पलगा

ऋतुगंध ग्रीष्म वर्ष १३ अंक २

त्याच्या मॅनेजरनं वन ऑन वन लावली तेव्हाच आशीषला अपशकुन झाल्यासारखं वाटलं होतं. एरवी अप्रेजल सोडता कॅलेंडरवर वन ऑन वन त्याच्या मॅनेजरनं कधीच टाकली नव्हती. आपण रिडंडंट होणार का, या काळजीनं त्याला झोपही लागेनाशी झाली होती. त्यातच त्याच्या मॅनेजरनं दोन वेळा वन ऑन वन पुढे ढकलली. “काय असेल ते एकदाचं होऊन जाऊ दे. सारखी टांगती तलवार नको डोक्यावर,” आशीषला वाटत राहिलं पण करणार काय? कामात धड लक्ष लागत नव्हतं. उत्साहानं कुठलं काम करावंसं वाटत नव्हतं. भूक मेली होती. बायकोला सांगावं / न सांगावं त्याला ठरवता येत नव्हतं. पण ती काही बोलली नसली तरी त्याच्या गप्प राहण्यावरून तिला काहीतरी कळलं असंणारच. तिलाही उगाच टेंशन. नोकरी गेली तर परत मिळायला किती अवधी जाईल? तोवर ईएमआयचं काय करायचं, हा प्रश्न आ वासून त्याच्या पुढे उभा होता. 

कामावर हे असे प्रसंग येत राहतातच. आपली कामगिरी चांगली चालली आहे की नाही, आपण कामावर राहणार की नाही, आपल्याला चांगली पगारवाढ / बोनस मिळणार की नाही, आपल्याला टीमवर / टीमबाहेर महत्त्वाचं समजतात की नाही याची एक काळजीयुक्त चाचपणी बहुतेक जण करत असतात. 

माणसाच्या डोक्यात भीतीचं धुकं पसरलेलं असेल तर त्याला पुढचं स्वच्छ दिसणार कसं? भीती वाटायला लागली की स्वत:ला सुरक्षित कसं ठेवायचं या पलीकडे आपल्याला दुसरा विचार सुचत नाही. आपला मेंदू तसाच विकसित झालाय. वेगवेगळे धोके पटकन ओळखून त्यांच्यापासून स्वत:ला वाचवायचं कसं यांचे काही आडाखे मेंदूनं तयार ठेवलेले असतात. धोका दिसला की विचारात वेळ न घालवता मेंदू पटकन त्यातला एखादा मार्ग निवडतो. जे तीन मार्ग मेंदू सामान्यतः वापरतो ते म्हणजे “पलगा” - पळणं, लढणं, गारठणं (flight, fight, freeze). जीवावर बेतणारा प्रसंग असेल तर ह्यापलीकडे उपाय नसतोच. कैक लक्ष वर्षं मेंदू अशा प्रसंगांशी झगडत राहिल्यानं पटकन काही करता यावं म्हणून त्यानं ही पलगा पद्धत शोधून काढली. 

पण पलगा पद्धत ही आपल्याला शारीरिकदृष्ट्या कृतीसाठी तयार करत असते. मग कामावर मॅनेजर बरोबरच्या वन आॅन वन मधे मेंदूनं पलगा पद्धत वापरायची ठरवली तर काय होईल? पळणं मग वन आॅन वन ला न जाणं, वर्क फ्राॅम होम, आजारी पडणं, किंवा वेळ नसणं अशा स्वरूपात दिसतं. गारठणं मौन होतं; लोक गप्प राहतात, संभाषण बंद पडतं. लढणं भांडण होतं. अतार्किक वादविवाद घडतात. भावनिक आतषबाजी झडते. अर्थातच भावनांना बळी पडून पलगा प्रतिसाद वापरणं कुणालाच फायद्याचं नसतं. त्यानं विश्वासाला तडे जातात; लोक दुखावतात. आणि एवढं सगळं होऊनही संभाषण योग्य दिशेनं पुढे सरकत नाहीच. 

भीती वाटली की मेंदू सेफ्टी प्रोटोकाॅल वापरून पलगा पद्धत अंमलात आणतो हे लक्षात घेतलं की त्याविषयी काही करता येणं शक्य होतं. आत्मभान वापरून आपल्याला कसली भीती वाटतीये हे लक्षात आलं की स्वत:ला शांत करण्याचा प्रयत्न आवश्यक ठरतो. दीर्घ श्वास, वर्तमानभान, ध्यान किंवा इतर पद्धती त्याकरता वापरता येतात. त्याचबरोबर तार्किक मेंदू थांबून भावनिक मेंदू सक्रिय होतोय हे लक्षात आलं की तार्किक मेंदूकडे पुन्हा नियंत्रण सोपवण्यासाठी स्वत:ला प्रश्न विचारणं हा एक सोपा उपाय आहे. अर्थात या सगळ्या गोष्टी बोलायला सोप्या आणि प्रत्यक्ष प्रसंग उद्भवला की करायला अवघड असतात. पण स्वत:ला नवीन गोष्टी आपण शिकवतोच. तसंच हे कसबही शिकवता येतंच. त्यात घाबरायचं काय?

- नितीन मोरे


1 टिप्पणी:

  1. साधारण अंमलात आणण्याचा प्रयत्न करत असलेल्या गोष्टीचे विवेचन वाचून छान वाटले. आता “पगला” लक्षात ठेवायला सोपे!

    उत्तर द्याहटवा