भीती

ऋतुगंध ग्रीष्म वर्ष १३ अंक २

भीती’ हा शब्द सुद्धा माहित नसतो, शब्दच माहित नाही तर त्याचा अर्थ माहित असणे दूरच, अशा वयात सुद्धा किंवा अशा वयापासून आपल्या सगळ्यांना ‘भीती’ माहित असते. गंमत अशी कि लहानपणी अनुभव नसतो, माहिती नसते, अंदाज नसतो म्हणून कमी गोष्टींची भीती वाटते, अगदी वाटलीच तरी खूपच कमी भीती वाटते. उंच उडी मारली तर आपण पडू हा अंदाज नसतो, पडले तर किती लागेल ह्याची जाण नसते, त्यामुळे असल्या गोष्टींची भीती वाटतच नाही. त्याउलट मोठेपणी मात्र अनुभव, माहिती ह्या मुळे बरेचदा मदत होते, पण कधी कधी त्याचमुळे भीती पण वाटते. म्हणतात ना कि अज्ञानात सुख असते तसे. म्हणजे जोरात पळालो तर तोल जाऊन पडू ह्या ज्ञानामुळेच पळायची भीती वाटते. माणसांचे जितके प्रकार, तितकेच किंवा त्याहून जास्तीच, त्यांना वाटणाऱ्या भीतीचे प्रकार.

आणि हल्ली तर काय इंग्रजी मधे तर प्रत्येक प्रकारच्या भीतीला वेगळे नाव. मला तर ती नावे बघून आणि वाचून त्या नावांचाच ‘फोबिया’ आलाय.

कोणाला झुरळाची भीती वाटते तर कोणाला वाघाची. कोणाला अंधाराची तर कोणाला लख्ख उजेडाची, कोणाला गर्दीची तर कोणाला एकटे राहण्याची, कोणाला बोलण्याची तर कोणाला गप्प बसण्याची असे किती म्हणून प्रकार सांगू. एखाद्याला उंचच उंच हवेत उडायला आवडते तर एखाद्याला जिन्याच्या चार पायऱ्या चढायची सुद्धा भीती वाटते. म्हणजे एखाद्याला एखादी गोष्ट भीतीदायक वाटत असेल तर ती खरंच भीतीदायक असते का? कारण दुसऱ्याला त्याच गोष्टीची भीती तर वाटत नाहीच, उलट आनंदच होतो त्या गोष्टीपासून. एखाद्याला समुद्रात पाय बुडवायची सुद्धा भीती वाटते तर दुसऱ्याला लाटांमागून लाटा अंगावर झेलण्याची उर्मी असते. एखाद्याला जंगलात जायच्या कल्पनेनेसुद्धा घाम फुटतो तर दुसऱ्याला लांब जंगलात, निसर्गाच्या सानिध्यात, एकांतात राहायचे स्वप्न असते. मग वाटते की एखादी गोष्ट न आवडणे इथपर्यंत ठीक आहे पण त्या गोष्टीची भीती वाटणे हे काही वेगळेच आहे. आश्चर्य वाटते नाही का की एकच गोष्ट, एकाला आनंद देते तर दुसऱ्याला भिववते. असं कसं होतं हे? पण एकुणात काय तर शेवटी भीती ही वाईटच. भीतीमुळे आयुष्यातील आनंद कमी होतो, भीती दुःखाला कारणीभूत होते, भीतीमुळे जगणे अवघड होऊन बसते वगैरे वगैरे वगैरे.

