सैतानछाया

ऋतुगंध ग्रीष्म वर्ष १३ अंक २
तो अखेरीस तिथे पोचलाच!!

आजूबाजूला हिरव्या रंगाचा वणवा पेटला होता. हवा इतकी कुंद होती की तिच्या अस्तित्वाचा एकच पुरावा त्याच्याकडे होता : श्वास. तोही उद्यापर्यंत राहील की नाही याची त्याला खात्री नव्हती. आकाशाच्या पोटात रामपुरी सुरा भोसकवा आणि उष्ण रक्ताचे शिंतोडे सर्वत्र उडावेत तसा तो सुळका आणि आजूबाजूचे ढग दिसत होते. आर्द्रता इतकी की त्याच्या हाडावर शेवाळे साठले.

इतक्यात त्याच्या खांद्यावर एक मऊ लिबलिबीत हात कोणीतरी ठेवला. तो स्पर्श जिवंत माणसाचा आहे की रस्त्याच्या कडेला पडून राहिलेल्या एका बेवारस प्रेताचा असा प्रश्न पडावा इतका थंडगार होता. 

त्याने चमकून वळून पाहिले. तिथे एक कुरूप फेंगडा म्हातारा उभा होता. त्याच्या डोक्यावर निळसर रंगाची पांढरा गोंडा असलेली एक टोपी होती. नाक गरुडाच्या चोचीसारखे होते. डोळे बेडकासारखे बटबटीत होते. दुष्काळी जमीनीवर जितक्या भेगा असतात त्यापेक्षा जास्त रेषा त्याच्या चेहऱ्यावर उमटलेल्या होत्या. त्यांनी कळकट्ट जाकीट आणि तशाच रंगाची विजार घातली होती. त्याच्या चालण्यात एक विलक्षण भयावह फेंगडे पण होत. पाठीवर एक राखाडी रंगाचं गाठोडं घेऊन तो फेंगडा म्हातारा त्याच्याकडे विद्रुपपणे हसत पाहत होता. त्याच मन बुरशी आल्यागत झालं.

“निघायचं?”

“आपण दोघंच?

“का घाबरलास?” परत तेच विद्रुप हास्य.

“नाही मला वाटलं की बरोबर अजून लोक असतील.”

त्या फेंगड्या म्हाताऱ्याचा चेहरा एकदम गंभीर झाला. नागाचा फणा असलेली काठी उचलून फेंगडा म्हातारा नुसताच चालायला लागला. तो ही भारल्याप्रमाणे आपल्या पाठीवरचे काळ-ओझे सावरत त्याच्या मागे ओढला जाऊ लागला.

शूर्पणखेच्या उपटलेल्या जटा लक्ष्मणाने इतस्ततः फेकून द्याव्यात तशी मुळे जमिनीवर पसरली होती. त्यांनी घातलेल्या भक्कम विळख्याने गंगनचुंबी वृक्ष सुद्धा जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. काही उद्दाम वृक्षांना वठणीवर आणण्यासाठी वेलींनी त्यांच्या मुसक्या बांधल्या होत्या. पूर्ण जंगलाला प्रेतकळा आली होती. इतक्यात दिवसाढवळ्या ऐकू येणाऱ्या घुबडांच्या घूत्कारानी त्याचं मन सांजोळं झालं. त्याचं दचकणं पाहून फेंगडा म्हातारा स्वतःशीच हसू लागला. तेच विद्रूप बीभत्स हास्य. त्याने वळून पाहिलं त्याचा विश्वास बसेना.


घुबडाचा आवाज काढत ३-४ कुबड्यांचा एक समूह मागून येत होता. त्यांच्या पाठीवर मणामणाचे ओझे होते. त्यामुळे त्यांच्या शरीरालाच नाही तर मनालाही कुबड आले होते. त्यामुळेच ते असे अमंगळ घूत्कार करत पुढे चालले होते. फेंगडा म्हणाला, “यांच्या वाटेत कधी येऊ नकोस. पस्तावशील. लांबून दिसले तरी लपून बस. त्यांचा मार्ग मोकळा कर.”

“असं का ?”

परत तेच बीभत्स हास्य. “कारण हे इथले सगळ्यात सुखी लोक आहेत.”

घूत्कार करणारे हे कुबडे सगळ्यात सुखी मग दुःखी लोकांची काय अवस्था असेल?

उघड्या जखमेवर जशी माशी सारखी सारखी येऊन बसते तसा हा विचार त्याच्या मनात सारखा येऊ लागला. इथे येण्याचा आपला निर्णय खरंच बरोबर होता ना असे राहून राहून त्याला वाटू लागले.

पुढे संततधार पाऊस सुरु झाला. घाम त्याच्या शरीराच्या रंध्रारंध्रातून इतक्या खोल वरून येत होता की घामाच्या ऐवजी रक्त तर येत नाही ना असा संशय यावा. त्याच्या मनावर शेवाळ साठलं. इतक्यात पुढे चालणारा कुबडा थबकला.

“ते पाहिलस सैतानाचं पाऊल. ती पाहिलीस जागा तिथे मागच्याच मासात सैतानाने थैमान घातलं”

त्याने बरेच निरखून पाहिले. त्याला काही दिसले नाही. फेंगड्याच्या डोळ्यात त्याला वेडाची झाक दिसू लागली.

“कोवळी कोवळी बालकं इथे खेळत होती. चाहुलही न देता सैतान आला. आणि त्याने एकूणएक बाळांना चिरडून मारले. एकालाही सोडलं नाही. निर्दय आहे तो सैतान. कंसाने एक तरी बाळ सोडून दिल पण या सैतानाने एकही बाळ सोडलं नाही. सगळ्यांना चिरडून टाकलं. एक फटक्यात.”

कुबडा कशाबद्दल बोलतोय ते मुळीच कळेना. खरंच सैतान होता का? असेल तर फेंगड्याने आधीच का नाही सांगितले? आता दिवेलागणीची वेळ जवळ येत होती. परत फिरणेही अशक्य होते. कुबडे सारखे ये जा करत होते. आपण फेंगड्याच्या जाळ्यात पूर्ण फसलेले आहोत आणि परतीचा एकही मार्ग नाही अशी अगतिकता त्याच्या मनाला भेडसावू लागली. फेंगडा स्वतःच्याच तारेत होता. वर आकाशाकडे बघून बोलायला लागला.

“तेव्हांपासून इथलं सगळं काही विषारी झालं. मुंग्या मास खाऊ लागल्या. इतकेच काय झाडे, पाने, पण मांसाहारी झाली. फुले विषारी झाली. सगळं बदललं. सगळं काही बदललं.”

त्याच्या मनात चर्रर्र झालं. कधी भरून न येणारा चरा उमटला.

“हेच पाहायला तुला यायचं होत ना?”

फेंगडा पुढे चालू लागला. संमोहित झाल्यासारखा तो त्याच्या मागे ओढला जाऊ लागला.

दिवेलागणीच्या वेळेला ते एका महालात पोचले. तिथे विस्तीर्ण दालन होते. त्यात वेगवेगळ्या रंगाचे लोक घाण वासाचे पेय पीत बसले होते. दुष्काळातून आल्याप्रमाणे समोर येईल ते अन्न ओरबाडून ओरबाडून खात होते. निष्कारण मोठ्मोठ्यांदा हसत होते. तिथे सगळे कुबडे पण आले होते. पण घूत्कार करण्याचे सोडून ते त्यांच्या पद्धतीचे नृत्य करत होते. अचकट विचकट. अंगावर शहारे आणणारं ! सैतानाला तर बोलावत नसतील? कोवळ्या बालकांना सैतानानं एका

घासात खाल्लं तसं रंगबेरंगी लोकांना सैतानाच्या जठराग्नीत आहुती देण्याचा तर कुबड्यांचा कावा नसेल? फुलं पानाप्रमाणे हे पेय तर विषारी नसेल? एक ना अनेक प्रश्नांची वटवाघळं त्याच्या मनगुंफेतून इतस्ततः उडू लागली. फेंगडा नाहीसा झाला. आपल्या पडशीतली कांदा भाकर खाऊन तो आडोसा शोधू लागला.

इतक्यात त्याच्या हाताला तोच लिबलिबीत स्पर्श झाला. पण यावेळेला त्या स्पर्शाने त्याला जखडले. त्याला हात पाय हलवता येईनात. डोळे पण घट्ट चिकटलेले. मन जिवाच्या आकांताने ओरडत होत पण ओठही पूर्ण शिवले गेले होते त्यामुळे एकही आवाज फुटेना. फेंगड्या कुरूप म्हाताऱ्याने २-४ कुबड्यांच्या साथीने त्याला जखडून ठेवले होते. थोडा वेळ शांततेत गेला आणि त्याला त्याच्या पूर्ण शरीरावर मुंग्या फिरत आहेत असा भास झाला. मांस खाणाऱ्या मुंग्या तर नसतील? आपल्याला असे हात पाय आणि तोंड बांधून मांसाहारी मुंग्या सोडून जिवंत पणे मारण्याचा तर याचा डाव नसेल? त्याच्या रक्ताचा थेंब अन थेम्ब ठिणगी झाला. मुग्यांची ती वळवळ असह्य होऊन त्याने हातापायाला हिसडे द्यायला सुरुवात केली....आणि परत एकदा जोरात हंबरडा फोडला….

