स्वगत - आनंदघन

ऋतुगंध वर्षा वर्ष १३ अंक ३

मानवी मनात भावनांचे अनेक तरंग उमटत असतात. कधी आसपासचा निसर्ग, माणसे,घटना,वस्तू ह्या कारण असतात तर कधी आठवणी! हे तरंग शब्दांत उतरवता येतील का, ह्याचाच ध्यास प्रत्येक लिहू पाहणाऱ्याला असतो. कधी ते जमल्या सारखे वाटते, तर कधी शब्दांत उतरेपर्यंत भावनांनी वेगळेच वळण घेतलेले असते. ह्या भावनांविषयी, त्या निमित्ताने स्वतःशी होणाऱ्या संवादाविषयी वृंदा टिळक लिहिणार आहेत,आपल्या
'स्वगत' ह्या सदरात. 

---------------------------------------------------------------- 

आनंदाचा रंग कोणता असे विचारले तर मी म्हणेन सूर्यकिरणांसारखा सोनपिवळा.. झळाळता!!

आनंद खरोखरच सगळे उजळून टाकतो. कानाकोपऱ्यात पोचतो. तिथे मग चिंतेला, दुःखाला जागाच उरत नाही. त्या आनंदी मन:स्थितीत सगळ्या अडचणी क्षुद्र वाटायला लागतात. आपण सगळे अडथळे पार करु शकू असा विश्वास वाटायला लागतो. 

गाडी जेजू बेटामधल्या त्या रस्त्यावरुन जात असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूने असा आनंदोत्सव साजरा होत होता. दोन्ही बाजूने साधारण पाच सात फूट उंचीची झुडपे ,त्यावर फुललेली सोनपिवळी कॅनोलाची फुले. त्याच्यामागे फुलांचा बहर संपत आलेले, फुले जाऊन हिरव्या पानांनी लगडलेले साकुराचे वृक्ष . त्यातील काही वृक्ष अजूनही गतवैभवाच्या खुणा वागवत अंगाखांद्यावर थोडी फुले मिरवणारे. सुखद थंड हवा.. हे दृश्य चांगले दोनतीन किलोमीटर गेलो तरी असेच.... पाहून माणूस वेडे होईल नाहीतर काय??!!

हे वेड काहीच नाही अशी अवस्था लवकरच होणार होती. एका वळणावर वळून गाडी थांबली . समोर एक भिंत . अगदी गोडाऊन किंवा कारखान्याची असावी तेवढीच रुक्ष,अरसिक भिंत. मी मनात म्हटले ,हा आत्तापर्यंतच्या सौंदर्याला उतारा . आम्ही गाडीतून उतरलो . दहा पावले चालून गेलो,भिंत संपली आणि समोर दिसलेले दृश्य ... स्मरणशक्ती शाबूत आहे तोपर्यंत विसरता येणार नाही असे.. 

ना. वा. टिळकांच्या कवितेत म्हटल्याप्रमाणे, 

आकाशात फुले,धरेवर फुले,वाऱ्यावरीही फुले 
माझ्या गेही फुले ,मनातही फुले ,भूगर्भी सारी फुले, 
असे दृश्य!! 

जर जाईल तिकडे वाऱ्यावर डोलणारी पिवळ्या फुलांची शेते, दूरवर फिरणाऱ्या पवनचक्क्या. हे सगळे म्हणजे हि फुले आणि त्या पवनचक्क्या खेळताना बागडत इकडेतिकडे जाऊ नये, कुठे दूरवर हरवून जाउ नये म्हणून राखण करत असलेले डोंगरआजोबा. 

ह्या दृश्याच्या वेल्हाळपणामुळे मवाळ झालेला सूर्य आणि ह्या दृश्यावर पाखर घालणारे वत्सल सावळे ढग. त्या फुलांना सुगंध नव्हता पण माझ्या आनंदाला सुगंध होता. कल्पनेत सुगंध होता. त्यामुळे त्याच कवितेतील पुढची ओळ,



माझे चित्त भुले, सुगंध सुटले ,हे विश्व आनंदले .. 
हि ओळ पण अगदी अनुभवता आली!!

इतके सुंदर दृश्य तुम्हाला मनाच्या एका आनंदी,कृतज्ञ अवस्थेत घेऊन जाते. "हे माझ्यास्तव .. हे माझ्यास्तव " असे अगदी प्रकर्षाने जाणवते. इंदिरा संतांची एक कविता आहे. त्यात कुब्जेला मुरलीचा रव ऐकू येतो... 'अजून नाही जागी राधा ..अजून नाही जागे गोकुळ ' हे तिला माहिती असते. आणि मग तिला कळून चुकते कि 'हे माझ्यास्तव.. हे माझ्यास्तव '. 

आपल्या आयुष्यातदेखील असे अनेक क्षण येतात . त्या ठिकाणी, त्या वेळी आपण असतो, तो क्षण अनुभवू शकतो..हे भाग्य असते. ते मनाला अगदी नेमके जाणवते. अशा प्रत्येक वेळी वाटून जाते 'हे माझ्यास्तव .. हे माझ्यास्तव " !! 

'हे माझ्यास्तव' ह्या जाणिवेत त्या क्षणावर मालकीचा भाव नसतो, हे फक्त मलाच मिळावे असा स्वार्थही नसतो, मलाच मिळाले आहे असा गर्वदेखील नसतो. असते ती फक्त , ह्या क्षणी मला मिळालेला अनुभव हा माझ्यासाठी खूप मोलाचा आहे हि कृतज्ञ जाणीव . ही 'त्या'ची जाणवलेली खूणगाठ असते. 

आरती प्रभूंच्या शब्दांत सांगायचे तर
नको नको म्हणतांना मनमोर भर रानां 
नको नको किती म्हणूं वाजणार दूर वेणु 
बोलावतो सोसाट्याचा वारा मला रसपानां 

तो ह्या सगळ्या दृश्यात होता, ह्या दृश्याच्या पारही तोच होता. त्याची वेणु वाजत होती. वाऱ्याबरोबर ते सूर माझ्यापर्यंत पोचत होते. मला कळत नव्हते त्या सुरांमागचे शास्त्र ,मला कळत नव्हता त्या सुरांचा अर्थ. पण त्या सुरांच्या अस्तित्वाच्या जाणिवेनेच मी पुरती भारावून गेले होते. 

ह्या साऱ्याच्या पार, पिसारा फुलवलेले मोर असणार आणि अज्ञात सुगंधदेखील असणार , असा आनंदलोक अनंतापर्यन्त असणार. बस.. तो दिसेल अशी पात्रता माझ्या अंगी यायला हवी. 

पण माझ्या आनंदलोकात चंद्र कधी मावळतच नाही असे कधीच का होत नाही? आनंदलोकात पूर्णत्वाने रमणे मनाला का मानवत नाही? पौर्णिमेच्या दिवशी ग्रहणाचे वेध का लागतात?आनंदात असतानाही , थोड्या वेळाने कोणती हुरहूर मनाला लागते? कोणत्या खिन्नतेची जाणीव आनंद झाकोळून टाकते? 'आहे मनोहर परी गमते मज उदास, हि भावना मनात हळूहळू पण निश्चितपणे यायला का लागते ? 

बोरकर सांगतात तसे,
झाड माझे वेडेपिसे उन्ही जळताना हसे 
रुसे धो धो पावसात चांदण्यात मुसमुसे 

आनंद अमर्याद मनात असला तरी पाय पार्थिव मातीचे असतात हेच त्याचे कारण असेल का? ह्यातून कसा मार्ग काढायचा? खिन्नतेला पळवून लावावे म्हटले तर असे पळवून लावलेले विचार पूर्णपणे जात कधीच नाहीत.. ते दबा धरून बसलेले असतात,संधीची वाट पाहत ..इतके तर आत्तापर्यंत आयुष्याने नीटच शिकवलेलेच असते.

मग आनंदाचे जसे दोन्ही हात फैलावून स्वागत करतो तसेच खिन्नतेचेही करावे का? आनंदाला म्हणतो तसेच ममत्वाने खिन्नतेलाही आपले म्हणावे का? असे करता आले तर किती छान ! मग जो बरसेल तो आनंदघनच असेल!!
वृंदा टिळक

२ टिप्पण्या:

  1. फार म्हणजे फारच तरल लेख.मनआनंदाने भरलेआणि तरिहि वास्तवाचे भान ठेवावे ते हसत स्विकारावेहि कल्पना खुप सुंदर

    उत्तर द्याहटवा