ऋतुगंध शिशिर वर्ष १२ अंक ६
नुकतीच धाकट्या मुलाला विमानतळावर वर सोडून आलेली अनुराधा रिकामपण आल्यासारखी सोफ्यावर बसली आणि अनेक वर्षांचा प्रवास तिच्या डोळ्यांसमोरून झटकन फ्लॅशबॅक प्रमाणे सरकला. नवऱ्याची बदली परदेशी झाल्यामुळे दोन लहान मुले पदरात घेऊन आपला देश आणि आपली माणसे सोडून वीस वर्षांपूर्वी अनुराधा नव्याने सुरुवात करायला म्हणून आली होती या देशात. काही झाले तरी आपली करिअर सोडायची नाही अश्या विचाराने धडपड्या महत्वाकांक्षीअनुराधाने संसार, मुले, आणि त्याबरोबरच कायम कामानिमित्त फिरतीवर असलेला नवरा अशी तारेवरची कसरत स्वतःची नोकरी सांभाळून समर्थपणे केली. पहाटेचा गजर झाल्यापासून रात्री पाठ टेकेपर्यंत श्वास घ्यायलाही फुरसत नसायचीअनुराधाला. शिवाय शनिवार रविवार मुलांचे एक्सट्रा क्लास, कधी कुणाकडे चहा किंवा डिनर ला जाणे-येणे याबरोबरच स्वतःच्या नोकरीतल्या वाढत्या जबाबदाऱ्या आणि त्या ओघाने वाढलेले काम हे सुरूच होते. हे सगळे करता करता वीस वर्षे कशी भराभर उलटून गेली ते तिला पत्ताही लागला नाही.
स्वतः उच्च शिक्षित असलेल्या अनुराधाने अर्थातच आपल्या दोन्ही मुलांनाही भरपूर शिकू द्यायचे,आणि मुख्य म्हणजे त्यांच्या मनाप्रमाणे क्षेत्र निवडू द्यायचे असे आधीपासूनच ठरवून ठेवले होते. मोठा मुलगा बारावीनंतर दूरदेशी चांगल्या युनिव्हर्सिटीत प्रवेश मिळवून शिकायला गेला आणि मनासारखी नोकरी मिळाल्याने तिथेच रमला. धाकटाही मोठ्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवून आज निघाला आणि त्याला विमानतळावर निरोप देऊन नुकतीच घरी येऊनअनुराधा स्वस्थ बसली होती. अनेक वर्षे मुलांच्या आवाजाने सतत गुंजत असलेले भरलेले घर आणि त्यांच्या वाढत्या वयाबरोबरच्या वाढत्या इच्छा-गरजांनी व्यस्त झालेले आयुष्य आता अचानक रिते झाल्यासारखे झाले.अनुराधा काहीशीअंतर्मुख झाली.
'सुख हे मानण्यावर आहे'. ऐकायला छान वाटते ना? पण, "तू आता स्वतःचे आयुष्य जगायला शिक, आपला आनंद आपणच शोध"असा सल्ला जर कुणी अनुराधाला त्यावेळी दिला असता, तर तिला कदाचित त्या मनस्थितीत तो खूपच आदर्शवादी आणि थोडासाअवास्तविकच वाटला असता. मनुष्य हा सवयीचा गुलाम आहे आणि त्या वृत्तिनुसार, कुठलाही बदल आयुष्यात पट्कन आणणे हे त्याला थोडेसे जडच जाते. त्यामुळे काही दिवस मध्ये जाऊ दिल्यानंतर "अनुराधाला हे स्वानुभवावरूनच कळलेले उत्तम" असा विचार करून, अनुराधासारख्याच परिस्थितीतून गेलेल्या तिच्या सूज्ञ मैत्रिणीने "सध्या मौन साधलेले बरे" असा विचार केला. आणि तसेच घडले. काही दिवसांनंतर अनुराधाला स्वतःच जाणवले, कि अरेच्या! लग्नानंतर पहिली दोन वर्षे आपण आणि नवरा असे दोघेच तर होतो की! तेच दिवस आता परत आले आहेत. एक प्रकारे हा आपला दुसरा मधुचंद्रच जणु!
