साडी आणि मी

ऋतुगंध शरद - वर्ष १२ अंक ४

"कुठली दाखवू?", काउंटर पलीकडच्या माणसाने विचारले. हा प्रश्न मला अतिशय कठीण वाटतो. 
"अं.... कुठलीही", मीही तितक्याच पटकन उत्तरले; परंतु त्याच्या प्रश्नार्थक मुद्रेकडे पाहून म्हटले,"सिल्क,सिल्कची..... सिल्कची दाखवा." 

"सिल्क तिसऱ्या मजल्यावर", वर बोट दाखवत तो उत्तरला. 

"मग इथे काय आहे?", मी तितक्याच आत्मविश्वासाने विचारले. 

"इथे फक्त कॉटन आणि नऊवारी, त्या तुम्हाला नाही चालणार.", काही म्हणायच्या आत त्याने माझी आवड ठरवून टाकली. त्या सुंदर साड्या बघत मी तिसऱ्या मजल्याकडे वळले. साड्यांच्या दुकानात मी लिफ्ट न वापरता शक्यतो जिन्यानेच जाते म्हणजे सर्व प्रकारच्या साड्या बघता येतात. कुठे साडीला हात लावून बघ, किंमत बघ असे करत कशा प्रकारची साडी घ्यायची हे ही ठरवता येते. साडयांबद्दलच्या अगाध ज्ञानामुळे कुठल्या प्रकारची साडी घ्यायची हे मला साडी बघितल्या शिवाय कळत नाही.



दुसऱ्या मजल्यावरील साड्या अधिकच मोहक होत्या. रंगबेरंगी आणि चमचमणाऱ्या. ट्यूब लाईटच्या पांढऱ्या प्रकाशात अजून झगमगत होत्या. मी तिथे डोकावले आणि मागून पुन्हा तोच प्रश्न आला, "मॅडम काय दाखवू? साडी, लेहंगा की डिझायनर्स? आपल्याकडे डिझायनर्स साड्या पण आहेत. एका पेक्षा एक भारी, दाखवू?"

त्याच्या उत्साहावर पाणी फिरवत वर बोट दाखवत मी म्हटले,"अं....नको, सिल्क...सिल्कची पाहिजे." 

त्याने खालूनच आपल्या सहकाऱ्याला आवाज दिला,"अरे मॅडमला सिल्क दाखव."

खरंतर साडी हा एक सुंदर आणि तितकाच आकर्षक भारतीय पेहराव आहे यात दुमत नक्कीच नाही. पण साडी घातल्यानंतर त्यामध्ये किती कम्फर्टेबल वाटतं याबद्दल नक्कीच वेगवेगळी मतं असतील. माझ्यासारख्यांना साडीत अजिबात सुटसुटीत वाटत नाही, त्यामुळे नेसल्यावर सांभाळता येत नाही. त्यातून साडी नेसून दिवसभर वावरायचे असेल तर ती शिक्षा वाटते. त्यामुळे साडी जास्त वेळा नेसली जात नाही. नेसत नाही तर मग घ्यायची कशाला? त्यापेक्षा त्याच किंमतीत दोन ड्रेस घेता येतील हा हिशोब होतो. क्रम बदलला तरी हे चक्र असंच चालू रहाते. दुकानात गेल्यावर कशा प्रकारची साडी घ्यायची हा प्रश्न पडतो. कारण ऐवढ्या साड्यांच्या प्रकारांमधली आपल्याला कुठली चांगली दिसेल यापेक्षा कुठली नीट नेसता येईल हा यक्ष प्रश्न असतो. साडी विक्रेत्यालाही माझ्याकडे बघून हे समजत असावं त्यामुळे ते किती किमतीपर्यंत दाखवू किंवा किंमतीची रेंज विचारतात आणि पुढील काम सोपे होते. ढोबळ मानाने साड्यांचे दोन प्रकार मला नीट कळतात. कॉटन आणि सिल्क किंवा दोन्ही मिक्स. पारंपारिक आणि महाग प्रकारातील दोनच प्रकर्षाने कळतात पैठणी आणि कांजीवरम!

तिसऱ्या मजल्यावर पोहचले. तिथे पारंपारिक प्रकारांपासून ते सध्याच्या फॅशनपर्यंतच्या एकाहून एक सुंदर मनमोहक साड्या होत्या. मगाचा तो विक्रेता साड्या दाखवायच्या तयारीतच होता. त्याने भराभर साड्या दाखवायला सुरवात केली. नेहेमी प्रमाणे मी गोंधळून गेले. माझा गोंधळ उडालेला पाहून त्याने नवीन फॅशनच्या अजून काही साड्या काढल्या. एक-दोन साड्या तर त्याने स्वतः नेसून दाखवल्या. पण इतक्या सराईत पणे मला साडी नेसता (आणि सांभाळता) येत नसल्यामुळे दोन-तीन साड्या आवडूनही मी शेवटी माझ्या खिशाला परवडेल अशी एकच साडी घेतली.

चंदेरी, कोसा, कोटा, कांथा, मूगा, बालुचारी, जमदानी, संभालपूरी, इक्कत, इरकल, मंगलगिरी, पोचमपल्ली, माहेश्वरी, बोमकलली, पैठणी, पटोला, बांधणी, बनारसी कांजीवरम या आणि अशा असंख्य प्रकारांमधून समोर आलेली किंवा दाखवलेली साडी नेमकी कशी ओळखायची? साडी घेतल्यानंतरही ड्रेस सारखी लगेच घालता येत नाही. त्याबरोबर फॉल, पिको, परकर, ब्लाऊज असा सर्व लवाजमा येतो. हल्ली त्यात दागदागिने, मॅचिंगची पर्स, पोटल्या ह्यांचीही भर पडली आहे. अर्थात सर्वकाही मॅचिंगचे. हं अलीकडे मिक्स न मॅच अशी फॅशन आहे. 

जेवढे प्रकार साड्यांचे तेवढेच त्या नेसायच्या पद्धतींचे. एकही पिन न लावता साडी नेसता येणे आणि ती सांभाळणे हे खरंच कौशल्य आहे. पिना न लावाव्यात तर साडी सुटण्याची फजिती किंवा जास्त लावाव्यात तर साडी फाटण्याची भिती. अशीच एकदा जरा जास्त पिना लावून साडी नेसली. आपल्याला साडी आता छान नेसता यायला लागली या अविर्भावात सगळी कडे मस्त मिरवली. घरी आल्यावर बघितले तर चांगली वीतभर फाटली होती. रफू करायला शिंप्याकडे घेऊन गेले तर त्याने ती अजून फाटू शकते याची हमी दिली. असे असूनही साडी खरेदीची आणि नेसायची हौस काही जात नाही. हौसेला मोल नसते म्हणतात. हल्ली ऑनलाईन शॉपिंग मुळे घरबसल्या विंडो शॉपिंगही करता येते. तुम्ही केलेली खरेदी अगदी घरपोच मिळते. तरीही दुकानात जाऊन साडी खरेदी करण्याची मजा काही औरच!

फोटो सौजन्य : इंटरनेट

- अनिता पांडकर





1 टिप्पणी: