ये मोह मोह के धागे...

ऋतुगंध हेमंत वर्ष १२ अंक ५

नोकरी आणि संसाराच्या धकाधकीतून बऱ्याच दिवसांनी अलकाला आज निवांत वेळ मिळाला होता. नवरा कामानिमित्त परदेशी गेला होता, आणि मुलेही दिवसभर मित्र-मैत्रिणींबरोबर बाहेर जाणार होती. खूप दिवसांनंतर सगळ्या ग्रुपचा दिवसभर भेटून भटकण्याचा बेत ठरला होता. सगळीकडे छान क्रिसमस आणि इयर एन्ड चे सेल ही लागले होते. एखाद्या मॉल मध्ये भेटून कॉफी, खरेदी, बुफ्फे लंच, गप्पा असा भरगच्च बेत आखून दिवस मजेत घालवावा असा विचार होता सगळ्या जणींचा. आज अगदी ठरवलंच होतं अलकाने, मस्त सेल लागला आहे, तर मनसोक्त खरेदी करायची. त्यात पुन्हा नोकरी म्हटल्यावर कपडे काय असतील तेवढे कमीच. मैत्रिणींची साथ, सुट्टीचा मूड या नादात खरेच भरपूर मनासारखी खरेदी झाली कपड्यांची. कपड्यांबरोबरच त्याला मॅचिंग चपला, इअर-रिंग्स, पर्स हेही अर्थातच आलेच ओघाने. आनंदात गुणगुणतच घरी आली अलका. 

खरेदी केल्यानंतर घरी आल्यावर ओघाने येणारा, थोडासा वेळखाऊ, पण अत्यंत आनंददायी असलेला भाग म्हणजे ते सगळे कपडे आणि इतर खरेदी छान कपाटात लावून त्याकडे डोळे भरून निरखून पहायचे. त्याच विचाराने अलकाने कपाट उघडले तर काय, तिथे तिळ ठेवायला जागा नव्हती. आता नवीन कपड्यांना तिथे जागा करणे तर भागच होते. एवढा वेळ छान उत्साहात असलेल्या अलकाला अचानक शीण जाणवायला लागला दिवसभराच्या भटकंतीचा. नाईलाज म्हणून का होईना पण तिने कपाट आवरायला घेतले. आवरताना तिच्या लक्षात आले, की यातले बरेचसे कपडे तिने अनेक वर्षांत घातलेही नव्हते. हा टॉप अमूक वाढदिवसाला नवऱ्याने घेतला होता त्याची आठवण म्हणून, तर तो ड्रेस आणि दागिना आईने एकदा दिला होता तो कसा टाकणार? एखादी वापरात नसलेली साडी सासरच्या कुठल्या तरी आठवतही नसलेल्या नातेवाईकांनी दिली होती, ती जर टाकली असती तर सासरी महाभारतच घडले असते. अश्या प्रत्येक ड्रेसशी आणि वस्तूशी कुठल्या ना कुठल्या आठवणी किंवा कारणे निगडित असल्याने अनेक वेळा ठरवूनही आधीच खचाखच भरलेले कपाट अजूनच भरत चालले होते. काही ड्रेस तर आवडते होते, स्वतःच हौसेने घेतलेले होते, पण साहजिकच आता एवढ्या वर्षांनंतर अंगाला होतही नसल्याने पडून होते तसेच. 

अलकाला आता काहीतरी विचार करणे भागच होते. जरा सारासार विचार करता अलकाच्या लक्षात आले, कि हे कपडे नसून “मोह मोह के धागे” होते जणू. प्रत्येक कपड्याशी आठवणींच्या रूपात भावनिक मूल्ये निगडित होती. ते कपडे आणि वस्तू टाकून देणे म्हणजे त्या भावनांचा आणि माणसांचा अपमान तर नाही ना असा विचार इतके दिवस अलका करत होती. पण थोडा सोयीस्कर विचार केल्यावर अलकाला जाणवले, कि हे ड्रेस टाकले, तर त्याच्याशी निगडित आठवणी थोड्याच पुसल्या जाणार आहेत? कायम त्या 
मनात तश्याच जिवंत रहाणार. जी माणसे जवळची आहेत, आणि कायम हृदयाच्या जवळ रहाणार आहेत, त्यांच्या आठवणी कुठल्या वस्तूच्या मौताज आहेत का? ज्या वस्तू कुणी दिल्या होत्या ते आता आठवतही जर नसेल, तर त्या वस्तू तितक्या महत्वाच्या आहेत का? उलट ते कपडे एखाद्या गरीबाला दिले, तर त्याचे भलेच होईल. आणि “बारीक झाल्यावर घालू”, अश्या आशेवर वर्षानुवर्षे ठेवलेल्या कपड्यांची अडगळ किती ती वाढवायची? आपण बारीक झालोच, तर बक्षीस म्हणून मस्त काहीतरी नवीन घेऊ आपल्याला असेही आश्वासन दिले अलकाने स्वतःला. वयामुळे आलेल्या परिपक्वतेमुळे म्हणा, किंवा आयुश्यातल्या
बऱ्या -वाईट अनुभवांमुळे म्हणा, आपण असा विचार आता करू शकतो आहे याचे अलकाला आश्चर्य आणि कौतुक तर वाटलेच, पण हा विचार आपण आधीच करायला हवा होता याची जाणीवही झाली. अलकाने सरळ ते कपाट आवरून, त्यातले बिनकामाचे कपडे आणि वस्तू क्लिअर करून नवीन कपड्यांसाठी आणि वस्तूंसाठी तिथे जागा केली. 

आपल्या मनाच्या कपाटात डोकावून बघितले तर आपल्या सहज लक्षात येईल, कि आपण आपल्या मनाच्या अनेक कप्प्यांतही असेच अनेक “मोह मोह के धागे” वेगवेगळ्या रूपांत साठवून ठेवलेले असतात. त्यात जुने नकोसे आणि दुःखदायक असे अनुभव तर असतातच, शिवाय आता काही संबंध नसलेल्या माणसांच्या अप्रिय अपमानकारक आठवणीही तिथे असतात. यातले काही धागे गुंतत जाऊन मनात उगाचच ठुसठुसणाऱ्या गाठींची अडगळ निर्माण होते. त्या मोहाच्या गुंत्यात आपण अकारण अडकत जातो आणि त्यातून बाहेर पडणे स्वतःच मुश्किल करून टाकतो. त्या धाग्यांच्या गुंत्याचा ना आपल्या वर्तमानाशी संबंध असतो, ना भविष्याशी काहीं नाते. हे भूतकाळाच्या नकारात्मक धाग्यांचे विनाकारण दुःख देणारे गुंते वेळच्यावेळी सोडवून, आणि तो गुंता न सुटल्यास वेळप्रसंगी ते पाश तोडून, ती अडगळ साफ करून तिथे नव्या सुखद आठवणींसाठी, नव्या माणसांसाठी आणि सकारात्मक अनुभवांसाठी जागा करून तर बघा कि आयुष्य किती सोपे, सरळ, स्वच्छ आणि आनंदी बनते ते.

- डॉ अर्चना कुसुरकर


६ टिप्पण्या:

  1. ये मोह मोह के धागे हे शिर्षक अगदी साजेसे दिलेस . गुंतुनी गुंत्यात सारा पाय माझा मोकळा ..हेच खरे आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. अत्यंत मोजक्या शब्दात परिणामकारक विचार मांडणारी कथा, खूप छान!

    उत्तर द्याहटवा