बघता बघता २५ वर्षे कशी गेली ते पत्ताही न लागलेल्या दीपाला आता लग्नाच्या २५ व्या वाढदिवसाचे वेध लागले होते. हा रौप्यमहोत्सवी आनंदाचा दिवस कसा साजरा करायचा त्याचे बेत मनात आखणे सुरु झाले होते. नवऱ्यानेही दीपाच्या आवडी-निवडीचा विचार करून बघताक्षणी तिच्या मनात भरेल अशी भेटवस्तू दिल्याने दीपाच्या आनंदाला पारावार राहिला नाही. विविध रत्ने जडवलेल्या सुरेख बांगड्यांचा सेट त्या दिवशी हातात पडल्यावर दीपा हरखून गेली. मैत्रिणींनी शुभेच्छा देताना "आज नवऱ्याकडून काय विशेष भेटवस्तू मिळाली?", असा प्रश्न केला. आणि त्यावर दीपाने "आता भेटू तेव्हा प्रत्यक्षच दाखवते", असे उत्साहात म्हटले. कधी एकदा त्या बांगड्या मैत्रिणींना दाखवता येतील म्हणून दीपा वाट बघू लागली.
लवकरच एका हळदीकुंकवाचे आमंत्रण आल्याने ती संधीही आली. खूप हौसेने दीपाने त्या दिवशी त्या बांगड्या घातल्या. उत्साहाने सगळा जामानिमा करून दीपा छान तयार होऊन हळदीकुंकवाला गेली. अपेक्षेप्रमाणेच तिथे गेल्या गेल्या मैत्रिणींचा गराडा दीपाभोवती पडला, आणि "बांगड्या कुठून घेतल्या?, कधी घेतल्या?" असा प्रश्नांचा भडिमार सुरु झाला. बांगड्यांवरच्या खड्यांच्या सुरेक्ष नक्षीचे कौतुकही झाले. अचानक एक मैत्रीण म्हणाली, "अगं दीपा, हा इथला एक खडा काय झाला ग?" खरेच! एक मोठा खडा आता जागेवर दिसत नव्हता खरा! त्यामुळे बांगडीवर तिथे एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. खडा नकळत कधीतरी निखळून पडला होता बहुतेक. झाले, आता प्रत्येकीचे लक्ष त्या बांगडीवरची सुंदर नक्षी सोडून खडा निखळलेल्या जागी वळले. चिवचिवणाऱ्या त्या थव्यात आता अचानक नीरव शांतता झाली. इतका वेळ भरभरून कौतुक करणाऱ्या मैत्रिणींना, क्षणात त्या निखळलेला खड्याने निर्माण केलेली पोकळी आता खटकू लागली. त्या बांगडीत जडवलेल्या इतर अनेक सुंदर खड्यांकडे आता कुणाचे लक्ष जाईनासे झाले. दीपा हिरमुसली.
मनुष्य स्वभावही असाच असतो. आयुष्यात कितीही आनंदाचे क्षण असले, तरी एखादा लहानसा दुःखाचा क्षण त्या आनंदावर विरजण घालायला त्या निखळलेला खड्यासारखा पुरेसा ठरतो. आयुष्यात कमावलेल्या अनेक सुखद गोष्टींपेक्षा, गमावलेली एखादी गोष्टही आनंदाला तडा जायला कारणीभूत ठरते. "आपल्याला जे मिळाले आहे त्यात आनंद मानावा आणि समाधानी रहावे" असे म्हणतात. पण हे कितीही कळले, तरी न वळता, न मिळालेल्या गोष्टींबद्दल खंत मानत राहून आपण अनेक आनंदाच्या कारणांना मुकतो. कधी कधी तर आपण आपल्या हाताने एखादे रत्न गमावून बसतो. असेही घडते, कि एखाद्या व्यक्ती मध्ये कितीही चांगले गुण असोत, पण त्या व्यक्तीचा एखादा दुर्गुणही ती व्यक्ती मनातून उतरायला कारणीभूत ठरतो. अनेक गोष्टी त्या व्यक्तीने आपल्या हितासाठी प्रेमाने केलेल्या असोत, पण एखादी चूक ती व्यक्ती आपल्या नजरेतून उतरायला आणि नात्याला तडा जायला पुरेशी ठरते.
कधी तो निखळलेला खडा एखाद्या हुकलेल्या संधीच्या रूपात आपल्या आयुष्यात येतो तर कधी आपली काहीही चूक नसताना अचानक आपल्या आयुष्यातून निघून गेलेल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या रूपात. पण आपण मात्र आपल्या आयुष्यातले अनेक मौल्यवान आनंदाचे क्षण अश्या मृगजळाच्या मागे धावण्यात घालवून बसतो, जे कितीही त्यामागे धावले तरी आपल्या हाती लागत नाही. जशी एखादी संधी हुकते ते चांगल्याकरता, तसेच एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून जाते तेही कदाचित आपल्या भल्याकरताच; पण हे कळायला काही काळ जावा लागतो. तेवढा धीर आणि सबुरी पुष्कळदा आपल्यामध्ये नसते. कालांतराने आपल्या लक्षात येते, की ती निसटलेली संधी किंवा व्यक्ती आपल्यासाठी खरे तर भविष्यात घातकच ठरली असती. दूरदृष्टी असणे कधीही उत्तमच; पण अशी दूरदृष्टी काय उपयोगाची, ज्याने आपली जवळची दृष्टीच अधू होऊन जाईल?
निखळलेला एखादा खडा नजरअंदाज करून, आयुष्यात जडवलेल्या इतर सुंदर खड्यांना जपणारे, आणि मिळालेल्या प्रत्येक क्षणाचा आनंदोत्सव करून जगणारे विरळाच.
डॉ अर्चना कुसुरकर
उत्क्रुष्ट आणि सहजसुंदर लेख
उत्तर द्याहटवाSunder
उत्तर द्याहटवा