांडला आहे! 'शारद शोभा' तला शुध्द मध्यम! मंडळी, शुध्द मध्यम हा स्वर म्हणजे केदारातला एक अधिकरी स्वर! संपूर्ण केदार रागात या शुध्द मध्यमाची सत्ता असते. आता शुद्ध मध्यमाचा जरी वापर असला तरी तीव्र मध्यमसुद्धा आपली ओळख देऊन जातो....

मालकंस असो, केदार असो किंवा शरदाचं चांदण घेऊन येणारी अश्विन पौर्णिमा असो... किंवा कार्तिक महिन्यातली देवशयनी एकादशी असो.. ह्या रागांमध्ये बांधलेल्या सुरावटीच आपल्या मनावर गारुड टाकतात.. 

आता राग केदारमध्ये कुमारजींनी गायलेली हि बंदिश ऐका...



राग रागिणी असा मतप्रवाह अनेक प्राचीन ग्रंथातून विषद केलेला आहे.. त्या संदर्भात विचार करता शरद ऋतूची सांगड प्राचीन ग्रंथकारांनी “श्री” ह्या रागाशी जोडलेली आहे. म्हणजे श्री हा राग आणि त्याच्या रागिण्या वासंती, मालवी, मालाश्री, धनाश्री, आसावरी.. ह्या राग-रागिण्यासंदर्भात पुढच्या लेखात मी अजून अधिक विश्लेषण करेन.. पहा... हाच तीव्र मध्यम, शुद्ध मध्यम, जोडीला कोमल गंधार, धैवत... शरद ऋतूत आसमंतात सामावून जातात... मालकंस ह्या रागाचा विचार लेख मालिकेत पुन्हा येईलचं. तर आता काही लिंक्स “श्री” राग आणि त्याच्या रागिण्या ह्याच्याशी निगडीत इथे आता पाठवतोय..

कुमारजी... - राग मालवी


अश्विनी भिडे देशपांडे ... – राग श्री

वीणा सहस्रबुद्धे... – राग श्री

कुमारजी... राग श्री – करन दे रे ...कछु लल्ला रे...
 

मागे पहिल्या लेखात म्हटल्याप्रमाणे, प्रत्येक ऋतु आपले वेगळेपणं जपतो तरीही तो एकमेकांत असा गुंफला जातो, की एक ऋतु संपून दुसरा सुरु झाला आहे. हे कळतही नाही.. तेव्हा ह्या शारदीय स्वर सौंदर्यासाठी शरद पौर्णिमेला मित्र-मंडळींसोबत भेटा... आणि श्री.. मालवी.. केदार.. आणि अर्थात सगळ्या रागांचा राजा... मालकंसमध्ये बांधलेल्या बंदिशी, गाणी ऐका.. 
ओंकार गोखले



1 टिप्पणी:

  1. फार सुंदर. मला शाश्त्रीय संगीताचा काही गंध नसतांना लेखात डुंबले, काही मोती हे कुवतीनुसार गोळा केले.!

    उत्तर द्याहटवा