शाश्वत संवेदना - भीती

ऋतुगंध ग्रीष्म वर्ष १३ अंक २

माणसाचे मन हे गहन आहे, याचे ठायी अनंत भावभावनेचा खेळ अविरत सुरु असतो. ठराविक आकाराच्या परिमाणाच्या मापदंडाचा संबंध नसलेल्या या मनाचा थांगपत्ता लागणं सोपं नाही. कधी कुठली भावना दुसरीवर कुरघोडी करेल सांगता येत नाही.कळत नकळत आपण बोलतांना “मनाची” ग्वाही देत असतो. मेंदूतून उत्पन्न होणाऱ्या भावभावनेचे प्रगटीकरण मनावाटे होत असावे. प्रेम,सुख,दुःख,भीती अशा वेगवेगळ्या भावना मानवाला जीवनात अगदी जन्मापासून भेटत असतात. बऱ्याचदा एखाद्या विषयी सांगताना आपण बोलतो की तो मनाने खंबीर आहे. मग त्या खंबीर व्यक्तीला दुःख होत नसेल का? नक्कीच होत असणार पण त्याचे घट्ट मन आणि जीवनाचा संघर्ष डोळ्यातले पाणी कधी सुकवून गेला हे त्याला पण कळलं नसणार. या सगळ्या मनाच्या खेळात मानवाला पदोपदी साथ देणारी भावना म्हणजे भीती ..... या भावनेचा जन्म इर्षा,स्पर्धा, असफलता,इजा,नाश,आत्मविश्वासाचा अभाव अशा वेगवेगळ्या भावने मधून होतो.

माणूस जन्माला आला की तो शेवटपर्यंत एका न संपणाऱ्या रेसमधे सहभागी होतो.या रेसमधे धावतांना भीतीची साथ सावली सारखी त्याचा पाठपुरावा करत असते. लहान असतांना आई नजरेआड झाली की ती दिसे पर्यंत भेडसावणारी अनामिक भीती, शालेय जीवनात प्रथम क्रमांक मिळवण्याची स्पर्धा मग तिथे मागे पडण्याची भीती, आपल्या ग्रुप मधे चांगलं दिसावं याविषयी वाटणारी असुरक्षितता अशा कितीतरी प्रकारच्या अव्यक्त भीतींचा सामना करत माणूस जीवनाच्या स्पर्धेत धावत असतो.

भीतीच्या विविध प्रकारातला सगळ्यात थरारक प्रकार म्हणजे भूत खेताची भीती. लहान असतांना रात्र झाली की या भीतीचा पारा रात्रीच्या प्रहराबरोबर चढत जायचा. माझे वडील रेल्वेत नोकरीला होते, गव्हर्मेंटची नोकरी असल्यामुळे घरं मोठी असायची. आजूबाजूला मोठे आवार,मोठे वृक्ष आणि घराला असलेली उंच छपरं यामुळे रात्री बाथरूमला एकटं जायची भीती वाटायची. आम्ही भावंडं एकमेकांच्या सोबतीने जायचो. पण जर मोठा नैसर्गिक कॉल आला तर मग आम्ही भावंडं गर्भगळीत व्हायचो. घराच्या बाहेर जवळपास २०/३० फुट लांब आणि चिंचेच्या झाडाखालून जाणाऱ्या पायवाटेने चालत गेल्यावर स्वच्छता गृह होते.आई सोबतीला असली तरी त्या आजूबाजूच्या अंधाराची, झाडाझुडुपांमुळे, रातकिडयांच्या आवाजामुळे तयार झालेल्या गूढ वातावरणाची जाम भीती वाटायची. त्यात आमच्या कडे कामाला असलेले नोकर आम्हाला काय काय भुताच्या गोष्टी सांगायचे. शाळेत कोणीतरी सांगितलं की चिंचेच्या झाडावर भूत असतं. आधी पोटात गडबड, त्यात जायच्या रस्त्यावर चिंचेचे झाड, मनात नोकरांनी सांगितलेल्या गोष्टींचा पिंगा ... काय अवस्था होत असेल बाल जीवाची ....... पण त्यावेळी नेमक्या त्या भुताच्या गोष्टी तेव्हांच आठवायच्या. आता आठवलं की हसायला येत. आई म्हणायची, "भूत-बित काही नसतं ,सगळे आपल्या मनाचे खेळ असतात". भीती वाटली की "भीमरूपी" म्हणायचं भीतीचा हा उपाय जो तेव्हां पाठ केला तो आज ही तोंडपाठ आहे. त्यावेळचा अजून एक किस्सा आजही आठवला की हसायला येतं .

माझ्या वडिलांचे काही कामाचे कागद ऑफिस मधे राहिले होते. वडिलांनी मला आणि माझ्या भावाला ते जाऊन आणायला सांगितले. ऑफिस आमच्या बंगल्याच्या शेजारी होतं . स्वच्छता गृह किती जवळ होतं त्यावरून ऑफिस किती जवळ असेल याची कल्पना सूज्ञ वाचकांना आलीच असेल. वडिलांना नाही म्हणण्याचा तो काळ नव्हता.वडील गेट जवळ उभे होते. मी आणि माझ्याहून दीड वर्ष लहान भाऊ, आम्ही दोघं निघालो. रस्त्यावरून एक साधू हातवारे करत आपल्याच नादात जात होता. माझ्या मनातल्या भीतीने मला पार वश केलं होतं. मी त्या साधूला पाहून जोरात "भूत भूत" ओरडले आणि माझ्या ओरडण्यामुळे थोडं पुढे गेलेला माझा भाऊ तसाच उलटा पळत आला. मी तर केव्हांच पोबारा केला होता आणि ज्याला बघून मी ओरडले तो साधू पण घाबरून पळत सुटला. गेट जवळ उभे असलेल्या माझ्या वडिलांची हसून हसून पुरेवाट झाली.

उन्हाळ्याच्या दिवसात आम्ही अंगणात बाहेर पलंग,खाटा टाकून झोपायचो. एक दिवस माझ्या वडिलांनी आम्हा दोघांना बंगल्याला फेरी मारून यायला सांगितलं. आम्ही भीतभीत फेरी मारली पण त्यामुळे भीतीवर मात करण्याची हिम्मत आली.

भीतीतून झालेल्या विनोद निर्मितीचे किस्से आयुष्यात पुढेही होत राहिले. मी कॉलेज मध्ये असतानां आम्ही माझ्या घरी मैत्रिणींनी मिळून हॉरर सिनेमा पाह्यचं ठरवलं. उन्हाळ्याचे दिवस होते. परीक्षा झाली होती. VCR भाड्याने आणून रात्री १०/१०.३० ला सिनेमा लावला. थोड्या वेळाने बेल वाजली.किल्ल्यांचा 

आवाज येत होता.वडील सेवानिवृत्त झाल्यामुळे सदनिके मधे आम्ही राहायला आलो होतो. माझ्या दोघी मैत्री खूप घाबरल्या, भयपटाच्या प्रभावामुळे त्या दोघींनी घट्ट मिठ्ठी मारली. मला म्हणाल्या बिलकुल दरवाजा उघडू नकोस. परत बेल वाजली. दरवाज्याला लावलेल्या भिंगातून बाहेर मी बघितले तर पॅसेज मधला लाईट गेल्यामुळे काही दिसत नव्हतं. माझा लहानपणीचा भित्रेपणा आता बराच कमी झाला होता. मी मनाचा हिय्या करून विचारलं, "कोण आहे?". बाहेरून गुरखा म्हणाला " मै हू दीदी, मीटर की चाबी देनी थी". मी दरवाजा उघडायला गेले तर,दोघी ओरडल्या," दरवाजा उघडू नकोस भूत गुरख्याचा आवाज काढत असणार" भयपटाचा बराच परिणाम झाला होता दोघींवर. मी हसून दरवाजा उघडला आणि किल्ली घेतली.माझे वडील बेलचा आवाज ऐकून बाहेर आले. दोघींची स्थिती पाहून त्यांना पण हसू आवरत नव्हते.दोघींचं मिठी मारलेले रूप आठवून आम्ही भेटलो की आजही खूप हसतो.

आयुष्यात भीतीची रूपं वेगळ्या प्रकारे समोर आली आणि नेहेमी करता मनावर त्यांचं गोंदण रेखाटलं गेलं. आपल्याला जिवलगांचं लहान वयात नेहेमी करता इहलोक सोडून जाणं मनाला फार वेदना देतं. हे दुःख ज्यांनी अनुभवलं आहे ते ही वेदना समजू शकतात. दवाखान्यातले ते दिवस...... पुढच्या क्षणाला काय होईल ही भीती, पुढे काय होणार आहे याची कल्पना असली तरी मनात चालेला आशा,निराशेचा खेळ काळीज कुरतडत असतो. पुसून टाकू म्हटलं तरी या आठवणी पुसल्या जात नाही.

माझ्या एका मैत्रिणीने तिच्या नवऱ्याचा जाच १० वर्ष सहन केला, "लोक काय म्हणतील" या भीतीने नातं निभावत राहिली, शेवटी एक दिवस "लोक काय म्हणतील" या भीतीवर मात करून जाचक नात्यातून बाहेर आली.कुठल्याही भीतीवर मात करण्यासाठी मनाला खंबीर बनवायला हवं. कशाची भीती वाटते हे जाणून घेतलं आणि त्यावर मात करण्याचा प्रयत्न केला की जीवन नक्कीच सुखकर होतं.

भीतीची सकारात्मक बाजू पण आहे. कुठलेही ध्येय गाठतांना, पूर्णत्वाला नेतांना मनाच्या तळाशी असलेली अनामिक भीती, दडपण, ते कार्य पूर्ण करण्याची नकळत चालना देत असतं बऱ्याचदा आजकाल ज्याला आपण “ fear pressure ” म्हणतो ते यशाकडे नेणाऱ्या शिडीचं काम करतं. पूर्वी घरोघरी असलेली शिस्त, वडील मंडळींचा धाक यामुळे कितीतरी चांगल्या सवयी मुलांच्या अंगवळणी पडायच्या. लवकर उठणं, झोपणं, संध्याकाळी पाढे, स्तोत्र म्हणणं, पानात वाढलेले खाणं .......अशा कितीतरी सवयी मुळे जीवनाला मिळालेले वळण “भीतीपोटी”असलं तरी फायदेशीर ठरलं. आपल्या तिन्ही संरक्षण शाखांमध्ये करडी शिस्त आणि वरिष्ठांचा धाक आहे. तिथले अनुशासन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची आदरयुक्त भीती यामुळे तिथे एका प्रकारची सुसूत्रता आणि विनम्रता आढळते.

तिथले अनुशासन कौतुकास्पद आणि उल्लेखनीय आहे. तेंव्हा मंडळी आपले पंतप्रधान म्हणतात तसं “ थोडा डर अच्छा है”.

- हेमांगी वेलणकर


1 टिप्पणी: