शेजारी

ऋतुगंध ग्रीष्म वर्ष १३ अंक २

(सत्य घटनांवर आधारित )

शुक शुक ! अलकाच्या खाणा-खुणा, डोळ्यांनी लक्ष वेधणे……. नाना प्रकार चालू होते. काही वेळाने संध्याने हात सोडून खाली उडी मारली, पण मला अजुन झोके घ्यायचे होते. हो ! आमच्या बिल्डिंगच्या आवारातील अनंताच्या झाडाच्या फांदीला लोंबकाळून मनसोक्त झोके घ्यायचे हा आम्हा मैत्रिणींचा सुट्टीच्या दिवसात आवडता खेळ! बराच वेळ मनसोक्त झोके घेतल्यावर सहज लक्ष गेले तर, बऱ्याच लांबून दोघीही भयचकित, स्तब्ध नजरेने माझ्याकडे पहात आहेत असे दिसले.फांदी सोडून खाली उडी मारली तर संध्या किंचाळली,’ नीला धाव’.काही न कळून मी त्यांच्याकडे धावले,डबडबल्या डोळ्यांनी अलकाने फक्त खूण केली, अनंताच्या फांदीकडे .

बापरे ! मी फांदीला जिथे लोंबकळून झोके घेत होते, तेथून काही इंच अंतरावर कोब्रा पसरला होता. साधारण चार-पाच इंच जाड खूप लांब असा हा काळाभिन्न साप ( सारे त्याला कोब्रा म्हणायचे) झाडाच्या आसपास कधी कधी पाहिला होता. प्रत्येकजण तेथून जाताना, कोब्रा नाही ना, अशी खात्री करुनच जायचा. बहुधा अनंताच्या झाडाखाली त्याचे बीळ असावे,पण त्याचा कधीच कुणाला त्रास झाला नव्हता. आम्ही झोके घ्यायला सुरुवात केली तेव्हा तो तिथे नक्की नव्हता. अलका म्हणाली, तीसुद्धा तिथे आली पण कोब्राला पाहून लांब पळाली आणि सारखे आमचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करू लागली. संध्या गेल्यावरही मी कीतीतरी वेळ झोके घेत होते.बापरे ! आठ- नऊ वर्षांच्या आम्ही घाबरूनच गेलो. रात्री बापूंना सांगितले तर म्हणाले, “ घाबरायचे काय त्यात ? एक लक्षात ठेव, जोपर्यंत आपण त्यांच्या वाटेस जात नाही, तोपर्यंत ते आपणास काही करीत नाहीत.”

“ पण, कुत्रा…..?”

“पिसाळला तर चावतो. किंवा त्याची काही खोडी काढली तर.आणि अनोळखी माणूस आला आहे हे सांगण्यासाठी भुंकतो, बस्स !”

“आणि वाघ, सिंह….?”

“ कुठे असतात?”

“ जंगलात”

“ मग? तू जेवतेस तसे त्यांनाही जेवण हवे असते. आपण त्यांचे जेवण. हा SहाSS.पण तेही पोट भरल्यावर समोर ससा जरी आला तरी त्याला मारत नाहीत, बरं !”

खरंच,त्यानंतर प्राण्यांची भीती कधीच वाटली नाही. आमच्या वाडीत साप खूप निघायचे. विशेषतः उन्हाळ्यात आणि आम्ही मे महिन्याची सुट्टी म्हणून हुंदडत असायचो. पण ते त्यांच्या वाटेने आणि आम्ही आमच्या खेळात. एकदा तर माझ्या चुलत भावंडांना घेऊन त्यांच्या घरी निघाले. भाऊ पाच वर्षाचा आणि बहीण तीन. मीही शाळकरीच. गेटपाशी गेलो आणि धावणारे दोघे एकदम थबकले. मी होतेच मागे. कां थांबले म्हणून पाहिले, तर पिवळाधम्मक नाग फणा काढून उभा ! हळूच मागूनच दोघांचेही हात पकडले नि म्हटले, अजिबात हलू नका.आम्ही तिघेही statue सारखे स्थिर .एकटक त्याच्याकडे बघत. किती वेळ गेला कोणजाणे ! रस्त्यावरून काहीतरी आवाज आला आणि फणा खाली करून तो शांतपणे निघून गेला.

'काय मस्त होता ना ? नाग ना गं?' भाऊ म्हणाला. मला आश्चर्य वाटले. ' तुला भिती नाही वाटली?' 

'छट , बापूंनी सांगितले नाही का , कधी घाबरायचे नाही, काही करत नाहीत '.

त्यांना घेऊन गेले नि काकूला सांगितले ,तर तिलाही काही विशेष वाटले नाही ,उलट 'अरे व्वा , फणा काढलेला नाग सहसा इथे दिसत नाही, लकी आहेत हं' असे म्हणाली.

अशा धिटाईचा फायदा अजूनही एक होता.आमच्या मागच्या रस्त्यावर एक तळे होते. पावसाळ्यात ते तुडुंब भरून वाहू लागे नि पाणी जोरात रस्त्यावरून खालच्या शेताडीत जाई.त्यातून कधीकधी पाणसाप वाहत जात. पायाला काहीतरी हुळहुळले की काही क्षण थांबायचे नि मग पुढे जायचे. असे आम्ही सहजतेने करत असू. 

अनेक प्रसंग, खूप आठवणी. हळूहळू नवीन इमारती होऊ लागल्या आजूबाजूला नि साप दिसणे बंदच झाले, त्याबरोबर त्यांच्या उल्लेखही !

कितीतरी वर्षांनी खेडेगावात बदली झाल्यावर पुन्हा त्यांचे कधीही, कोठेही दर्शन होऊ लागले. लोकांनाही ही सवय आहे त्यांची. अगदीच कोणाच्या घरात घुसला की सर्पमित्रांना बोलावून जंगलात सोडला जातो. एका बँक ग्राहकाच्या शेतावर visit करायला गेले.( कर्ज देण्यापूर्वीचा हा सोपस्कार असतो) खूप मोठी वाडी, असंख्य झाडेझुडपे. स्वच्छ आवार. सारी पहाणी करून झाल्यावर सहज विचारले,

“ इतक्या दूर घनदाट झाडीत राहता, कधी कोणते प्राणी….?”

“आम्ही त्यांच्या जागेत रहायला आलोत. सवय करूनच घ्यायला लागते.साप, मुंगूस, गवे नेहमीचे पण कधीकधी वाघही येतो. अगदी या पडवीपर्यंत. आतापर्यंत चार कुत्र्यांना घेऊन गेलाय.” 

“बापरे, मग?”

“ हं ,काय करणार? तो येतो तो रात्रीचा, आम्ही सहसा बाहेर पडत नाही, पण कुत्रे मोकळे असतात. आम्हीच अतिक्रमण केले आहे त्यांच्या जागेवर. येतात भक्ष्य शोधत. बाकीचे प्राणी मात्र जोपर्यंत आपण पण त्यांच्या वाटेला जात नाही तोपर्यंत काही करीत नाहीत.(ओ! बापूच वदले का? मी सहज आकाशाकडे पाहिले.) अहो , इथे लहान मुलापासून कोणीही घाबरत नाही प्राण्यांना.” 

लहान मूल म्हटल्यावर हेमलकसा आठवले.हेमलकसाला, प्रकाशभाऊ आमटे सकाळी आठ वाजता त्यांच्या सर्व प्राणिमित्रांची खबरबात घेत, त्यांना खाणे देत फिरत असतात.आम्ही गेलो तेव्हा त्यांची नातवंडेही बरोबर होती. एकेका पिंजऱ्यासमोरून फिरताना त्यांनी एकामधून लांबलचक साप बाहेर काढले.त्यांची माहिती सांगत असताना, त्यांच्या पाच वर्षांच्या नातवाने सहज गळ्यात एक साप घातला नि इकडेतिकडे फिरू लागला. आम्हालाच धस्स झाले. हे एवढंस पोरगं आणि खुशाल वळवळता विषारी साप घेऊन फिरतोय ! इतक्यात प्रकाश भाऊंनी उचलून घेतलेली नात, असेल दीड-दोन वर्षांची, वाकून हट्ट करू लागली. तिचा हट्ट ऐकून समस्त अवाक !!

“मला पण साप पाहिजे. दादालाच का दिला?”

धन्य बाबा आमटे आणि त्यांच्या या सर्व पिढ्या !!


“मॅडम, आभाचा फोन आलाय. काहीतरी मोठा problem झालाय.” अजित एकदम येऊन बोलू लागला. चेहऱ्यावर प्रचंड टेन्शन.

“ काय रे?”...

“नाही, काही सांगत नाहीए . लग्गेच घरी ये एवढेच म्हणून गप्प झाली. “

“Ok ,मग जा लवकर”...

“ पण…….

“तुझ्या टेबलवरील काम मला देऊन जा. टेन्शन आहे, पण don’t worry. सगळं ठीक असेल.And please drive carefully. आणि फोन कर. काही मदत हवी असेल तर कळव लगेच.”

“Thanks Mam.”

अजित, एक हरहुन्नरी मुलगा. गेल्यावर्षीच ट्रेनी ऑफिसर म्हणून बँकेच्या गोव्याच्या शाखेत रुजू झाला होता. लग्न झाले आणि बदली गोव्याला म्हणून खूष होता .रायबंदर ला एक छोटा बंगला भाड्याने घेतला तेव्हा काहीजणांनी सुचविले, ‘अरे, इथे जवळच चांगले ब्लॉक्स आहेत रेंटवर, कशाला उगाच लांब राहतोस शाखेपासून?’

‘ अरे, तेवढ्याच पैशात बंगला मिळत आहे, आभालाही फार आवडलाय, भोवती भरपूर झाडे, बाजूलाही तसेच बंगले आणि शांत, प्रसन्न वातावरण.’ 

दोन्ही घरची मंडळी येऊन गेली आणि सारे काही मस्त मजेत असतानाच बाळाच्या चाहुलीने आनंदात भर पडली. मध्ये रजा घेऊन दोघेही घरी जाऊन आली .एकाच गावात सासर माहेर, छान थंडगार वातावरण, पण बाळाच्या जन्माच्यावेळी विदर्भात खूपच उन्हाळा असणार, म्हणून बाळंतपण गोव्याला करायचे नि दोघांची आई दोन-दोन महिने आलटून पालटून येणार, असे ठरले. दरमहा व्यवस्थित चेकिंग, विकएंडला गोव्यात मस्त फिरणे, ऑफिसमध्येही अधूनमधून मस्करी…. सारं काही छान सुरू असताना आज मध्येच काय झाले? आत्ता तर सातवा महिना लागत होता. मीही थोडी काळजीत पडले पण समोरच्या कामात व्यग्रही झाले. दोन-तीन तास काहीच कळले नाही म्हणून सुरेखाने फोन लावला नि जे कळले त्याने सारेच अवाक झाले. 

बाईक असली मारली की 10- 12 मिनिटातच अजित घरी पोहोचला, तर आभा सोफ्यावर भोवळ येऊन पडली होती. फोन खाली पडला होता आणि कुणीतरी अनोळखी जोडपे पाणी शिंपडून तिला भानावर आणायचा प्रयत्न करीत होते.बाजूला तीन लहान मुले काहीशा भेदरलेल्या अवस्थेत उभी होती. हळू हळू तिने डोळे उघडले, अजितकडे बघत थोडीशी भानावर आली आणि पुन्हा डोळ्यात प्रचंड भय दाटून, एकदम अजितच्या गळ्यात पडून मोठमोठ्याने रडू लागली. काहीच न कळून तिला शांत करण्याचा प्रयत्न करेपर्यंत तिला पुन्हा भोवळ आली. भांबावलेला अजित त्या जोडप्याकडे पाहू लागला. त्यांनी सांगितले, ‘ आम्ही तुमचे शेजारी आहोत. तिला मोठा धक्का बसलाय, खरंतर आम्हालाही. पण तिच्या या अवस्थेत काळजी घ्यायला हवी, आधी हॉस्पिटलमध्ये admit करूया.’

हॉस्पिटलमध्ये गेल्यावर शेजारी….. मिस्टर पिंटो च डॉक्टरांबरोबर बोलले. उपचार सुरू झाल्यावर त्यांनी जे सांगितले ते ऐकून अजितलाही प्रचंड धक्का बसला. सुन्नपणे तो आभा शुद्धीवर येण्याची वाट पाहू लागला.

अजितच्या बंगल्याच्या बाजूचा बंगला मि.पिंटो यांचा होता. आठ वर्षांपूर्वी त्यांना U.K. ला उत्तम जॉब मिळाला.वर्षांत स्थिरस्थावर झाल्यावर पत्नी व दोन मुले यांना घेऊन गेले.पाच-सहा वर्षे राहून परत यायचा विचार होता.तिसऱ्या मुलाचा जन्मही तेथेच झाला नि गोव्याला येणे जमले नाही. मात्र अधून मधून यायचे या विचाराने बंगला मात्र इतरांसारखा कोणाला भाड्याने दिला नाही.धाकटा आता पाच वर्षांचा झाला नि या सुट्टीत आपल्या घरी यायचा विचार केला. पत्नीला आणि मोठ्या मुलांनाही हा बेत आवडला. अजून UKलाच राहण्याचा विचार असल्याने जमलं तर बंगला भाड्याने देऊ, हाही एक विचार.

सात वर्षांनी आपल्या भूमीला पाय टेकताच थोडे भावनाविवश झाले दोघजणं .मुलं उत्साही ! टॅक्सीतून उतरून सामान काढेपर्यंत आवारात धावली देखिल. इतक्यात मोठ्याने दोघांना थांबविले. एक मोठा साप सरपटत घरात जाताना पाहिला. मम्मी, पप्पा पोहोचलेच तेथे इतक्यात अजून एक साप खिडकीच्या फटीतून जाताना दिसला. खिडकीला मारलेली जाळी तिथे थोडीशी तुटलेली दिसत होती. काही शंका येऊन मि. पिंटो यांनी सर्वांना आवाराबाहेर काढले आणि मित्राकडून प्राणिमित्रांचा नंबर घेऊन त्यांना फोन केला व वाट पाहू लागले. मुलांची गडबड ऐकून आभाने दार उघडले, विचारपूस केली व हकीकत कळताच त्यांना सामान घेऊन आत येण्याची विनंती केली. चहा ,नास्ता होईपर्यंत प्राणिमित्र आले.सर्वांना आवाराच्या बाहेरच थांबायला सांगून त्यांनी दार उघडले आणि वेगाने बंद ही केले. फक्त मि.पिंटोना खूण करून बोलाविले व काही क्षण दार किलकिले करून दाखविले. भूत पाहिल्यासारखे डोळे विस्फारून पिंटो गेटबाहेर आले आणि तिथल्या दगडावर मटकन बसले. प्राणिमित्रांनी सर्वांना घरात जाऊन, दारे खिडक्या बंद करून बसण्यास सांगितले आणि फोन करू लागले. 

सारे पप्पांभोवती. त्यांनी सांगितले, ‘ घरात खूप साप आहेत. नशीब, मुलांना साप दिसला. नाहीतर आपण दार उघडलं असतं आणि……..’ जिवाचा थरकाप होऊन त्यांना पुढे बोलवेनाच.

अर्ध्या तासात मोठ्या पिशव्या/ गोणी, दोऱ्या सुमारे वीस-पंचवीस तरुण आले. सुमारे अडीच-तीन तास ते फक्त पिशव्या भरून दोऱ्याने घट्ट बांधून अंगणात आणून ठेवत होते. तीन-साडेतीन तासांनी दोघेजण आले नि म्हणाले, 

“नशीब तुम्हाला साप दिसला आणि तुम्ही आम्हाला बोलाविले. आत्तापर्यंत 78 मिळाले. आम्ही सर्व घर चेक केले पण तरीही अजून कुठे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. We request you, चार-पाच दिवस तरी घरात राहू नका. आवारातही असतील कदाचित. आम्ही दोन-तीन दिवस सतत येऊन चेक करू. “

बाहेर येऊन ती वळवळणारी इतकी पोती पाहून सर्वांनाच कसेतरी झाले.आभाने प्रचंड धास्तीने अजितला फोन लावला आणि फोनवर बोलत असतानाच तिला भोवळ आली.

औषधांमुळे आभाला झोप लागली. अजित चा निरोप घेऊन पिंटो कुटुंब हॉटेलमध्ये राहण्यास जाऊ लागताच अजितने घराची चावी देऊन आपल्याच घरी राहण्यास सांगितले. 

सकाळी जागी झाल्यावर, आभा पुन्हा भयभीत झाली. 

“अरे अजित, तुझ्या लक्षात येतंय का? 78 साप, अजूनही असतील म्हणे ! हे आपले शेजारी वर्षभर ???

बापरे ! आणि आपण छान झाडं , प्रसन्न वातावरण…... करीत आवारात सगळीकडे फिरायचो आणि…….” बोलता-बोलता तिचा आवाज इतका वाढला की तिला हिस्टेरिया होईल की काय असे वाटू लागले. तो तिला शांत करीत असतानाच, सिस्टरने डॉक्टर ना बोलाविले आणि त्यांनी तिला इंजेक्शन च दिले. बोलत बोलत ती शांत झाली, परत उठल्यावर तेच. गरोदरपणात मनावर कोणताही परिणाम झाला तर तो आई व बाळ दोघांनाही वाईट. डॉक्टरांनी तिच्याशी संवाद साधला, चर्चा केली, आता काही ही भीती नाही, शांत रहा बाळासाठी इत्यादी इत्यादी. परंतु तिचे एकच पालुपद……. मी एकटी असायची दिवसभर आणि हा असा शेजार…... आणि रडू लागे. मानसोपचारतज्ञांना बोलाविले. सासू ,सासरे,आई बाबा, भाऊ सारे आले नि साऱ्यांच्या सहवासात होईल शांत सांगून डॉक्टरांनी घरी पाठविले. पंधरा दिवस सारे राहिले. डोहाळजेवणाचा कार्यक्रम ही केला. सर्वांच्या सहवासात, गप्पा गोष्टीत ती रमली. नि हळूहळू एकेकजण माघारी जाऊ लागला. आई आणखी पंधरा दिवस थांबली आणि महिन्याभराने परत येतेच, असे सांगून तीही गेली. 

एवढ्या दिवसात पिंटो कुटुंबाने घर स्वच्छ करून घेऊन, प्राणिमित्रांकडून तीन-चार वेळा पुन्हा पुन्हा पाहणी करून घेऊन घरी राहण्याचा आनंदही घेतला व परत जाताना घर भाड्याने द्यायचे ठरविले.गंमत अशी झाली की, या सर्व प्रकाराची बातमी वर्तमानपत्रात, टीव्हीवर गाजली. प्राणिमित्रांनी साप गोळा करण्यापूर्वी घेतलेले फोटो Facebook , Whatsapp वरून viral झाले होते. त्यामुळे प्रसिद्धीवलयातील या घराला वेगळेच महत्त्व आले आणि ऑस्ट्रेलिया मधून आलेल्या एका जोडप्याने हे घर भाड्याने राहण्यासाठी घेतले. कोणाला काय आवडेल, सांगता येत नाही.

पण फेसबुक वरील हे फोटो एक दिवस आभाने पाहिले. नुसते ऐकून भयभीत झाली होती आणि आता प्रत्यक्ष एवढे साप त्या घरात पाहताना ती पुन्हा प्रचंड घाबरली आणि अजितला, मी घरी एकटी राहणार नाही, रजा घे,म्हणू लागली. त्या दिवशी घेतली रजा, पण रोज कसे शक्य ? 

संध्याकाळी घरी निघालेल्या अजितला मी विचारले,

“ काय रे, अजून टेन्शन आहे का? इतक्या काळजीत कधी दिसत नसे तू.”

त्यांनी रोजची परिस्थिती सांगितली. ती नीट खात- पित नाही , खोलीच्या बाहेर येत नाही मी परत जाईपर्यंत, सतत घाबरलेली, उदास असते नि उद्या जाऊ नको…... हेच पालुपद सुरु करते. अशी नव्हती हो ती .

“नको काळजी करू. मी उद्या येते तुझ्याबरोबर. बघते बोलून.”........

दुसऱ्या दिवशी मी त्यांच्या घरी गेले. “ अजित, तू म्हणे मस्त कॉफी करतोस. मागे हीच म्हणाली होती”...

“Of course.,Of course.”...अजितला हिंट मिळून तो आत गेला.

“ काय गं, अशी सुकलेली कां? मस्त मजेत राहायचं अशावेळी…”

“होतेच पण मग कळलं ,आमचे शेजारी म्हणजे……….

“ शंभर एक साप, हो ना? मग काय झालं ?”

“ काय झालं काय ? काही केलं असतं म्हणजे……?”

“पण केलं कां ? चांगलं वर्षभर राहताय येथे. त्यांनी त्यांचे अस्तित्वही दाखविले नाही की चुकून तुमच्या आवारात आले नाहीत. सोप्प आहे कां हे त्यांनाही ? इतकं मोठ्ठ कुटुंब ! आपली बाळं सुद्धा रांगत कुठेही जातात. त्यांनी कसा दम दिला असेल त्यांच्या पिल्लांना?” मोठ्याने हसत मी म्हटले.

