ऋतुगंध ग्रीष्म वर्ष १३ अंक २
“मना सज्जना ! या अंकापासून आपण नवविधा भक्तीचा विचार करणार होतो; पण तू त्याबाबबत ऐकण्याच्या स्थितीत आज दिसत नाहीस. गेल्या अंकात मोठ्या प्रेमाच्या गोष्टी करत होतास, मग आता एकदम काय झाले?”
“हो! मी प्रेमाच्या खूप गोष्टी केल्या पण आता मला भीती वाटते आहे!”
“अचानक कसली भीती वाटायला लागली?”
“कसली म्हणून काय सांगू? कसली नाही ते विचार! हे प्रेमाचे बंध असेच राहतील ना? की एखाद्या क्षुल्लक करणाने तुटून जातील? माझी प्रेमास्पद माणसे मला सोडून तर जाणार नाहीत ना? किंवा माझ्यावरच त्यांना सोडून जायची वेळ आली तर?”
“आणि ही भीती काही अचानक नाही उत्पन्न झाली. एका कोपऱ्यात ती घर करून बसली आहे. कुणाला heart attack आल्याचे ऐकले की माझ्या छातीत धडकी भरते. कुणाला cancer झाल्याचे कळले की भय वाटते. जीवन इतके क्षणभंगूर आहे का? मी स्वत: चिरतरुण आहे रे. पण माझ्या शरीराचे आरोग्य, माझ्या प्रियजनांचे आरोग्य कसे राहील? त्यांचा विरह तर होणार नाही ना? धन कसे मिळेल, मिळाले ते पुरेल ना? टिकेल ना? कशात नुकसान तर होणार नाही ना? अशा एक ना अनेक भये मला नेहमी भेडसावत असतात. आनंदाचे आणि सुखाचे क्षण पटकन विरून जातात. वरून मी आनंदी आणि सुखी आहे असे दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण एकटा असलो मला आतल्या आत भीती वाटतच राहते. सुख देणारी प्रत्येक गोष्ट कशी भयप्रद आहे ते भर्तृहरीने आपल्या वैराग्य शतकात सांगितलच आहे ना? हे वाचून तर आणिकच भयग्रस्त व्ह्यायला होत. तो श्लोकाच पहा ना !
भोगे रोगभयं कुले च्युतिभयं वित्ते नृपालाद् भयम् |
माने दैन्यभयं बले रिपुभयं रूपे जराया भयम् |
शास्त्रे वादभयं गुणे खलभयं काये कृतान्ताद् भयम् |
सर्वं वस्तु भयावहं भुवि नृणां वैराग्यमेवाभयम् ||
विषयांच्या अतिसेवनाच्या परिणामी भयंकर रोग होण्याची भीती, संपत्ती असल्यास आयकर खात्याचे भय, कुलवंतांना कुळाची अब्रू जाण्याच भय, सन्मान मिळाला तर तो कसा टिकवावा याचे भय. बलवानाला आपल्यापेक्षा अधिक बलशाली शत्रूचे भय, सौंदर्यवतीला वार्धक्याचे, पंडिताला दुसऱ्या पंडिताशी वादात हरण्याचे, गुणवंताला एखाद्या वेळी पाय घसरण्याची भीती, तर शरीराला मृत्यूचे भय. काय काय सांगू? थोडक्यात सर्वच गोष्टी भयकारक आहेत. केवळ वैराग्य असलेलाच निर्भय असू शकतो अस भर्तृहरी म्हणतो. तस वैराग्य तर माझ्या ठिकाणी नाही. मग मी काय करु?”
“अरे बाबा ! हे सगळ तुला भिवविण्यासाकाठी नाही सांगितलं. तुला सावध करणे हा हेतू आहे; आणि तू एकटाच असा भयग्रस्त नाहीस काही. सगळ्या प्राण्यांच्या ठिकाणी निसर्गत:च काही प्रवृत्ती आहेत त्यातलीच ‘भय’ ही देखील एक उपजत प्रवृत्ती. आणि प्रत्येकाला आपले संरक्षण करण्यासाकाठी ती आवश्यक आहे. अशा परस्परविरोधी वृत्ती आवश्यक आहेतच की. विजेच्या उपकरणावर, खांबावर एक चित्र असतं ना? अजाणतेपणे जरी विजेशी संपर्क आला तर मृत्यू ठरलेला आहे. वीज भयकारक आहे; पण उपयोगीही आहे. यालाच सृष्टीची द्वंद्वात्मकता म्हणतात.
“पण हे भय कुठून उत्पन्न झालं माहित आहे? बृहदारण्यक उपनिषदात ती गोष्ट सांगितली आहे. अगदी सृष्टीच्या प्रारंभी उत्पन्न झाला विराटपुरुष, हिरण्यगर्भ. तो स्वत:च स्वत:ला पाहून म्हणाला ‘मी आहे’! त्यामुळे त्याला ‘अहं’ अस नाव पडल. आता नाही का ‘कोण आहे?’ अस विचारल की ‘मी’ आहे असे उत्तर कोणीही देतो? बाकी नाव, गाव वगैरे ओळख नंतरची. त्या विराट पुरुषाने इकडे तिकडे पाहिलं, तर त्याच्याशिवाय कोणीच तिथे दिसेना. तेव्हा त्याला मी एकटाच आहे याची जाणीव झाली. त्या विचाराने त्याला एकदम भीतीच वाटली. पहिली भीती उत्पन्न झाली ती तेव्हा ! त्याचाच परिणाम म्हणून की काय आताही व्यवहारात कोणी एकटा असला की भितो. भीती ही अशी सृष्टीच्या उत्पत्तीपासूनची आहे बघ.
“पण तो प्रजापती हुशार होता. तो विचार करु लागला की मी तर एकटाच आहे, मग मला भय कोणापासून असणार? म्हणून श्रुतीने सिद्धांत सांगितला, ‘द्वितीयाद्वै भयं भवति |’ भयाचे मुख कारण आहे दुसरा. भय तर दुसऱ्या पासून होते. कोणी दुसरा आहे असे समजणे म्हणजे द्वैतबुद्धी हेच भयाचे मूळ कारण. मी हा या देहाएवढाच आहे. देश-काळाने सीमीत आहे ही भावना देहसंबंधी दु:खांना कारण आहे. यालाच तर ‘आध्यात्मिक ताप’ म्हणतात. मी इतरांपासून वेगळा, सृष्टीपासून वेगळा आहे असे त्याला वाटले. मग स्वत:च्या देहामुळे होणाऱ्या दु:खांमध्ये इतरांपासून होणाऱ्या दु:खांची भर पडली. याला समर्थ ‘आधिभौतिक’ आणि ‘आधिदैविक ताप’ म्हणतात. याचा अर्थ असा होतो निर्भय व्हायचे असेल तर द्वैत असता कामा नये”.
“पण हे कसे शक्य आहे? मला तर पटत नाही”.
“हो खरे आहे. हा सिद्धांत पटणे सोपे नाही; पण त्याशिवाय तुझी भीती जाणार नाही हे ही तितकेच खरे. खरा मी, मी आत्मस्वरुप आहे. आणि आत्मा एकच आहे असे एकत्वदर्शन ज्याला होते त्यालाच तेवढे भय उरत नाही. दैवी संपत्तीचा पहिला गुण ‘अभय’ असे गीतेच्या १६ व्या अध्यायात सांगितले आहे.
“मग पुढे काय झालं?”
“ तो प्रजापती मी एकटाच आहे या विचाराने निर्भय तर झाला खरा. पण थोड्याच वेळाने त्याला त्या एकटेपणाचा कंटाळा येऊ लागला. त्याला एकटे राहणे आवडेनासे झाले. म्हणून श्रुतीने दुसरा सिद्धांत सांगितला ‘एकाकी न रमते |’ एकटय़ाला करमत नाही. मग त्याने काय केले माहीत आहे? मी एकटा आहे आता आपणच अनेक व्हावे ‘एकोऽहं बहुस्याम्’ असा विचार त्याच्या मनात आला. सृष्टी उत्पत्तीमागचा मूळ संकल्प तो हाच. यालाच मूळमाया म्हणतात. त्याच्या जवळ दुसरी काही सामुग्री नव्हती. पण त्याची इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, कार्यशक्ती तर त्याच्या अंगी होती ना? त्याने संकल्पाने आपल्या शरीराचे दोन भाग केले. आपल्या दुसऱ्या भागाशी तो रममाण झाला. तेच शिव-शक्ती, पुरुष-प्रकृती, अर्धनारीनटेश्वर, मनू आणि शतरूपा हे मूळ युगुल. या युगुलापासू पुढे चराचर सृष्टीची उत्पन्न झाली. विराट पुरुषाच्या रमण्याची सोय तर झाली, पण आता त्याला तुला वाटते तशी भीती वाटायला लागली. ही नवीनच समस्या निर्माण झाली. एकटा असला तर करमत नाही आणि दुसरे असले की भीती वाटते!
“प्रजापती का बरे भ्याला असावा? श्रुती सांगते, आपण खरे कोण आहोत, आपले स्वत:चे खरे स्वरुप काय हे तो विसरला. मी हा असा पुरुषशरीरवान ‘अहं’ आहे असे त्याला वाटायला लागले. असे हे विपरीत ज्ञान त्याच्या भीतीचे कारण आहे. ही भीती सर्व चराचरात भरली आहे. समर्थांनी नाही का सांगितले, भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे। ( म. श्लो. १३६) परमात्म्याचे म्हणजे विराटाचे शरीर म्हणजे ब्रह्मांड. जसं तुझं-माझं शरीर पंचभौतिक आहे, तसंच ब्रह्मांड देखील पंचभौतिक आहे. आणि तुला माहीत आहे की, एक महाभूत दुसऱ्याला नष्ट करायला टपलेलेच असते. पाणी अग्नीला विझवतं, अग्नी पाण्याला नष्ट करतो, वारा अग्नीला विझवतो; पण तरी ते एका मर्यादेपर्यंत एकत्र नांदतात; कारण तीही त्यांच्या कर्त्याला, म्हणजे ईश्वराला, भितात. ही पांचभौतिक सृष्टी द्वैतात्मक आहे. म्हणून ती भयाने व्यापली आहे. हे द्वैत एकदा स्वीकारले की भयाची कारणे निर्माण होतात.
“विष्णूसहस्रनामामध्ये भगवंतांचे एक नाव आहे ‘भयकृत्’ (८३३) म्हणजे भय निर्माण करणारा. चतुष्पाद प्राण्यांना माणसांचं भय आहे, माणसांना राजाचं, नोकराला आपल्या मालकाचं, दुर्बळाला बलिष्ठाचं, दरिद्र्याला धनवंतांचं. अशाप्रकारे प्रत्येकाला त्याच्या वरिष्ठाचं, त्याच्यापेक्षा श्रेष्ठाचं भय असतं. मग सर्वात वरिष्ठ आणि बलवान कोण? तर सृष्टीकर्ता ईश्वर! खरं तर सर्व सत्ता त्याचीच आहे. ‘भीषाऽस्माद्वातः पवते । भीषोदेति सूर्यः। भीषाऽस्मादग्निश्चेन्द्रश्च। मृत्युर्धावति पञ्चम इति ।‘ (बृ. ) वारा वाहतो, सूर्य उगवतो, अग्नी, इंद्र आणि मृत्यू देखील त्याच्याच सत्तेने, त्याने नेमून दिलेली कामे निमूटपणे करतात. कारण सर्व पंचमहाभूतात तो अंतर्यामीपणे राहून तो त्यांच नियमन करतो. त्याने घालून दिलेल्या धर्माप्रमाणे जो वागत नाही त्याला भय आहे. जसा पंचमहाभूतांचं आहे तसं दुष्प्रवृत्तीच्या माणसांच्या मनांत तो भय निर्माण करतो. त्यांनी धर्ममार्गाकडे वळावे म्हणून.
त्यानेच तर सांगितल आहे ना ‘स्वधर्मे निधनं श्रेय: परधर्मो भयावह: |’ ही तर त्याची आज्ञा आहे. त्याच्या आज्ञा पाळत राहिले तर भीती राहणार नाही. तुझ्याही अंतरात तर तोच आहे ना? तुझे आणि तुझ्या देहाचे सर्व व्यवहार तोच चालवतो याची तुला खात्री आहे ना? मग कशाला घाबरायचे? ‘तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत | तत्प्रसादात् परां शांतिं स्थानं प्राप्यसि शाश्वतं ||’
“हो! सगळ ऐकलं आहे, पण कळले तरी वळत नाही त्याचे काय?”
“आता त्या ईश्वराची दुसरी बाजू पण पहा! द्वैत सृष्टीचा चालक असा हा भगवंत उभयधर्मी आहे. म्हणून लगेचच विष्णुसहस्रनामामध्ये त्याचे दुसरे नाव सांगितले आहे ‘भयनाशन’ (८३४). तो भयनाशकही आहे. कोणाकरिता? त्याच्या भक्तांकरिता. त्याच्या आज्ञा जे पाळतात, केवळ त्यालाच शरण असतात. त्याला विसरत नाहीत त्यांच्याकरिता तो भयनाशक आहे. आपल्या भक्तांना तो अभय देतो. कारण जो कर्ता असतो तोच भोक्ता होतो. आपल्या कर्मांची फळे कर्त्यालाच भोगावी लागतात. निष्काम स्वधर्माचरणाने भयनाश होतो. म्हणून नाही का समर्थांनी सांगितल आहे ‘मी कर्ता म्हणसी | तेणे तू कष्टी होसी | राम कर्ता म्हणता पावसी | यश, कीर्ती, प्रताप ||’.
“भय आणि अभय या माझ्या विभूती आहेत असे गीतेमध्ये भगवंत सांगतात. सुखं दुःखं भवोऽभावो भयं चाभयमेव च ॥ गीता १०.४. या द्वंद्वात्मक सृष्टीमध्ये भयाबरोबर अभय देखील असणारच. अशा अनेक विरुद्ध गोष्टींनी ही सृष्टी बनली आहे. पण हे दोन भाव असे विरुद्ध असले तरी त्यांना सत्ता, स्फूर्ती एकाच ईश्वराची आहे. सुख-दु:ख, उत्पत्ती-विनाश, भय-अभय, अनुकूल-प्रतिकूल घटना ही त्याचीच लीला आहे. ‘त्वमेव केवल कर्तासि | त्वमेव केवल धर्तासि | त्वमेव केवलं हर्तासि |’ हे किती वेळा घोकल आहेस? तुला हे accpet केल्याशिवाय गत्यंतर नाही. सृष्टी अशी द्वंद्वमया आहे आणि त्या सृष्टीचाच तू एक भाग आहेस. मग तू भयातून कसा बरे सुटशील ? मग द्वंद्वातीत कोण आहे? तो परमात्मा द्वंद्वातीत आहे. आणखी कोण असे द्वंद्वातीत म्हणून निर्भय आहेत माहीत आहे? जे त्याचे झाले ते तुझ्या माझ्या सारखे देहधारी संत आणि सद्गुरु ! ‘द्वंद्वातीतं गगनसदृशं’ .... असा गुरुस्तुतीचा श्लोक म्हणतोस आणि विसरतोस कसा?
“म्हणून समर्थ वरच्या श्लोकात पुढे सांगतात ‘भयातीत ते संत आनंत पाहे.’ केवळ संत मात्र भयातीत असतात. कारण ते अद्वैताच्या आनंदामध्ये असतात. आपणच आणि परमात्मा एकच आहे अशी त्यांची धारणा असते. त्यांना सर्वत्र परमात्मा दिसतो. समर्थ पुढे म्हणतात, ‘जया पाहता द्वैत काही दिसेना । भयो मानसी सर्वथाही असेना ॥‘ सर्व संतांचा अनुभव एकसारखाच आहे. ज्ञानोबांना ‘हरि दिसे जनि वनी आत्मतत्त्वी’ तुकारामांची ‘त्रिभुवन संचले विठ्ठले गा’ अशी धारणा आहे. समर्थांना ‘भरला घनदाट हरी दिसे’, ‘तो गे तो चि तो राम सर्वत्र पाहे’. गीता म्हणते ‘वासुदेव: सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ: |’ ही सर्व वचने किती वेळा ऐकली आहेस. हे कसे नाकारता येईल? आपली भीती घालवायची असेल तर एखाद्या संताचा पदर धरावा. श्रद्धेने त्यांचे ग्रंथ वाचावेत. कारण त्यांची काया आणि वाणी गेली असली, तरी ते ग्रंथरूपाने आहेत. ते चैतन्यरूपाने तर आहेतच; पण आपल्याला त्यांच्या ग्रंथातून त्यांच्याशी नाते जोडता येते.
“जो आत्मज्ञानी असतो तो द्वंद्वातीत म्हणून पूर्ण निर्भय असतो असे उपनिषदांनी अनेकदा सांगितलय. न बिभेति कुतश्चनेति | ( तैत्तिरीय उप २.९). गणपती अथर्वशीर्षाची फलश्रुती विसरलास काय? ‘ब्रह्माद्यावरणं विद्याद् न बिभेति कदाचन इति |’ – गणपती अथर्वशीर्षात जे सांगितल आहे ते नीट समजून घेतलंस, आत्मसात केलंस; तरच निर्भय होशील. नुसतं घोकून काय उपयोग? ही ब्रह्मविद्या म्हणजेच आत्मज्ञान. मी आणि तो वेगळा नाही अशी स्थिती”.
“बर असं सांग ते ‘भय’ कसं दिसतं? ते दाखवता येतं का रे तुला? नाही ना? कारण ती एक कल्पनाच आहे. जगात द्वैत दिसतय ते काही मी किंवा तू मिटवू शकणार नाहीस. संतमहात्मे सुद्धा ते करु शकत नाहीत. पण मनातली द्वैत कल्पना तर काढून टाकशील? द्वैतातून, भेदातून भय निर्माण होत. द्वैत कल्पना पुसून टाकलीस तर भयही नाहीस होईल. पण हे सर्व सोपे नाही”.
“हे सर्व समजायला आणि तसं वागायला किती अवघड आहे! काही सोपा उपाय सांगशील?”
“गीतेमध्ये काय सांगितलं आहे ते बघ. ‘विगतेच्छाभयक्रोध: य: सदा मुक्त एव स: |’ (गी ५.२८). जो नेहमी इच्छा, भय आणि क्रोधरहित आहे तो सदा मुक्तच आहे अस भगवंत सांगतात. भय उत्पन्न होण्याचे आणखी एक कारण म्हणजे आपल्या इच्छा. इच्छेचे मूळ देखील द्वैत कल्पनाच आहे. आपल्यापासून दूर, वेगळं ते हवं असं वाटतं. आपण सीमीत आहोत, अपूर्ण आहोत ही भावनाच इच्छा उत्पन्न करते. स्थळ काळाने ज्या गोष्टी सीमीत आहेत त्या संपणाऱ्या आहेत. म्हणून सुखाची इच्छा झाली की ते संपण्याचे व पुढे दु:ख होण्याचे भय पाठोपाठ येते. समर्थांनी म्हटल आहे ना ‘सुखाची घडी लोटता सुख आहे | पुढे सर्व जाईल काही न राहे | (म.श्लो. ). जगण्याची इच्छा मृत्यूचे भय निर्माण करते. ज्याची इच्छा असते ते मिळाल नाही की क्रोध उप्तन्न होतो. इच्छा असणे हेच भयाचे मुख्य कारण आहे. तूच सुरवातीला भर्तृहरीच वचन सांगितलस ना की वैराग्य एकमेव अभयकारक आहे म्हणून. आपल्या अनावर इच्छा कमी केल्यास तर त्या प्रमाणात भय देखील कमी होईल.
“दुसर अस की तुला जी सुखाची आणि आनंदाची अपेक्षा आहे ती नैसर्गिक आहे. पण ते सुख, आनंद तू लौकिकात शोधतोस यात तुझी चूक होते आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ‘दु:ख घेउनि सुखाची अंगी | सळित जगाते |’ (ज्ञा. ९.३३.५०२). एकमेव सुखस्वरुप, आनंदस्वरुप कोण असेल तर तो भगवंत, राम, विठोबा. तुकाराम महाराज विचारतात ना ‘सुखरुप कैसा दुजा कोण सांगा | माझ्या पांडुरंगासारखा ||’ आपण भगवंत सोडून सुख शोधित बसतो म्हणून भय निर्माण होतं. सगळ्या शास्त्रांचं, संतांचं हेच सांगणं आहे की नश्वर वस्तूपासून मिळणारे सुखही नश्वरच असणार. म्हणून हे मना, समर्थांनी तुला सांगितल आहे ते आठव! त्या सुखरुप रामाची भक्ती कर. तो सोपा मार्ग आहे. जो विभक्त नव्हे तो भक्त. भक्त होणे म्हणजे त्याच्याशी एकरुप होण्याचा प्रयत्न करणे. तू भक्त झालास, तर त्याच्यासारखा सुखरुप होशील. समर्थांनी तुला सांगितल आहे ते आठवतं ना?
भवाच्या भये काय भीतोस लंडी । धरी रे मना धीर धाकासि सांडी ॥
रघूनायकासारिखा स्वामि शीरी । नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ॥ म. श्लो. २७ ॥
सुखानंदकारी निवारी भयाते । जनीं भक्तिभावे भजावे तयाते ॥ विवेके त्यजावा अनाचार हेवा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ म. श्लो. ६९ ॥
“हेवे-दावे, आणि दुराचार टाकलास तर तुझी भीती कमी होईल. बागुलबुवाची भीती वाटली की मुले जशी आपल्या आईच्या पाठीमागे लपतात, तसेच सगुण रामाचे आलंबन घेऊन त्याच्याशी एकरुप हो. समर्थ रामरुपी लपले, मीरा कृष्णरुप झाली. लपावे याचा अर्थ आपण दिसूच नये तोच दिसावा. आपले स्वतंत्र अस्तित्व शिल्लक राहू नये. त्याच्याशी तुझे ऐक्य झाले की स्वस्वरूपाची प्राप्ती होते. स्वरुपी ऐक्य झाले निश्चित भयातीत होता येते कारण जेथे अद्वैत प्रस्थापित होते तेथे भय नसते. देव आणि भक्त यांचे ऐक्य झाले की भय उरत नाही असा संतांचा अनुभव आहे.
लपावे अति आदरे रामरुपी । भयातीत निश्चीत ये स्वस्वरुपी ॥
कदा तो जनी पाहतांही दिसेना । सदा ऐक्य तो भिन्नभावे वसेना ॥ म. श्लो १८५॥
“हे पहा, द्वैत, अद्वैत हे कठीण विचार सोडून दे. त्यामानाने भक्तिमार्ग आचरण्यास सोपा आहे. भागवत महापुराण सुंदर गोष्टीमधून त्याचे आचरण कोणी कसे केले ते सांगते. श्रीमद् भागवत पुराणाची सुरुवात तुला माहीत आहे ना? सात दिवसात तक्षक नावाचा नाग चावल्याने मृत्यू येईल असा शाप मिळालेला परिक्षिती किती भयभीत झाला असेल? ऋषिपुत्राच्या शापापासून भगवंतही वाचवू शकणार नाहीत अशी परिस्थिती आहे. तो सर्वस्वाचा त्याग करून गंगातीरावर आला. अशावेळी शुकमुनी तेथे आले. त्यांची पाद्यपूजा करून, त्यांना शरण जाऊन परिक्षिताने विचारले ‘मरणासन्न मनुष्याने काय केले पाहिजे म्हणजे हे अटळ असे मरण क्लेशकारक असणार नाही ? तेव्हा शुकमुनी सांगतात, तस्माद्भारत सर्वात्मा भगवानिश्वरो हरि: | श्रोतव्य: कीर्तितव्यश्च स्मर्तव्यश्चेच्छताभयम् || २.१.५ निर्भयपणे मरणाला सामोरे जायचे असेल तर ‘हे परीक्षिता, सर्वांचा आत्मा असणाऱ्या, भगवान, ईश्वर अशा हरीच्या लीलांचे श्रवण, कीर्तन आणि स्मरण केले पाहिजे’. शुकमुनींनी त्याला सात दिवस अखंड भागवत कथा सांगितली. अन्न पाणी न घेता परीक्षित ती ऐकत होता. मरण तर चुकले नाही, पण सात दिवस कृष्णकथा श्रवण करून परीक्षित आनंदाने मरणाला सामोरा गेला. त्याने मृत्युच्या भयावर विजय मिळविला.
“याच भागवतात आलेला राजा निमी आणि नऊ योगी यांचा संवाद जसाच्या तसा तुला सांगतो. तुझ्या भितीवरचा उत्तम उपाय तुला सापडेल. एकदा राजा निमी यज्ञ करत असता अचानक नऊ योगी तेथे आले. त्यांचे यथायोग्य आदरातिथ्य करून निमीने त्यांना विचारले ‘भागवत धर्म म्हणजे काय? तो कसा आचरावयाचा? त्याने काय होते?’ तेव्हा त्यातील पहिला योगी कवी म्हणाला, ‘राजन्! भगवंतांच्या चरणांची नित्य उपासनाच या जगात सर्व प्रकारचे भय नाहीसे करणारी आहे, असे माझे निश्चित मत आहे. नश्वर पदार्थांविषयी अहंता व ममता उत्पन्न झाल्यामुळे ज्यांचे चित्त उद्विग्न झालेले असते, त्यांना वाटणारी भीती या उपासनेने संपूर्णपणे नाहीशी होते. अज्ञानी लोकांनासुद्धा अगदी सहजपणे साक्षात आपल्या प्राप्तीचे जे उपाय भगवंतांनी सांगितले आहेत, तेच "भागवत धर्म" समज. राजन ! या भागवत धर्माचा अवलंब करणार्या मनुष्यावर कधी संकटे येत नाहीत आणि डोळे बंद करून तो पाळाला म्हणजेच त्याच्या विधिविधानात काही कमतरता राहिली तरी, त्याचे स्खलन किंवा पतन होत नाही. मनुष्य शरीराने, वाणीने, मनाने, इंदियांनी, बुद्धीने, अहंकाराने किंवा स्वभावाप्रमाणे जी जी कर्मे करील, ती ती सर्व कर्मे त्याने त्या परमपुरूष नारायणांनाच समर्पण करावीत.
भयं द्वितीयाभिनिवेशतः स्यात् ईशात् अपेतस्य विपर्ययोऽस्मृतिः ।
तन्माययातो बुध आभजेत् तं भक्त्यैकयेशं गुरुदेवतात्मा ॥ ११.२.३७ ॥
जो ईश्वराला विन्मुख झाला, त्याला त्याच्या मायेमुळे आपल्या स्वरूपाची विस्मृती होते आणि त्यामुळे देह म्हणजेच मी असा त्याला भ्रम होतो या आत्म्याखेरीज दुसरे काही मानण्यामुळे भय उत्पन्न होते म्हणून गुरूंनाच आपले आराध्यदैवत मानून अनन्य भक्तीने त्या ईश्वराचे भजन करावे’.
“आपले हे ग्रंथ जुने पुराणे म्हणून विसरण्यासारखे नाहीत बर ! त्यातल्या गोष्टी जुन्या, चमत्कृतीपूर्ण असल्या तरी तत्त्व अजरामर आहे कारण भीती जशी सृष्टीच्या उत्पत्ती पासूनची तशा आपल्या वृत्ती पूर्वी होत्या तशाच आजही आहेत. आपल्या जीवनाची operating manuals न वाचताच आपण जीवनाची गाडी चालवायचा नव्हे अधिकाधिक वेगाने पळवायचा प्रयत्न करतो आहोत. ‘तुझे धावणे अन् मला वेदना’ तेव्हा जरा थांब आणि विचार कर.
“निर्भयता प्राप्त करायची असेल तर त्याच्यावरचा उपाय म्हणजे त्या सृष्टिकर्त्या ईश्वराची भक्ती. ‘भक्तीचेनि योगे देव | निश्चये पावती मानव |’ समर्थांनी दासबोधात ती सविस्तरपणे सांगितली आहे. बरे झाले तुला वाटत असलेल्या भयाचा आपण विचार केला. आता भक्तीचे महत्व तुला चांगले पटले असेल. समर्थांनी सांगितलेल्या नवविधा भक्तीचा श्लोक मुळात कोणी सांगितला ते माहीत आहे? ती गोष्टही श्रीमद् भागवतामध्ये आली आहे. पाच वर्षांच्या बाळ प्रह्लादाने. निर्भय भक्ताचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे भक्त प्रह्लाद ! त्याची गोष्ट तुला नवीन नाही. हिरण्यकश्यपूचा वध करताना नृसिंहभगवान भयंकर संतप्त झाले होते. लाल बुंद डोळे, अक्राळ विक्राळ मुद्रा, त्यांचे गुरगुरणे असे त्यांचे रूप पाहून सर्वच जन भयभीत झाले होते. त्यांचा संताप शांत होण्याची चिन्हे दिसेनात. सर्व देव देखील त्यांना इतके घाबरत होते की कोणी पुढे जाईना. लक्ष्मीदेवी पण त्याचे संतप्त रूप पाहून पुढे जाईना. त्यावेळी बाल प्रह्लाद पुढे आला आणि नृसिंहभगवंतांच्या मांडीवर जाऊन बसला. त्याला पाहताच भगवान शांत झाले. म्हणून एक भक्त भयहरनृसिंहपंचकात त्यांची प्रार्थना करतो ‘हे नृसिंह भगवान ! केवळ प्रह्लादाचे रक्षण केल्याने तुमचे अभयदायक नाव सार्थ होणार नाही. ते नाव खरोखर सार्थ करायचे असेल तर माझी भीती नष्ट करून माझे रक्षण करा !’ भीतिं विदारय हरे नरसिंह मूर्ते ॥ ५ ||
“समर्थांच्या म्हणण्याप्रमाणे ताप त्रयाने पोळलेला, भयभीत झालेला तू आता खरा परमार्थ श्रवणाचा अधिकारी झाला आहेस. याच प्रह्लादाने जी नवविधा भक्ती सांगितली आहे ती दासबोधाच्या आधारे आपण पुढल्या अंकात बघू. तोपर्यंत तू रामनाम तर घे! रामरक्षा, मारुती स्तोत्र, हनुमान चालीसा वगैरे म्हणणे चालू ठेव. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ हे स्वामी समर्थांचे वचन लक्षात आहे ना?”
अनासायेन मरणं विना दैन्येन जीवनं | देहि मे कृपया कृष्ण त्वयि भक्ति अचंचलाम् ||
- श्रीकांत जोशी
आपला लेख इतका सुंदर, भावपूर्ण अ विद्वत्ताप्रचुर आणि उद्बोधक आहे की त्याचे वर्णन करायला माझ्याकडे समर्पक शब्द सामर्थ्य नाही. अप्रतिम! मला भीतिं विदारय हरे नरसिंह मूर्ते ॥ ५ || हे भीतिं विदारय हरे नरसिंह मूर्ते ॥ ५ ||
उत्तर द्याहटवाभयहरनृसिंहपंचक मिळत नाहीये. आपण त्याचा ल्स्भ करून द्यावा अशी विनम्र विनंती. आपल्याला साष्टांग दंडवत.उल्हास हेजीब ubhejib@gmail.com
मी गणपत कोयनाप्पा सोनवणे वय वर्षे 73 मी माझ्या घराण्याचा इतिहास लिहित आहे. पण तो केवळ घराण्याचा इतिहास नसून माझी कुलस्वामिनी माहूरची रेणुका माता माझ्या घराच्या इतिहासाच्या माध्यमातून अखिल ब्रम्हांडातील चारी युगातील घडामोडीचा ताळेबंद माझ्या वयाच्या आठव्या वर्षापासून माझे उत्तरदायित्व घेऊन वयाच्या 68 व्या वर्षी माइंड अटॅकचे निमित्त करून तीच तुझी पुण्यतिथी समजून सबंध लिखाण कर अशी प्रेरणात करून सुरुवातीस सोनवणे घराण्याचा इतिहास असलेले नाव बदलून सोनवणे घराण्याचा इतिहास अर्थात आधुनिक युगातील रेणुका महात्मा असेच करावयास भाग पाडले पण हे लिहिण्यात हे धाडस होत नव्हते तेव्हा तिने ऋषी मारुती चितमपल्ली यांच्या समक्ष मला मिळून त्यांच्या करवी तुम्ही लिहा असा आदेश झाला त्याप्रमाणे लिहीत असताना मला माझ्या पत्नीच्या चित्तात सुरुवाती पासून भय असल्याचे लिहीत असता. मी भय शब्द सर्च केला. ह्या लेखातील आपण केलेली माहिती आपण परवानगी दिल्यास माझ्या ग्रंथात समाविष्ट करीन.
उत्तर द्याहटवाGanpat Sonawane mail ID sonawane ganpat0@gmail.gmail असा आहे धन्यवाद