आयुष्य अनेक टप्प्याटप्प्यांचे बनलेले आहे. एका टप्प्यातून पुढच्या टप्प्याकडे वळताना त्या दोन टप्प्यांच्यामध्ये एक बारीक रेषा आखलेली असते. त्या रेषेच्या अलीकडेच राहून दुःखाला आमंत्रण द्यायचे, कि ती रेषा अलगदपणे आनंदाने पार करून सीमोल्लंघन करायचे, हा निर्णय आपल्याला वेळोवेळी घ्यावा लागतो. मध्यम वयही त्यातलीच अशीच एक रेषा ... आयुष्याच्या विषुववृत्तावर आखलेली. या रेषेच्या अलीकडे असताना ती पार करून पलीकडे जाण्याची कल्पना जरा नकोशी आणि थोडीशी दडपण आणणारी वाटते. त्या रेषेच्या पलीकडले जग कसे असेल याच्या पूर्वसंकल्पनांनी मनात गर्दी केलेली असते. मुले, नवरा, आणि नोकरी या केंद्रबिंदूभोवती संसार नामक सूर्यमालेतल्या ग्रहासारखे अविरत फिरत असताना अचानक त्या परिक्रमेच्या गुरुत्वाकर्षणातून बाहेर फेकले गेल्यावर आपले काय होईल, याची अनामिक भीतीही कुठेतरी असते. पण ती रेषा प्रत्यक्षात पार केल्यावर मात्र हे लक्षात यायला वेळ लागत नाही, कि या विषुववृत्ताच्या पल्याडचे जग किती स्वच्छंदी आहे ते. ना वेळेचे बंधन ना कुणाची बांधिलकी. ना मुलांच्या परीक्षांचा ताण, ना रोजची धकाधकी.
असा विचार केल्यानंतर मात्र जणु बालपणीचे मुक्तांगण पुन्हा समोर येऊन उभे ठाकले अनुराधाच्या, आणि मनसोक्त बागडण्याचे आवाहन करू लागले. जुन्या बालपणीच्या मैत्रीचे निसटलेले संबंधांचे धागे पुन्हा जुळू लागले. मनाच्या कप्प्यात एका कोपऱ्यात घडी करून ठेवलेले जुने छंद पुन्हा जोपासण्याचे बंडखोर मिश्किल आव्हान मन देऊ लागले. तीच पहाटेच्या गजरामुळे नकोशी वाटणारे सकाळ आता निवांत चहावर चहा, आणि वर्तमानपत्राच्या सहवासात प्रसन्न वाटू लागली. गोड साखरझोप आता दुपारीही लागू लागली. नवनवीन प्रकारची कार्डिगन्स, जॅकेट्स आणि मफलरची पूर्वी राहून गेलेली हौस आता नियमित गरजेच्या रूपात का होईना पण छानपैकी भागू लागली. एका टप्प्याला आनंदाने निरोप देऊन, दुसऱ्या टप्प्याची सुखद सुरुवात झाली. भूगोलाच्या पुस्तकात लहानपणी वाचल्याप्रमाणे विषुववृत्ताच्या पल्याड गेल्यावर अनुराधाच्या आयुष्यात मौसम बदलू लागले खरे! पेला अर्धा रिकामा कि अर्धा भरलेला हे ज्याच्या त्याच्या दृष्टिकोणावर अवलंबून आहे. शेवटी, विषुववृत्ताच्या पल्याड अजून अर्धे जग बाकी आहेच की!
-डॉ. अर्चना कुसुरकर
फारच सुंदर आहे लेख अर्चना.तुझाच वाटतो.मला मराठी भरभर जमत नाही ग.खूप लिहायचे होते
उत्तर द्याहटवाधन्यवाद
उत्तर द्याहटवाआयुष्य सुंदरच असते ..दृष्टीकोन महत्वाचा. छान उदाहरण दिले आहेस ..पन्नाशीला आलेल्या सर्व बायकांनी वाचावा असा लेख आहे हा.
उत्तर द्याहटवा