“ तुम्हाला काय जातंय हसायला? माझा विचाराने सुद्धा थरकाप होतोय .”

“ ते तू कमकुवत मनाची म्हणून. माझे तर प्रत्यक्ष अनुभव आहेत”.... असं सांगून, बालपणापासून ते प्रकाशभाऊंच्या नाती पर्यंत चे सारे अनुभव तिला सांगितले आणि भगवान शंकरही गळ्यात साप घालून फिरतात ना गं, त्यांची पूजा करता ना ? असे विचारले.

“ पण इतके साप ? त्यांची वळवळ….. कसंतरीच वाटतं !”

चला, म्हणजे आता भीती कमी होऊन, प्रकरण कसंतरीच वाटण्यावर आलं होतं.

“अगं, साप ते, वळवळ नाही करणार तर काय भांगडा ? आणि काय गं, तुझ्या लग्नात, तुझे मामा, काका नागिन नृत्य करीत होते, ते पाहताना हसतेस मनापासून ! मी पाहिला व्हिडिओ .”

आभा चा चेहरा विचारात्मक झाला.

“ खरंच, मनापासून सांगते गं. माझे वडील म्हणायचे तसं, जोपर्यंत आपण प्राण्यांच्या वाट्याला जात नाही तोपर्यंत ते काही करीत नाहीत आपल्याला.त्यापेक्षा भयानक वाटतं मला ते, 93 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी, त्या बॉम्बस्फोटाची ची तयारी वर्षभर एका इमारतीत भाड्याने ब्लॉक घेऊन करत होते म्हणे. अनेक निरपराध लोकांचे क्षणात जीव घेणारे हे नरराक्षस आपले शेजारी होते, हे ऐकल्यावर तेथील लोक प्रचंड हादरले. काही तर मानसिकरित्या आजारी पडले, प्रचंड उदास झाले…. हे मी मानू शकते. आणि कारणाशिवाय जीव घेतात ते मनुष्यप्राणीच , बाकीचे कोणतेही प्राणी नाहीत. विचार कर मी सांगते त्याचा..”

वाफाळणाऱ्या कॉफीचे कप घेऊन अजित आला. झकास कॉफीचा आस्वाद घेऊन आभाच्या डोक्यावर थोपटून मी बाहेर पडले.

कामाच्या गराड्यात असताना, प्रसन्न मुद्रेने अजित पेढे घेऊन ऑफिसात आला.

“मॅडम, पहिला पेढा तुम्हाला, सकाळी पुत्ररत्न अवतरले” ……

“अरे वा ! अभिनंदन ! आणि आज दिवसही छान, हनुमानजयंती !”

“ हो, पण आभाला शंकराचे नाव ठेवायचे आहे” …

“फारच छान, हनुमान हा भगवान शंकराचाच अवतार”....

“होSSSS?? मला नव्हते माहित. व्वा .मी आत्ताच जाऊन आभालाही सांगतो.”अजित जायला वळला आणि पुन्हा….. “मॅडम मी आज……”

“Yes, enjoy”.

“जय भोलेनाथ”..... पेढा खाताना कोणाचे तरी चिडवणे कानावर आले. 

- नीला बर्वे

८ टिप्पण्या:

  1. खूप छान लेख माहितीपूर्ण गोष्ट

    उत्तर द्याहटवा
  2. वाह नीला मॅडम ,खुप सुंदर लेख

    उत्तर द्याहटवा
  3. खूप छान व माहितीपूर्ण लेख आहे नीला !!

    उत्तर द्याहटवा
  4. नीला लेख वाचताना आपल्या आजूबाजूला साप वळवळत आहेत, असे वाटते व ती तिच्या नकळत कशी राहिली असेल एवढ्या सापांच्या सोबत, बाप रे !!

    उत्तर द्याहटवा
  5. नीला लेख वाचताना ती गरोदर बाई एवढ्या सापांच्या संनिध्यात तिच्या नकळत कशी राहिली असेल, विचार करून भीती वाटते!!

    उत्तर द्याहटवा
  6. हो गं, तेव्हां कोणालाच काही कल्पना नव्हती , पण आठवणीने आजही सारे थरारतांत.

    उत्तर द्याहटवा