त्याच्या ओरडण्याने त्यालाच जाग आली. सगळे अंग घामानी डबडबलेले. पहिली काही मिनिटे ते घाम नसून रक्त आहे असेच त्याला वाटत होते. तो घामच आहे आणि पडले ते वाईट स्वप्न होते ते कळल्यावर थोडे हायसे वाटले. त्याच्या घशाला पडलेली कोरड थेट जठरापर्यंत पकोहली. उशाशी ठेवलेले पाणी तो घडाघडा प्यायला. आजूबाजूला पहिले. सगळे रंगबेरंगी लोक नाहीसे झाले होते. कुबडेही कुठे दिसत नव्हते. फेंगडा म्हातारा त्याचे बीभत्स हास्य घेऊन तिथे बसला होता.

“सैतान फक्त जागे पणी नाही. स्वप्नात येऊनही कोणालाही संपवू शकतो”

त्याच्या कैदीपणाची भावना फारच प्रबळ झाली.

जरबेच्या आवाजात फेंगडा म्हातारा म्हणाला, “ जायचं ना शेवटपर्यंत. इतक्या जवळ येऊन तू परत नाही जाऊ शकत. अर्ध्यावरून परत गेलास आणि सैतानाला कळले तर तुला पण तो वाटेत चिरडून मारून टाकेल आणि तुझे मांस मुंग्यांना देईल. कोणाला कळणारही नाही तू इथे आला होतास.”

भारल्याप्रमाणे त्या चिर्रर्र अंधारात त्याने ठेचकाळत पुढची वाट धरली.

चंद्र केंव्हाच मावळला होता. चांदणे होते थोडे फार. त्याच्या प्रकाशात फेंगडा म्हातारा आणि तो दोघेच पुढे चालले होते. एक ठिकाण असे आले कि पुढची वाट दिसेना. फेंगड्या म्हाताऱ्याने आपल्या नागफणा असलेल्या काठीने काहीतरी चाचपले आणि एक गिळगिळीत वस्तू त्याच्या हातात दिली.

“निद्रिस्त कालसर्प आहे. त्याला धरून धरून इथं पासून पुढे जायचे आहे. पण त्याला फार जोरात ओढलंस तर कालसर्प जागा होईल आणि एका घासात दोघांनाही खाऊन टाकेल.”

आत्ता पर्यंत घाबरून घाबरून त्याचे मन बधिर झाले होते. एकही संवेदना, आशा, आकांक्षा उरली नव्हती मनात. तो पूर्ण पणे फेंगड्या म्हाताऱ्याच्या स्वाधीन होता. त्याने हळू हळू काळसर्पाच्या आधाराने वर चढायला सुरुवात केली.

अजूनच काळोख दाटून आला. अचानक गार वारे वाहू लागले. इतका वेळ घामापासून वाचू पाहणाऱ्या त्याला थंडी बोचू लागली. दात वाजू लागले. हाडे ठिसूळ झाली. तरी फेंगड्या म्हाताऱ्याला पूर्णपणे वश होऊन तो पुढे जात राहिला. अचानक म्हातारा थांबला. आणि चाहूल घेऊ लागला… काही निमिषे पळे गेली आणि अचानक प्रकाशाची एक तिरीप दोघांवर येऊन पडली… आणि कुरूप फेंगडा म्हातारा आनंदाने नाचू लागला. “आपण जिंकलो सैतान हरला. सूर्योदय झाला ! आता सैतान काही करू शकणार नाही” असे म्हणत तो अचकट विचकट नाचू लागला. तो ही भारल्या सारखा त्याच्या तालावर पाय टाकू लागला.

____________________________

“अहो वैद्य, तुम्हाला ट्रेक बद्दल लिहायला सांगितले आणि तुम्ही काय लिहून ठेवले आहे? अशी वर्णन वाचून कोणीतरी येईल का ट्रेक ला? कोण कुबडा, कोण फेंगडा म्हातारा आणि कोण तो? आणि कुठे गेला होतात काहीतरी नीट सांगा ना?”

बर काका भावना पोचल्या. खालचे शब्दार्थ वाचा मग सगळं उलगडा होईल.

तो = मी ; फेंगडा म्हातारा = माझा वाटाड्या ; आकाशाच्या पोटातील सूरा = कोटा किनाबालू ; कुबडा = सामान घेऊन जाणारे हमाल ; विस्तीर्ण दालन असलेला महाल = लबान राता येथील बेस कॅम्प ;

रंगबिरंगी लोक = वेगवेगळ्या देशातून आलेले गिर्यारोहक ; घाण वासाचे पेय = बीअर

निद्रिस्त कालसर्प = शिखरावर जाण्यासाठी लावलेले दोरखंड

सैतान = २०१५ मध्ये झालेला भूकंप ; मांस खाणारी झाडे = घटपर्णी झुडुपे

मांस खाणाऱ्या मुंग्या = (तेच बीभत्स हास्य)








विवेक वैद्य 















३ टिप्पण्या: