ऋतुगंध वर्षा वर्ष १३ अंक ३
आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांत आनंदाची व्याख्या बदलत जाते. लहानपणी खाऊ व खेळणी आनंद देतात. तारूण्यात खूप मित्रमैत्रिणी असणं व महागडी उपकरणे वापरता येणं याने आपण सुखावतो. म्हातारपणात तब्येत बरी राहणं, कुटुंब आपल्या जवळ, सुखाने असणं महत्त्वाचं असतं. पण तारूण्या पासून वार्धक्यापर्यंत नेणाऱ्या मध्यम वयाचं किंवा ‘मिडिल एज’ नावाच्या काळाचं काय? मुलांचं संगोपन, म्हातार्या आई-वडिलांचा सांभाळ व स्वत:चं करियर जपणं ह्या सगळ्यात हा काळ निघून जातो. ह्या कारकीर्दीच्या काळात आपण सूख शोधतो तरी का नाही हे सांगणं कठीण आहे. एव्हाना तुम्ही माझ्या वयोगटाचा अंदाज लावला असेलच.
असं म्हणतात की चाळिशीत आयुष्य नव्याने सुरू होतं, ‘लाइफ बिगिन्स ॲट फोर्टी’. हे ब्रीद इतकं प्रचलित झालं आहे की वयाचा हा टप्पा गाठताच अनेकांच्या अपेक्षा उंचावतात. अहो, आयुष्य नव्याने सुरू होत असतं ना... कदाचित पहिली नोकरी... व छोकरी... याची जी नवलाई विशीत जाणवली होती ती परत चाळिशीतही जाणवेल?
मग काय विचारता. पौगंडावस्थेत उडणार नाही असा मनाचा गोंधळ उडतो. आपण चाळिशी गाठल्यावर वा ओलांडल्यावर आपली मुलं पौगंडावस्थेत आलेली असतात पण आपलेही‘अरमान जवान’ वगैरे असतातच. पाल्यांना बॉयफ्रेन्ड वा गर्लफ्रेंड चे वेध लागलेले असताता. म्हणजे, मुलींना बॉयफ्रेंडचेच व मुलांना गर्लफ्रेंडचेच वेध लागतील असंही खात्रीने सांगता येत नाही. पण ते जाऊ द्या. तर पाल्यांना गोड गुलाबी स्वप्न पडायला लागलेली असताना बहुतांश आयांनाही टायगर श्रॉफची झलक पाहून गुदगुल्या होतात. आणि ‘बाबा’ लोकं काय तर ‘योगा से होगा’चा ध्यास घेतात! घरात एकावेळी इतके हारमोन्स! एका म्यानेत दोन... नाही, तीन-चार तलवारी? छे!!
मुलगा मित्रांबरोबर पबच्या वाऱ्या करू लागतो तर आपल्यालाही लेटेस्ट डान्स मूव्ज् आत्मसात कराव्याशा
वाटतात. मुलाला एड शियरनचं नवीन गाणं विचारावं तर, “बाबा, राहू द्या ना. ते ‘जाता पंढरी’च बरंय तुमच्यासाठी”. मुलीला आपला ‘टॉप’ होतो म्हणून आई उगाच स्वत:ला‘सोला बरस की’ समजून सुखावते तोच लेकीचा शेरा येतो, “तू आता हे असले टॉप्स घालू नकोस हां..?” सरासर नाइन्साफी! मग पाल्य नॉइज् कॅन्सलेशन हेडफोन्स लावून ‘के-पॉप’ मधे गुंग होतात आणि आजी/आजोबांच्या खोलीतून भजनाचे ‘के’विलवाणे स्वर ऐकू येतात. मधल्या मधे, ‘आई-बाबांच्या ‘डियर जिंदगी’ ला म्यूट करावं लागतं.
घोडं पेंड कुठं खातं माहित आहे का? ह्या त्रिशंकू अवस्थेतही मनात कुछ कुछ तरी होतच असतं ना. मग ही कुचकुच शमवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग सुरू होतात. योगा, एरोबिक्स, ट्रेकिंग हे काही वर्षांपासून चलनात आहेतच. शिवाय कुणी उच्च शिक्षण घेऊन करियरला एक नवीन ‘बिगिनिंग’ देऊ पाहतात. कुणी एखादी वेगळी कला शिकू पाहतात... अगदी पाक-कला सुद्धा - आणि ‘पाक’ म्हटलं की गडबड आलीच म्हणून समजा - असो, राजकीय मुद्दे जाऊ द्या ना. आपण कौटुंबिक मुद्यावर लक्ष केंद्रित करू. तर,पाकशास्त्राचे धडे घेणारे वीर मित्रांसमोर - पण त्यांच्या बायकांना उद्देशून - बढाया मारतात: “छे! वरण-भात काय पाक-कला आहे? मोमोज् करता येतात का तुला?” हे त्यांच्या स्वत:च्या बायकोने ऐकायचा अवकाश. यथाशक्ती-यथामति किचन सांभाळणाऱ्या श्रीमतींना मिरची लागते: “मोमोज् करतायत! त्यानंतर केलेला पसारा आवरायला बाळ्याची आई
येत नाही. तो मलाच साफ करावा लागतो, याची भ्रांत
कुणाला!” कहानी घरघंटी... म्हणजे, ‘घर घर की’ हो. तर, हल्ली बघा मॅरेथानचं बरंच वारं आहे. ह्यात चाळिशीतले अनेक ‘बिगिनर्स’ उडूनही गेलेत. धावणं ह्या क्रिडेबद्दल काही टिपण्णी नाही हो, पण कसं आहे की तुम्ही चाळिशीत हाफ- मॅरेथॉन धावता म्हणून काय विशीतल्या तरूणीला, ‘तो’ प्रश्न विचारून तिला “हो म्हण”, असा आग्रह करू शकता का? त्यासाठी तुम्ही “सो-मण” असावं लागतं. सगळं नुसतं स्वप्नील भ्रमण!
अठरा-वीस ह्या वयात ज्या कला-क्रीडा अवगत होत्या त्या कला पन्नाशी साद घालत असताना “संघ दक्ष!”च्या
आदेशावर निमूटपणे उभ्या राहणार आहेत का? हे म्हणजे नावालाही नाही गंध, पण कस्तुरी मृग म्हणवून नसती बुडं हुंगत फिरणं. अशात नेमका एक जुना मित्र भेटतो किंवा मैत्रीण भेटते.त्यात पुरूषाला जर मैत्रीण पाकशास्त्राच्या वर्गात किंवा स्त्रीला मित्र जॉगिंग करताना किंवा बॅंकेत भेटला तर झालं... “अरे, कॉलेजमधे कधी कळू दिली नाहीस तुझी स्वयपाकाची आवड. माझा नवरा अजिबात मेट्रोसेक्शुअल नाही!” ही गोष्ट वेगळी
की तिने ह्याला कॉलेजमधे कधीच ‘घास’ दिलेली नसते. किंवा...
“अगं, बँकेत कशी काय?”
“माझ्या डीमॅट अकाउंटचा गोंधळ आहे”
“काय ट्रेडिंग सुरू करतेस का?”
“सुरूवात काही वर्षांपूर्वीच केली... आता ऑपशन्स”
“सॉलिड! यू वेअर गुड विथ नंबर्स पण हे म्हणजे छानच !” ह्या मूर्खाने कॉलेजात फक्त हिच्या फिगरच्या नंबर्स भोवती बीजगणित, अंकगणिताचे सिद्धांत मांडले. ह्याला काय जमणार आहेत ‘नंबर्स’. मग काय राव, वयाचं जे ओझं शरीरावर जाणवू लागलेलं असतं ते एकदम नाहीसं होतं. चित्रपटात न पटलेली ‘माया मेमसाब’ स्त्रियांच्या मनी गाऊ लागते: “ये शहर बडा पुराना है”, तरी पण “इस दिल मे बस कर देखो तो!” तर असली शहरं खरोखर बसवली नाही तरी हे छोटे छोटे
अनुभव अंगावर शहारे देऊन जातात. हे वयच असं असतं. आयुष्याची सांजवेळ चाहूल देऊ लागते पण ही चुकून पहाट वाटते आणि उगाच चिवचिवाट वाढतो. सारा खेळ सावल्यांचा... नोकरी धंद्यात चुरस वाढलेली असते;
म्हातारपणीची आजारपणं, मुलांच्या शिक्षणाला लागणारा पैसा याची धास्ती मनात असते... अशात पाकशास्त्राच्या वर्गात मैत्रीणीबरोबर नव्या नवलाईची डिश तयार केली काय किंवा मित्राबरोबर एक ऊब देणारी थंड बियर प्यायली काय... कुठं बिघडलं हो. आपल्यातल्या सिमरनचा आनंद नाकारू नका...तिलाही जगू दे आपली जिंदगी!
- केशव पाटणकर
खूप छान... सुंदर लिहिलंय आपण..खरंतर एका अतिसंवेदनशील पण कायम दुर्लक्षित असणाऱ्या विषयावर गंमतशीर भाष्य करतानाच,आपण त्यातलं वास्तव ही तितक्याच चतुराईने वाचकांच्या निदर्शनास आणलंय..हे खरं आहे वयात येणाऱ्या मुलांच्या हार्मोनल बदलांबाबत नेहमी जागरूक असणारे पालक स्वतः मध्ये चाळीशी नंतर होणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष करतात विशेषतः स्त्रिया आणि मग नैराश्याने ग्रासल्या जातात. आपण या वयातली घुसमट किंवा मानसिक स्थिती म्हणूया अगदी छान मांडलीये.. धन्यवाद
उत्तर द्याहटवाएवढं लक्ष देऊन वाचल्याबद्दल धन्यवाद, प्रियंका.
उत्तर द्याहटवामी खरवडलेलं तुम्ही वाचताय ह्याने बरं वाटलं
उत्तर द्याहटवाछान! आजच्या काळात चाळीशी आणि पन्नाशी हा वयोगट अगदी minority पक्षात जमा आहे... ह्या condition चं छान वर्णन केलं आहे!
उत्तर द्याहटवाChaan lihila aahes!! Chalishit aslyaamule malaa jaast aavadlay 🤣
उत्तर द्याहटवा