तमसो मा ज्योतिर्गमय

महाराष्ट्र नुकताच जागतिक स्तरावर गाजला तो राज्यस्तरीय निवडणुकांनंतर घडलेल्या मूल्यहीन राजकारणामुळे. The Economist नी सुद्धा झाल्या प्रकाराची दखल घेतली. भाजपा-सेना युतीला मतदारांनी निवडून देऊनही आपापसातल्या स्पर्धेमुळे युतीनं हा कौल जुमानला नाही. रजनीकांतच्या रजतपटावरच्या कौशल्यालाही लाजवतील अशा कोलांट्या उड्या मारत राजकीय नेत्यांनी एक नवीच युती तयार करून सर्वांना स्तंभित करून टाकलं. वाॅटस्ॲप ग्रुप्सवर या राजकीय नाट्यामुळे चैतन्य होतं. भक्त आणि अभक्तांची जुंपली होती. पण त्याचबरोबर एक हाही सूर ऐकू येत होता: जर निवडणुकीनंतर राजकीय पक्ष आणि नेते सत्तेकरता मतदारांच्या मताची पायमल्ली करणार असतील तर मतदान करायचं तरी कशाला?

अशा परिस्थितीत राज्य / देशाच्या राजकीय भवितव्याविषयी निराशा बळावली तर नवल नाही. हैद्राबादच्या प्राण्यांच्या डाॅक्टरच्या बलात्काराच्या संतापजनक प्रकरणामुळे स्त्रियांच्या सुरक्षिततेविषयीही निराशा पसरली आहे. अर्थव्यवस्था मंदगती गजगामिनी होऊ लागली आहे. अशा देशस्तरावरच्या प्रश्नांपासून ते परीक्षेतलं अपयश, अपघात-अपंगत्व-आजारपण-मृत्यू, नोकरीतली आव्हानं, सामाजिक बेअब्रूची भीती अशा वैयक्तिक समस्यांमुळेही नैराश्य येऊ शकतं. 

हल्लीचं जग हे अतिशय वेगवान झालंय. सैन्याच्या भाषेत याला VUCA म्हणतात. Volatile, Uncertain, Complex, Ambiguous अशा प्रकारचं जग! अशा परिस्थितीत सतत चांगले-वाईट बदल होणार. त्यांना सामोरं जाणं, बदलत्या परिस्थितीनुरूप आपलं वागणं बदलून आपल्या उद्दिष्टाच्या दिशेनी पुढे सरकत राहणं महत्त्वाचं. याकरता अंगात झुंजारपणा (Resilience) हवा. मनोविज्ञानाच्या या क्षेत्रातले संशोधक झुंजारपणाची व्याख्या अशी करतात: प्रतिकूल परिस्थितीत सुरूवातीला काहीशी माघार घेऊनही पुढे सरकण्याकरता सकारात्मक लवचिक वर्तन अंगिकारण्याची क्षमता. ही संशोधनशाखा तीन स्व झुंजारपणाचे महत्त्वाचे घटक मानते: सकारात्मक स्वसंवेदना, स्वनेतृत्व, आणि स्वनियोजन. त्याकडे एक नजर टाकणं निराशेवर मात करण्याच्या दृष्टीनं उपयोगी ठरू शकेल. 

सकारात्म स्वसंवेदना: हे आत्मभान. आपल्यातल्या क्षमतांची वास्तविक जाणीव. त्यांच्या बळावर आपण प्रतिकूल परिस्थितीवर मात करू शकू हा आत्मविश्वास. आपल्याला आपल्या वागण्यात योग्य तो बदल करता येतो याची खात्री. 

स्वनेतृत्व: आपल्या वैयक्तिक ध्येयाविषयी असणारी स्पष्टता. त्या ध्येयामुळे मिळणारी उर्जा. अडचणीच्या वेळी इतरांना दोष देण्याऐवजी ती सोडवण्याकरता आपण काय करू शकतो ही भूमिका.

स्वनियोजन: एखादा गुंतागुंतीचा प्रश्न सोडवण्यासाठी त्याला छोट्या भागांमधे विभागणं, प्रश्न सोडवण्यावर लक्ष केंद्रित करता येणं, वेळेचं नियोजन आणि ठरवलेल्या कामांकरता स्वत:ला जबाबदार धरता येणं.

ह्या प्रत्येक स्व मध्ये आपण कुठे आहोत हे तपासून पाहणं आणि त्यातली आपली तयारी सतत उंचावत ठेवणं हे निराशेवर मात करण्याकरताच नव्हे तर निराशा येऊ न देण्याकरता आवश्यक असलेली सकारात्मक मानसिकता घडवण्याकरताही आवश्यक आहे. 

राजकीय नैराश्यानं आपण या चर्चेची सुरूवात केली होती. महाराष्ट्रापेक्षाही भयानक राजकीय परिस्थितीतही स्वातंत्र्यवीर सावरकर जे लिहून गेले ती मानसिकता जोपासणं ही निराशेवर मात करण्याची गुरूकिल्ली:

अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला!
मारिल रिपु जगती असा कवण जन्मला?

- नितीन मोरे


२ टिप्पण्या:

  1. Quote" प्रत्येक स्व मध्ये आपण कुठे आहोत हे तपासून पाहणं आणि त्यातली आपली तयारी सतत उंचावत ठेवणं हे निराशेवर मात करण्याकरताच नव्हे तर निराशा येऊ न देण्याकरता आवश्यक असलेली सकारात्मक मानसिकता घडवण्याकरताही आवश्यक "unquote.. ,फार महत्त्वाचे आणि जगताना आवश्यक . छान झाला आहे लेख.

    उत्तर द्याहटवा