मग मी जरा सिरीयसली ‘भीती’ बद्दल ‘न भिता’ विचार करायला लागले. विचार करता करता वाटले की ‘बिचारी भीती’, किती बदनाम आहे नाही! जरा जास्तीच बदनाम झालीये का? म्हणजे बघा हं, कित्येक गोष्टी आपल्याला ‘भीती’ वाटते म्हणून करता येत नाहीत हे बरोबर पण अहो कित्येक गोष्टीत आपल्याला ‘भीती’ वाटते म्हणूनच आपण वाचतो, बचावतो. नाही पटत ? थांबा उदाहरणच देऊन सांगते. आपण खोल समुद्रात गेलो तर पोहताना आपली ताकद कमी पडेल व आपण बुडू या भीतीमुळेच तर आपण आपल्या ताकदीचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे पाण्यात शिरतो आणि म्हणूनच बुडण्यापासून वाचतो. ही भीतीच जर नसती तर आपल्याला वेळीच थांबवायला, सावरायला अगदी वाचवायला सुद्धा जागोजागी कोणी आले असते का ? म्हणजे बघा ना की आपण ऍक्सिलरेटर वापरून गाडीचा वेग वाढवतो आणि जेव्हां थांबायचे असते तेव्हां ब्रेक लावतो, म्हणजेच ब्रेकच्या जीवावरच तर आपण ऍक्सिलरेटरचा हवा तसा वापर करू शकतो. मग भीतीचेही असेच आहे का? भीती म्हणजे आपल्या आयुष्याचा ब्रेक आहे का? ह्या ब्रेकच्या जीवावर, वेळ पडेल तेंव्हा हा ब्रेक वापरूनच आपण आपल्या आयुष्याला हवा तसा, हवा तेव्हढा आणि हवा तितका वेग देऊ शकतो! भीती आहे म्हणूनच तर आयुष्याला बंध आहेत, आयुष्यावर निर्बंध आहेत. भीतीच्या काठांमुळेच आयुष्याची नदी वेडीवाकडी वाहवत जात नाही. भीती आहे म्हणूनच वेग आहे, भीती आहे म्हणूनच धाडस आहे. थोडक्यात काय तर भीती हा बेलगाम आयुष्याचा लगाम आहे अशा दृष्टिकोनातून आता ‘भीती’कडे बघावेसे वाटते.

म्हणूनच मग पुढचा विचार मनात येतो कि ‘भीती’ म्हटले कि सगळ्याच ‘भीतींना’ भ्यायची जरुरी आहे का? आयुष्याला ‘मारक’ ठरणाऱ्या, ‘अडथळा’ आणणाऱ्या ‘भीतींवर’ जरूर मात करावी, पण ‘ब्रेक’ असणाऱ्या ‘भीतींचा’ मात्र आपल्या ‘ऍक्सिलरेटर’ साठी उपयोग करून घ्यावा. ह्या भीतीच्या जोरावरच, कॅलक्युलेटेड रिस्क घेऊन प्रयत्न करावेत, धाडसी निर्णय घ्यावेत. भीतीचा उपयोग संभाव्य संकटाचा अंदाज घेण्यासाठी करावा. भीतीचा उपयोग येणारे खड्डे ओळखण्यासाठी आणि मग ते टाळण्यासाठी करावा. भीतीला भ्यायचे नाहीच, भीतीची भीती कधीच बाळगायची नाही. उलट भीतीचा आपल्यासाठी उपयोगच करून घ्यायचा असेच वाटते..

आता थोडे विषयांतर करून एक माझ्या अगदी आवडीची भीती मी तुम्हाला सांगणार आहे. माझा नातू नुकताच वर्षाचा झाला. तो मला वाघोबा बनून गुरगुरून दाखवतो आणि मग मी प्रचंड ‘भ्यायल्याचे’ नाटक करते, मग तो खुदुखुदु हासत माझी समजूत काढतो. तसंच तो लपून बसला की मी घाबरल्याचे, भ्यायल्याचे नाटक करते आणि मग मी पुरेशी घाबरले कि मगच तो पळत पळत येऊन माझ्यासमोर उभा राहतो. ही आणि अशी भीती असायला मला कधीही आवडेल, मी आयुष्यभर हे असे घाबरायला, भ्यायला तयार आहे. ही भीती मी कायमची माझ्या अगदी जवळ ठेवणार आहे.

- योगिनी लेले



1 टिप्पणी: