ऋतुगंध वर्षा वर्ष १३ अंक ३
“काय मना ! आज तू एकदम खुशीत दिसतोस ! काय विशेष ?”
“भारतात पावसाला सुरुवात झाली ना ! या बातमीनेच किती छान वाटतय म्हणून सांगू ! बालपणीचा पहिला पाऊस आठवतोय. तो मातीचा सुगंध, ते पावसात भिजणे ..... ” हा ऋतुगंधचा अंक पाहिलास तर त्यात हा आनंद व्यक्त करणाऱ्या छान छान कविता, लेख, चित्रे पाहायला मिळतील. बालकवींची कविता आठवते ? “हिरवे हिरवे गार गालिचे, हरीत तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती - फुलराणी ती खेळत होती”. इथे एकच ऋतू असला तरी तिकडच्या ऋतूंच्या आठवणी आपण ऋतुगंध मासिकाद्वारे जपतो आहोत ना !”
“खर आहे ! अशा कविता आणि ते बालपण आठवत ! असा आनंद उपभोगायला पुन्हा वालपणात जावस वाटत! पण इथे सिंगापूरमध्ये त्या फक्त आठवणीच राहिल्यात. या आठवणी देखील किती आनंददायक आहेत ! आपण धडपडत इथे आलो, मोठ्या आनंदाच्या आशेने आणि ते लहान सहान आनंद मात्र गमावून बसलो ! एक आनंद मिळवायला दुसऱ्या आनंदाला मुकावे लागते.”
“ते जाऊ दे ! आनंदाच्या या आठवणीवर कशाला विराजण घालतोस ? निदान आठवणीत तरी तो आनंद उपभोग! खरे आहे की हा आनंद कधी तरी संपतो. कधी असतो तर कधी गडप होतो. थोड्या दिवसापूर्वी अंगाची लाही लाही होत होती तेव्हा तो आनंद कुठे लपला होता? आधी उन्हाळा होता म्हणून तर आता वर्षा ऋतू इतका आनंददायक वाटतो ना? म्हणजे हा आनंद येणारा, जाणारा झाला की ! हा आनंद कायमचा सर्वकाळ का नाही उपभोगता येत ?”
“आपण या आनंदाचा थोडा विचार करुया. सर्वांसारखा मी सुद्धा त्या आनंदाच्या शोधात आहेच. हा आनंद कुठे असतो, कुठून प्राप्त होतो, का संपतो. हे असेच चालायचे की तो कायम उपभोगता येईल? त्याला काही उपाय आहे का? असे प्रश्न मलाही पडतात. त्या उत्तरांच्या शोधात मी जे काही माझ्या ऐकण्यात आणि वाचनात आले ते सांगतो !
प्रिय-मोद-प्रमोद
आनंद दाखवता येतो का? नाही ना ? कारण ही अशी ठोस वस्तू नाही की दाखवता येईल. पण त्याचा अनुभव मात्र सर्वांनाच येतो. आनंद झाला आहे असे आपल्या चेहऱ्यावर, आपल्या कृतीतून समजते, आपल्या आवडत्या गोष्टीची प्राप्ती झाली, प्रिय व्यक्ती भेटली, इच्छित असलेले साध्य झाले की तो जाणवतो. हा आनंदाचा अनुभव तीन टप्प्यामधे होतो असे म्हणतात. आपल्याला एखादी वस्तू, व्यक्ती हवीशी वाटणे याला प्रियत्व म्हणतात. ती कशी मिळेल, मिळेल की नाही याचा आपण विचार करु लागतो. आपले मन त्याविषयी संकल्प विकल्प करु लागते. बुद्धी त्याच्याकरिता काय करावे लागेल, फार मूल्यवान असेल तर त्याकरिता काय किंमत द्यावी लागेल, किती वेळ वाट पहावी लागेल? इत्यादि विचारात गढते. चित्त त्याचा विसर पडू देत नाही, आणि अहंकार मला ही गोष्ट हवीच आहे असा हट्ट धरून बसतो. थोडक्यात या सगळ्यामुळे आपल्या मनात खळबळ माजते, आपली मन:शांती ढळते. ती वस्तू आता नुसती समोर दिसली, आपल्या आवाक्यात आहे अशी खात्री झाली की मनाचे संकल्प-विकल्प बंद होतात. त्यावेळी की जे काही वाटते त्या अवस्थेला ‘प्रिय’ म्हणतात. ती वस्तू प्राप्त झाली, हाती आली की तिच्या मिळण्याबाबत शंका राहात नाही. आपण निश्चिंत होतो. आपल्या बुद्धीला आता काही काम राहत नाही. यावेळी जो आनंद याची होतो तो ‘मोद’ आणि त्या वस्तूचा जेव्हा प्रत्यक्ष भोग होतो तेव्हा होतो तेव्हा मात्र मन बुद्धी, चित्त अहंकार सगळे शांत होतात. ती स्थिती म्हणजे ‘प्रमोद’.
ती वस्तू खरे तर बाहेर असते, किवा एखादी खाण्याची वस्तू असेल तर तिची चव, स्वाद इत्यादी आपल्याला आनंद देतात. म्हणजे आपल्या ज्ञानेंद्रियांशी त्यांचा संयोग झाल्याने अंत:करणात आनंद प्रकट होतो, कारण मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार याची गडबड शांत होते. एखादे भव्य, दिव्य दृश्य निसर्गात दिसले की आपण आपल्याला विसरतो, केवळ त्या दृश्यात रंगून जातो, त्यावेळी आपला अहंकार लयाला गेलेला असतो. ते दृश्य आणि आपण एक होतो, मधे अहंकाराचा पडदा नसतो. त्यावेळी आतलाच आनंद प्रकट होतो.
तुला एखादी वस्तू, पदार्थ, खेळ, ठिकाण, व्यक्ती आवडते ती दुसऱ्याला आवडेल असे नाही. बरे एका वेळी ती वस्तू आवडली तरी दुसऱ्यावेळी ती आवडेल असे नाही. एखादी आवडती व्यक्ती देखील काही मतभेद झाले, भांडण झाले की डोळ्यासमोर नकोशी होते. मग प्रियत्व किंवा आनंद वस्तू मध्ये आहे का? त्या वस्तू किंवा व्यक्तीच्या निमित्ताने आनंदाची अनुभूती आपल्या आत होते. याचा अर्थ तो त्या वस्तूत नसतो. त्यामुळे तो objective नसून subjective आहे.
बर हा आनंद सर्वकाळ अनुभवाला येतो का? एखादा पदार्थ खूप खाल्ला तर त्याचा वीट येतो. जोपर्यंत सर्व अनुकूल असते तो पर्यंत सुख वाटते. अनुकूलता गेली की दु:ख होते. अनुकूल प्रतिकूल हे निर्णय बुद्धी आपल्या इच्छा, वासना आणि अहंकाराच्या कल्पना यांच्या निकषावर करते. अध्यात्मशास्त्र असे सांगते की विषयामुळे आनंद होतो, झोप सुख देते आणि आत्मा आनंदरूप आहे. पण हा आनंद होतो तो आपल्या आनंदरूप आत्म्याचा आहे. तो आत प्रकट होतो. बाहेरून काही आत येत नाही. म्हणजे आपल्या आतल्या आनंदावरचे आवरण थोड्या काळापुरते दूर होते.
ईश्वराने सर्वांना झोपेचे सुख मिळण्याची व्यवस्था केली आहे. (या देवी सर्व भूतेषु निद्रारूपेण संस्थिता |) आवडीचे विषय कितीही उपभोगले तरी शेवटी आपल्याला सगळ्यात प्रिय असते ती झोप. झोपेमध्ये कुठले विषय असतात? विषय भोगणारी इंद्रिये शांत असतात, मन, बुद्धी, चित्त आणि आपला अहंकार देखील लीन झालेला असतो. त्यावेळी जे सुख असते ते त्या सच्चिदानंद रूप आत्म्याचे असते. तुम्ही अध्यात्मशास्त्रावर विश्वास ठेवा किंवा नका ठेऊ, पण झोपेमध्ये अपार सुखाचा अनुभव येतो आणि तो आपल्याला हवा असतो हे नाकारता येणार नाही. अध्यात्म शास्त्रात झोपेचा खूप विचार केला आहे.
पंचकोश
हा आनंदरूप आत्मा कुठे आहे? आपल्याच अंतरंगात, खोल गुहेमध्ये. पण आपल्याला तो सर्वकाळ अनुभवाला येत नाही कारण त्याच्यावर आणखी चार आवरणे आहेत. त्यांनी तो झाकला आहे. आपल्या शास्त्राने या आवरणांना कोश म्हटले आहे. आपले स्थूल शरीर – जे अन्नामुळे पोसले जाते त्याला अन्नमय कोश म्हणतात. त्याच्या आत, त्याला अगदी लागून प्राणमय कोश ज्यामुळे हालचाली होतात, शरीर जिवंत राहते. त्याच्या आत संवेदना ग्रहण करणारा मन आणि पंच ज्ञानेंद्रिये यांचा मनोमय कोश. त्याच्या आत बुद्धी आणि पंच ज्ञानेंद्रिये यांनी बनलेला विज्ञानमय कोश, आणि या सर्वांच्या आत आनंदमय कोश. ही संकल्पना आपल्या समजुतीकरिता सांगितलेली आहे. प्रत्यक्ष असे कोश शरीरात सापडत नाहीत. पण झोपेमध्ये जेव्हा शरीर, मन, बुद्धी यांचा लय होतो तेव्हा विषयनिरपेक्ष सुखाचा, आनंदाचा अनुभव येतो हे मात्र खरे.
आपले सच्चिदानंद स्वरुप
सत् – म्हणजे निरपेक्ष अस्तित्व, चित् म्हणजे वस्तुनिरपेक्ष ज्ञान किंवा जाणीव आणि आनंद म्हणजे विषयनिरपेक्ष सुख. आपण वास्तविक ‘सच्चिदानंद’ स्वरुप आहोत असे आपले अध्यात्मशास्त्र सांगते. म्हणजे आपलेही गुणधर्म तसेच असले पाहिजेत. आपण आहोत हा सत् चा आणि आपण आपल्याला जाणतो हा ‘चित्’ चा गुणधर्म. हे दोन गुणधर्म अगदी स्पष्टपणे जाणवतात. आपण आपल्याला कधीच अप्रिय नसतो, आपण आपल्या आवडीचे असणे म्हणजे प्रियत्व हे आनंदाचे लक्षण आहे.
अहमस्मि सदाभामि कदाचिन्नहमप्रिय: | ब्रह्मैवाहमत: सिद्धं सच्चिदानंद लक्षणम् || ( अद्वैत मकरंद)
आपले अस्तित्व टिकवण्याची आपली खटपट, जाणण्याची, ज्ञानाची ओढ, आणि आनंद किंवा सुख प्राप्त करण्याची धडपड हे instincts आपण मूळचे स्वरुप सच्चिदानंदरूप असल्याचे सिद्ध करतात. आपल्याला आनंदाची अनुभूती मात्र अधून मधून येते कारण तो झाकून टाकला गेला आहे. त्यावर आवरण आहे. ते आवरण अज्ञानाचे म्हणजे आपण खरे कोण आहोत हे माहीत नसणे हे आहे. परमार्थ शास्त्राचा सगळा खटाटोप ते आवरण काढण्यासाठी आहे. जो आनंद आपण बाहेर शोधतो तो वास्तविक आपल्या आतमध्ये आहे. म्हणूनच तुकोबा म्हणतात, ‘तुझे आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी |’
जागेपणी आणि स्वप्नात जीव स्वत:हून दुसऱ्या गोष्टी पाहात असतो. पण झोपेमध्ये स्वत:हून सर्व अन्य गोष्टींचा जेव्हा लय झालेला असतो त्यावेळी तो स्वयंप्रकाश आत्म्याशी एकरुप होतो. त्यावेळी आत्यंतिक सुख होते. विषयनिरपेक्ष सुख होते. त्यावेळी भोक्ता, भोग्य आणि भोगक्रिया नसते. हीच आनंदाची परमावधी. हा अनुभव सर्वकाळ नसतो म्हणून त्याला आनंदाचा अंश म्हणायचे. स्वप्न आणि जागृती नसती तर झोपेला आपण ब्रह्मभाव म्हटले असते असे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. याच आनंदाच्या अंशावर जीवमात्र आपली उपजीविका करतात.
आणखी एक अतिशय सोपी ओवी ज्ञानेश्वरीत आहे. वर वर विचार केला तर कळत नाही पण त्यात खूप मोठा आशय आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतात “देखे मनुष्यजात सकळ | स्वभावत: भजनशीळ | जाहले असती केवळ | माझ्या ठायी || परि ज्ञानेवीण नासले | ..... ”. आपण सगळेच श्रीकृष्णाचे नकळत भजन करत असतो. म्हणजे श्रीकृष्ण कोण हे माहीत असणारे आणि नसणारे, त्याला मानणारे आणि न मानणारे सुद्धा. हे कसे काय? कारण इथे श्रीकृष्ण याचा अर्थ आपला सच्चिदानंदरूप, सुखरूप आत्मा. सर्वच जण सुखासाठी धडपडत असतो म्हणजे त्याचेच भजन करतो असे नाही का? कारण आपण सच्चिदानंदरूप श्रीकृष्णाचे अंश आहोत. “अहम् आत्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थित: |”, “ईश्वर: सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति |” ‘ममैवांशो जीवलोके जीवभूत: सनातन: |” आत्मारूपाने, ईश्वररूपाने आणि जीवरुपाने मीच सर्वांच्यामध्ये आहे असे गीतेमधे श्रीकृष्णाने सांगितलेच आहे.
आनंदब्रह्म
बृहदारण्यक आणि तैत्तिरीय उपनिषद (४.३.३१-३३, तै १-८) सांगते, “आनन्दो ब्रह्मेति व्यजानात् | आनन्दाद्ध्येव खलु इमानि भूतानि जायन्ते | आनन्देन जातानि जिवन्ति | आनन्दं प्रयन्त्यभिसंविशन्ति इति |” ज्यापासून ही सर्व भूते जन्माला येतात, ज्यायोगे ती जिवंत राहतात म्हणजे प्राणांना धारण करतात व विनाशसमयी त्याच्यातच विलीन होतात अर्थात उत्पत्ती, स्थिती, लय समयी ज्याच्या स्वरूपास सोडत नाहीत ते आनंदमय ब्रह्म. तेच निर्गुण ब्रह्म सगुण निराकार ईश्वर बनून सृष्टीची उत्पत्ती-स्थिती-लय करते. तेच सगुण साकार बनून राम-कृष्णाच्या रूपाने देहधारी होते आणि आत्मस्वरुपाने प्रत्येक जीवमात्रात विलसते. त्याचे स्वरुप लक्षण ‘सत्-चित्-आनंद’ हे आहे. म्हणूनच आपण ‘सच्चिदानंद रूपाय विश्वोपत्त्यादि हेतवे | तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुम: ||’ असे श्रीकृष्णाचे वर्णन करतो आणि तो आनंद आपल्या वाट्याला यावा म्हणून त्याची उपासना करतो. त्याची प्रार्थना करतो.
पापी पाप करतो तो ते स्वत:च्या आनंदासाठी, पुण्यात्मा पुण्याचरण करतो तो आनंदासाठी आणि पाप-पुण्य मुक्त ज्ञानी जे करतो किंवा करत नाही ते सारे तो निरतिशय आनंद मिळावा म्हणूनच. सारांश जीवमात्राचे आभिष्ट आनंदच आहे. सर्वांची प्रेरणा आणि फलित आनंदच आहे म्हणून परमात्मा हा आनंद, नंदन आणि नंद म्हटला आहे. सृष्टीचा आदि आनंदमय परमात्मा, अंत आनंदमय परमात्मा म्हणून मध्यही आनंदमयच असला पाहिजे म्हणून विष्णुसहस्रनामात या परमात्म्याची. ‘आनंदो नंदनो नंद:’ अशी तीन नावे येतात (विष्णु सहस्रनाम ५६) - परमात्मा आनंदाचे बीज आहे, आनंदाचा वृक्ष आहे आणि आनंदाचे फळ आहे. सर्व मिळून तो आनंदच आहे. आनंदाच्या वृक्षाचे फळ आनंदाशिवाय दुसरे काय असणार? बीज, शक्ति आणि कीलक (आधार) तिन्ही आनंदच आहे.
आनंदाचे परिमाण
भौतिक सृष्टी द्वंद्वात्मक आहे म्हणजे चांगले वाईट, अनुकूल-प्रतिकूल, सुख-दु:ख अशा विरुद्ध गोष्टींनी बनलेली आहे. आता वर्षा ऋतू सुरु होतो आहे पण त्यापूर्वी ग्रीष्म होता ना ? वसंतात फुललेली पालवी शिशिर ऋतू मध्ये झडुन जाणार आहे. प्रिय-अप्रिय, अनुकूल-प्रतिकूल, सुख-दु:ख ही द्वंद्वे आहेत. हे अनुभव एकमेकांच्या विरुद्ध आहेत. आपण साधारण आनंद शब्द सुखाच्या अनुभूतीला वापरतो. पण त्याचा खरा शास्त्रीय अर्थ आहे विषय निरपेक्ष सुख. कधीही नष्ट न होणारा सुखानुभव. आपल्याला मिळणाऱ्या सुखातून त्याची झलक आपल्याला मिळते. स्तुतिपर शब्द, संगीत, हळुवार नाजुक स्पर्श, सुंदर रूप, चवदार पदार्थ, फुलाचा सुगंध असे शब्द, स्पर्श, रूप, रस गंध या पंच विषयातून त्याची कल्पना येते. याला विषयानंद म्हणतात. हा आनंद त्या मोठ्या आनंदाचा अंश आहे. अर्थात तो जीवनात आहे म्हणून आपण जगू शकतो.
हा आनंद जर अंशमात्र मग परमानंद किती मोठा असू शकतो? त्याची कल्पना यावी म्हणून उपनिषद एक गणित मांडून दाखवते. एखादा मनुष्य सृजन आहे, सुशिक्षित आहे, तरुण आहे, उत्तम शरीरप्रकृती असलेला, उत्साही आहे, आशावंत आहे, सर्व संपत्ती ज्याला प्राप्त आहेत अशा मनुष्याचा परम आनंद ‘एक’ धरला, तर प्रजापतीचा म्हणजे हिरण्यगर्भाचा आनंद मनुष्य आनंदाच्या कितीतरी पटीने ( १०२२ ) अधिक असतो. आणि तोच आनंद जो निष्काम आणि ब्रह्मवेत्ता आहे, जो आत्मरूप झालेला आहे अशा व्यक्तीला, तसेच संतांना अनुभवायला येतो. म्हणून ‘संत आनंदाचे स्थळ | संत सुखचि केवळ | नाना संतोषाचे मूळ | ते हे संत || असे समर्थ म्हणतात. आपल्याला या आनंदाचा केवळ अंशमात्र अनुभव येतो. पण संतांनी हा आनंद जागेपणी भोगण्याची कला साधलेली असते.
पापपुण्य समसमान झाले की मनुष्ययोनीमध्ये जन्म मिळतो असे अध्यात्मशास्त्राचे म्हणणे आहे. पुण्याचे फळ सुख आणि पापाचे फळ दु:ख भोगावेच लागते. तशी ईश्वराची, प्रारब्धाची योजना आहे. संतांनाही ते चुकलेले नाही कारण तेही आपल्या सारखेच मनुष्यदेहधारी आहेत. पण त्यांची अंतरस्थिती वेगळी असते म्हणून ते संत म्हणवितात. सुखाचा तरंग किंवा दु:खाचा तरंग प्रारब्धानुसार आपल्यावर येऊन आदळतो, पण त्याचे ते लाटेत रूपांतर होऊ देत नाहीत. म्हणून ज्ञानेश्वर माऊली सांगतात, ‘सुखे संतोषा न यावे | दु:खे विषादा न भजावे |’ सुख अनुभवावे, दु:ख सहन करावे पण त्याचे संतोष आणि विषादाच्या लाटेत रूपांतर होऊ देऊ नये. ज्ञानेश्वर माऊलींनाही अनेक त्रास सहन करावे लागले हे त्याच्या चरित्रावरून दिसून येते. क्वचित् एखादे वेळी त्याचा कळस झाला की कंटाळृन ते झोपडीत जाऊन दार लावून घेतात. त्यावेळी चिमुलक्या मुक्ताई त्यांची समजून काढते. पण हा दु:खाचा तात्पुरता तरंग आहे.
आपल्यासारख्यांचा अनुभव सांगाताना तुकाराम महाराज म्हणतात ‘सुख पाहता जावापाडे दु:ख पर्वताएवढे.’ तर गदिमा म्हणतात, ‘एक धागा सुखाचा शंभर धागे दु:खाचे’. पण संतांचा स्वत:चा अनुभव याच्या उलट आहे. म्हणून समर्थ म्हणतात ‘जो जनामध्ये वागे | परी जनावेगळी गोष्टी सांगे | अंतरी जयाचे ज्ञान जागे | तोचि साधू ||” संतांचे अनुभव आपल्या विपरीत असतात कारण ते आत्मस्वरूपाविषयी जागे असतात. त्यामुळे इतकी दु:खे सहन करूनही ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, “आनंदु रे आजि आनंदु रे | सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदु रे ||”, देह जायची वेळ आली तरी नामदेव महाराज म्हणतात “काळ देहासी आला खावो | आम्ही आनंदे नाचू गाऊ |”, मी आनंदात मी नाचतो आणि गातो आहे, कारण देहाच्या बेडीतून सुटून त्या परमात्म्यात विलीन व्ह्यायची वेळ आली आहे.
आनंदाचा डोह
एवढे दारिद्र्य असताना, दुष्काळात धंदा बुडाला असता तुकाराम महाराज ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ असे कसे म्हणू शकतात ? त्यांनी तर शिवाजी महाराजांनी पाठवलेला नजराणादेखील परत केला आहे आणि धंद्याचे दिवाळे निघालेले आहे. तरी ते “बरे झाले देवा निघाले दिवाळे | बरी या दुष्काळे पीडा केली ||” असे म्हणतात. कारण बाहेर कशीही परिस्थिती असली तरी अंतरंगात उपनिषदात जो आनंद सांगितला त्याचा सतत अनुभव आहे. तोच तुकारामांचा आनंदाचा डोह आहे. ते म्हणतात,
आनंदाचे डोही आनंद तरंग | आनंदची अंग आनंदाचे ॥१ ॥
ब्रह्मानंदाच्या डोहावर विषयापासून होणारा आनंद तरंगाप्रमाणे आहे. त्यामुळे होणारा वैषयिक आनंद ब्रह्मानंदाचा अंश (एक अंग) आहे. पण या आनंदाच्या डोहात डुंबायला मिळाल्यावर त्यांची काय अवस्था झाली तिचे वर्णन करता येत नाही म्हणून ते म्हणतात,
काय सांगू झाले कांहिचिया बाही | पुढे चाले नाही आवडीने ॥२ ॥
मला या अधिष्ठानभूत आनंदाची ओळख झाल्यामुळे माझी अवस्था काहीशी भलतीच झाली आहे. तो आनंद काय वर्णन करून सांगू? मात्र त्या आनंदाच्या आवडीने पुढची प्रपंचाकडे होणारी माझी धाव मात्र थांबली आहे. म्हणून तर ते म्हणतात, “अनुतापे तुझे राहिले चिंतन । जाला हा वमन संवसार ॥“ म्हणजे त्यांचा हा आनंदाचा अनुभव क्षणिक नाही, प्रतिकूल परिस्थितीही कायम आहे.
ते पुढे म्हणतात हा डोह बाहेर कुठे नाही. बाहेरची परिस्थिती आहे तशीच आहे. आनंद तो बाहेर असता तर तुम्हाला पण दिसला असता. पण हा आनंदाचा अनुभव मला अंत:करणात आला आणि माझ्या मुखातून असे उद्गार बाहेर पडले. कारण जे आत असते तेच बाहेर दिसते. त्याकरिता ते एक दृष्टांत देतात,
गर्भाचे आवडी मातेचा डोहळा | तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे ॥३॥ तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा | अनुभव सरिसा मुखा आला ॥ ४ ॥
पोटातील गर्भाची जी आवड असते तदनुसार आईला डोहाळे होतात. कारण गर्भाची आवडच आईच्या ठिकाणी प्रतिबिंबित झालेली असते. त्या प्रमाणे माझ्या अंत:करणात जसा आनंदाचा ठसा उमटला. त्याचा जो अनुभव आला तोच माझ्या मुखावाटे शब्दरूप घेऊन बाहेर आला.
आपण मोठ्या अभिमानाने ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज की जय म्हणतो, पण आपल्या कपाळी मात्र पराजय का ? आपल विचार करण्यात काही तरी चुकत आहे हे मात्र नक्की. खालील आकृती पहा म्हणजे आनंदाचा डोह म्हणजे काय ते स्पष्ट होईल.
आकृतीतला मोठा चौकोन हा ब्रह्म म्हणजे आनंदाचा डोह आहे. त्यातला पांढरा रंग आनंद आहे. त्याची सत्ता पारमार्थिक आहे. त्यात एक गोल दिसतो तो जीव आहे. जीवाच्या संदर्भात जो ब्रह्माचा अंश असतो त्याला आत्मा म्हणतात. त्यात जे लहान लहान पांढरे गोल दिसतात ना तो अधून मधून होणारा आत्मसुखाचा अनुभव आहे असे समज. बाकीचा काळा भाग दु:खाचा आहे. तेवढ्या भागापुरता आनंद झाकला गेला आहे. त्या काळापुरता आनंदाचा आपल्याला अनुभव नाही. सुख दु:ख हे व्यावहारिक सत्तेतील अनुभव आहेत.आपल्याला जो आनंदाचा अनुभव येतो तो त्या आनंदाच्या डोहातील विषयांच्या वाऱ्याने अधून मधून उठणाऱ्या वरवरच्या तरंगांचा. पण ज्ञानेश्वर तुकारामांना कदाचित आपल्यापेक्षा अधिक दु:ख असून देखील आनंदाचा डोह अनुभवाला येतो तो ते पारमार्थिक सत्तेविषयी जागे असल्यामुळे. आपण व्यावहारिक सत्तेपुरते जागृत असतो, तर संत व्यावहारिक सत्तेविषयी निद्रिस्त असतात. (यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुने: | गीता)
हा आनंद आपल्या कसा मिळेल?
श्री ज्ञानेश्वरमहाराज हा परमानंद प्राप्त करण्याचा उपाय आपल्याला एका अभंगात सांगतात. ते म्हणतात,
आनंदु रे आजी आनंदु रे । सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदु रे ॥ एक दोन तीन चारी पांच सहा । इतुके विचारूनि मग परमानंदी रहा ॥ सातवा अवतार आठवा वेळोवेळां । बापरखुमादेविवरू विठ्ठलु जवळा ॥
मी अंतरबाह्य आनंदमय झालो आहे व सर्वत्र आनंदी आनंदच आहे. आम्ही परमानंदी राहण्यासाठी जी साधने वापरली ती अशी - १) परमात्मा - ब्रह्म, २) जीव आणि शिव (ईश्वर), ३) स्थूल, सूक्ष्म आणि कारण असे तीन देह, ४) चार पुरुषार्थ धर्म, अर्थ, काम, मोक्ष ५) पंच कोश, ६) सहा शास्त्रे. यांचा ‘विचारुनि’ म्हणजे संप्रदायपूर्वक केलेला अभ्यास. पण हे जमत नसेल तर सातवा अवतार राम किंवा आठवा अवतार कृष्ण या अवतारांचे सतत चिंतन करावे. हा माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांच्या जवळ जाण्याचा म्हणजे सुखरुप होण्याचा सोपा उपाय आहे असे माऊली सांगतात. कारण तोच सुखरुप, सच्चिदानंदरूप आहे.
तुकाराम महाराज आपल्याला असाच उपाय सांगतात.
‘गोविंद गोविंद | मना लागलिया छंद || मग गोविंद ते काया | भेद नाही देवा तया || आनंदले मन | प्रेमे पाझरती लोचन || तुका म्हणे आळी | जेवी नुरेचि वेगळी ||”
मनाला गोविंद गोविंद अशा छंद लागला की जशी भुंग्याच्या ध्यानाने आळी भुंगा होते तसे गोविंदाच्या ध्यानाने भक्त गोविंदच होतो. त्याच्याशी अभेद झाला की मन आनंदित होते आणि प्रेमाश्रू पाझरु लागतात. कारण तो गोविंद परमानंदस्वरुप आहे. तो आनंदाचा डोह आहे. मग त्यातला तरंग, जलबिंदू देखील आनंदाचाच नाही का?
आपली बरोबरी ज्ञानेश्वर, तुकाराम यांच्याशी होऊ शकत नाही हे खरे. पण सर्व काही सोडून द्यायचे असा याचा अर्थ होत नाही. ज्यावेळी आपल्याला विषयातून आनंदाचा उपभोग होतो, तेव्हा हा आनंद विषयात नसून विषयाच्या निमित्ताने होणारा आनंद आहे, ते वास्तविक म्हणजे आत्मसुख आहे. जेव्हा दु:खाचे प्रसंग येतील तेव्हा ते आपले प्रारब्धाचे भोग आहेत असे समजून त्यांचा स्वीकार करायचा. कारण प्रारब्ध कोणालाच चुकलेले नाही. जो आपल्या देहात राहून आपले आणि ईश्वररूपाने जगाचे व्यवहार चालवतो त्याची जाणीव ठेवून त्याच्या नियोजनात राहायचे. त्याने दिलेल्या आज्ञा पाळायाच्या. आपले कर्तव्य करत असताना तो फलदाता आणि नियामक आहे हे लक्षात ठेवायचे. तो निर्घृण नाही, partial नाही. आपल्याला कर्मस्वातंत्र्य आहे पण फळाचे नियोजन त्याच्या हाती आहे. हे कळण्यासाठी प्रत्यक्ष संतांची, नाही तर त्याच्या वाङ्मयाची संगत ठेवायची. सुसंगती वाढवायची, कुसंगती जाणीवपूर्वक टाळायची आणि विसंगती सहन करायची म्हणजे हळुहळू दु:खाच्या लाटांची तीव्रता कमी होत जाईल. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज ५ मे च्या प्रवचनात सांगतात, आनंद मिळवाण्यसाकाठी वासना भगवंतांकडे वळवावी.
असे संत आजकाल आहेत का? हो नक्कीच आहेत. डोळसपणे त्यांचा शोध घेतला तर नक्की सापडतील. त्यांच्या भेटीची तीव्रता असेल तर ते प्रत्यक्ष तू जिथे असशील तिथे येतील किंवा कोणीतरी त्यांचा संदेश घेऊन नक्की येईल. याची प्रचीती घ्यायची असेल तर मग हे आनंदाचे तत्त्वज्ञान अशा संतांच्या तोंडून स्वत: ऐक म्हणजे मी सांगितलेले खरे आहे की नाही याची खात्री होईल!
- श्रीकांत जोशी
- typo error - प्रजापतीचा म्हणजे हिरण्यगर्भाचा आनंद मनुष्य आनंदाच्या कितीतरी पटीने ( १० वर २२ शून्ये 10 to the power of 22) अधिक असतो. -
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर लेखन आनंदाचे डोही आनंद तरंग हा अनुभव आला वाचून.
उत्तर द्याहटवाअतिसुलभ,अतिसुंदर, मर्मग्राही,वाचनीय असे चिंतन...!
उत्तर द्याहटवा