टूर द माऊंट ब्लांक - भाग २

चालता चालता मुक्कामाची जागा येऊ घातली होती. एकमेकांच्या अबोल सहवासाचा आनंद घेत झप झप पावले टाकत आम्ही चाललो होतो. 

दुसऱ्या दिवशी दिसणारी निसर्गदृश्ये पाहायला आणि इतर सहप्रवाशांच्या जीवनगोष्टी ऐकायला मी आतूर होतो. 

आजूबाजूचे डोंगर आणि इतर सृष्टीसौन्दर्य जितके पाहण्यासारखे होते किंबहुना त्याहून जास्त पाहण्यासारखी होती ती युरोपातली खेडी. आखीव रेखीव, सुंदर, चित्रातल्यासारखी. छोटीच पण टुमदार घरं. घरांच्या भिंती, छत, कुंपणाच्या भिंती यांची मोहक रंगसंगती. घराच्या आजूबाजूला आणि खिडकीच्या खाली ठेवलेल्या पॉटर्समधली नाजूक फुल. प्रत्येक घर वेगळं, पण तरी खेड्यातील इतर घरांशी सुसंगत वाटणारं. मी प्रत्येक वळणावर थांबून फोटो काढत होतो. माझी चित्रकला किंवा रेखाटनकला चांगली असती तर तिथेच बसलो असतो. आता या इतक्या नयनरम्य खेडेगावात आपण नेमके कुठे राहणार अशी एक उत्सुकता होतीच. हळू हळू तिथे पोचलो.
तिथली गावकरी मंडळी… खरंतर त्यांना पण गावकरी कसं म्हणायचं? आपल्याकडं खेड्यांमध्ये संध्याकाळ व्हायला लागली कि काय दृश्य असतं? सगळे गावकरी पारावर किंवा जिथे गावातला एकमेव चालणारा दिवा किंवा टीव्ही असेल तिथे जमतात. पूर्वी जेव्हा वीज आणि टीव्ही नव्हता तेंव्हा गावातली एकमेव तुटकी फुटकी पेटी आणि तबला, ढोलकी किंवा डफ अशा कोणत्याही तालवाद्याशी साधर्म्य नसणारे तालवाद्य घेऊन मंडळी जमतात आणि भजन म्हणतात, गाणी म्हणतात एकमेकांची थट्टा मस्करी करतात. ज्यांच्या घरी आज चांगलं जेवण असेल ते पटकन घरी जातात आणि जे तेवढे भाग्यवान नसतात ते मात्र भजन गात पारावर बसून राहतात … जणू काही भूक पारावर येऊच शकणार नाही. असो. हे सगळे सातासमुद्रापलीकडे सोडून मी इथे आलो होतो. 

तर तिथली ती गावकरी मंडळी अतिशय आनंदात नांदताना दिसली. घरांच्या आउटहाऊस मध्ये छोटी छोटी दुकानं होती, त्यात मोठ्यांदा लावलेल्या संगीताचे स्वर वातावरण आनंदमय करत होते. बहुतेक सगळे सगळ्यांना ओळखत असावेत. कारण दुकानदार रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना अभिवादन करत होते. काहीतरी बोलत होते. सगळे आनंदात आहेत कुठं दारिद्रय दैन्य याला थारा नव्हता. क्वालिटी ऑफ लाईफ उच्च दर्जाची वाटली. सगळंच आगळ वेगळं. असं अनुभवायलाच तर आपण प्रवास करतो ना. 

आत्तापर्यंत मी जितके ट्रेक केले होते त्यात माझा अनुभव असा होता की मुक्कामाची जागा ही खूप दमून डोळे मिटून आडवं पडण्याशिवाय दुसरं काहीही करण्याच्या लायकीची नसते. एव्हरेस्ट बेस कॅम्पला आम्ही टी हाऊस मध्ये राहिलो. टी हाऊस म्हणजे आत शिरल्या शिरल्या दर्शनी भागात एक छान सजवलेले उपहारगृह. त्याच्या मागे सार्वजनिक स्वच्छतागृह. त्याच्या पुढे लागलेल्या रांगा. आणि मग एखादा चिंचोळा जिना आणि वर अगदी छोट्या छोट्या खोल्या. एका खोलीत दोघे जण. फार मोठी बॅग आणायची सोय नाही. इतकंच काय रात्री बॅग आवरल्याशिवाय झोपणे ही शक्य नाही. कारण दोघांना जेमतेम झोपता येईल आणि बॅग बाजूला ठेवता येईल एवढीच जागा. माउंट फूजीचं वर्णन तुम्ही वाचलंच असेल. जेमतेम एक माणूस झोपेल एवढी जागा आणि ती सुध्दा सार्वजनिक. स्त्री पुरुष सगळे एकत्र. पण एक अस्सल मराठी माणूस म्हणून तुम्हाला सांगतो आम्ही आपल्या शिवरायांच्या गडांवर ज्या ज्या जागी झोपलोय किंवा आडवे पडलोय म्हणा त्याला जगात तोड़ नाही. एखाद छत न फाटलेलं देऊळ मिळालं तर फाइव्ह स्टार हॉटेल मिळाल्याचा आनंद व्हायचा. नाहीतर अशी जागा मिळावी की डोकं आणि पाय हे एका रेषेत आणि एका पातळीत असतील, आणि रात्री अंगावरून साप किंवा उंदीर किंवा तत्सम प्राणिमात्र वळवळू नयेत एवढी माफक अपेक्षा असायची. असे ट्रेक करून झाल्यानंतर शिवाजी आणि त्यांच्या मावळेमंडळींबद्दलचा आदर कसा शतगुणित झाला काय सांगू. 

तर अशा पार्श्वभूमीवर युरोप मधल्या एका खेडेगावात आम्ही मुक्कामाच्या दिशेला चाललो होतो.

अखेरीस आम्ही आमच्या मुक्कामाच्या जागी पोचलो. ते चक्क आपल्याकडच्या थ्री स्टार हॉटेलला थोबाडीत मारेल इतकं छान होतं. झोपायला बेड, जाड जाड पांघरूण आणि चक्क अंघोळीला गरम पाणी... रोजच्या रोज. हे मात्र माझ्या तत्वांमध्ये बसणार नव्हतं. आत्ता पर्यंतच्या कोणत्याही ट्रेकमध्ये अंघोळीचा प्रसंग माझ्यावर फारसा आला नव्हता. ट्रेकमध्ये अंघोळ म्हणजे पाण्याचा अपव्यय असं समीकरण माझ्या मनात पक्के बसलेले होते. माझं दुष्ट मन मला सांगत होत कि अख्ख्या एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या १५ दिवसाच्या ट्रेकमध्ये आम्ही दोनदाच अंघोळ केली होती आणि किती मजा आली होती. त्या दुष्ट मनाला गप्प बसवत मी प्राप्त परिस्थितीचा स्वीकार करत नाईलाजाने गरम पाण्यात अर्धा तास अंघोळ केली. ताजातवाना झालो.

आजूबाजूला काय आहे ते बघायला बाहेर पडलो. शेजारीच एक छोटंसं रेस्टॉरंट होतं. काय थाट त्या रेस्टॉरंटचा. छोटे रेस्टॉरंट, त्याच्या समोर छोटे अंगण आणि त्याच्या अगदी समोर थेट डोळ्यात डोळे घालून बघता येईल असा आमचा माउंट ब्लांक. त्या अभूतपूर्व दृश्याचे मनापासून रसग्रहण करता यावे म्हणून त्या कल्पक रेस्टॉरंट मालकाने आराम खुर्च्या टाकल्या होत्या. शेजारी शेजारी. आणि तिथेच लोकल वाईन विकत होते. खरं सांगू, आयुष्य एन्जॉय कसे करायचे हे युरोपिअन लोकांकडून शिकण्यासारखे आहे. त्या छोट्याश्या निनावी खेडेगावातही इतकी छान सोय करून ठेवली होती. अंघोळीने ताजातवाना झालोच होतो. आता छान पाय पसरून माउंट ब्लांककडे बघत निनावी वाइनचा आस्वाद घेत बसलो. माउंट ब्लांक नावाप्रमाणे पूर्णपणे धवल दिसत होता. छोट्या छोट्या कड्याकपारी आणि त्यांच्या सावल्या तेवढाच काय तो करडा रंग. बाकी सगळं निष्कलंक पांढरं. थोड्या वेळानी पर्वत माथ्यावर सूर्याची किरणे पडली. माथा सोनेरी झाला. झळाळू लागला. दैदिप्यमान या शब्दाच्या खरा अर्थ समोर दिसला. आयुष्यातली एक संध्याकाळ हेवा वाटावी इतकी सोनेरी झाली.

दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करून मार्गस्थ झालो. त्या खेडेगावातल्या छोट्या छोट्या गोष्टी टिपत, म्हणजे एखाद नाजूक फुल किंवा छान रंगवलेली भिंत, किंवा एखाद्या घराचे कोरीवकाम केलेला दरवाजा अस पाहत पाहत, त्यांचे फोटो काढत त्या एकमेकांना दाखवत हळू हळू पुढे चाललो होतो. अशा ट्रेक मध्ये अजून एक गोष्ट शिकायची असते - एका क्षणात जगणं. एखादं फुल गोंजारावंस वाटलं तर गोंजारायचं, एखादा सेल्फी काढावासा तर काढून टाकायचा, एखादा फोटो घ्यावासा वाटला तर घेऊन टाकायचा. कारण १०० पावलं पुढं गेल्यावर या सगळ्या गोष्टी फक्त गोड आठवणी होणार असतात. परत जाऊन फोटो घेऊ म्हणाल तर शक्य नाही. जे काय करायचं ते इथे आत्ता या क्षणात. 

गावातून बाहेर पडून डोंगरावर जाणारी पायवाट पकडली. हळू हळू चढण चढत चढत मार्गक्रमणा सुरु झाली. ज्या खेड्यात सोनेरी संध्याकाळ घालवली ते खेडे आता आठवणींचा एक तारा झाले. लांबून लुकलुकणारा तारा. अनोळखी पण सुंदर फुलं पानं बघत बघत पुढं चाललो होतो. इतक्यात डॅनडेलीऑनची नाजूक झुडपं दिसली. उन्हाळा सुरु झाला होता डॅनडेलीऑनची फुलं तरारून उठली होती. मी त्यातलं एक फूल खुडलं आणि फुंकर मारून सगळ्या बिया उडवल्या. खूप मस्त वाटलं.

उल्हास ला म्हणालो, “अजून एकदा करतो. विडिओ काढतोस?” 

तो हसत म्हणाला, “अरे काय हा बालिशपणा!” 

मी म्हणालो, “अरे हवं ते करता यावं म्हणूनच तर आलो इथे. मोठ्या माणसासारखं वागायला आहेच ना नॉर्मल लाइफ.”

त्याने हसत हसत माझा विडिओ काढला. बाकीचा ग्रुप आमच्या बालिशपणाला मागे सोडून मार्गस्थ झाला होता. मग म्हणालो, ”चला”.

तर उल्हास म्हणाला, “थांब. माझा पण कधी एक विडिओ डॅनडेलीऑन उडवताना.” 

मी हसलो. आमच्या ग्रुपचं सरासरी वयोमान झपाट्यानं कमी होताना दिसत होतं.

हळू हळू पुढे जात होतो. आजूबाजूची दृश्यं मनात साठवत होतो. ल्युक पूर्णवेळ त्याच्या आजूबाजूच्या लोकांना काही ना काही माहिती सांगत होता. आजूबाजूच्या शिखरांची नावं, थोडी फुलं-पानांची माहिती, पक्षांचे आवाज ऐकून त्यांच्याबद्दलची थोडी माहिती. ऐकणारे ऐकत होते. मला माझा हा ट्रेक एक अनुभव म्हणून मनात साठवायचा होता, शैक्षणिक सहल म्हणून नाही. म्हणून मी थोडा लांबूनच चालत होतो. मला रानपक्षाची शीळ ऐकायची होती, त्याचे नाव लक्षात ठेवायचे नव्हते. लांबच्या शिखराचे रंग मनात साठवायचे होते, त्याच्या समुद्र सपाटीपासूनच्या उंचीत आणि जगातल्या उंच शिखरांच्या क्रमवारीत त्याचा क्रमांक कितवा आहे यात अजिबात रस नव्हता. त्यामुळे मी मागे मागे रेंगाळत चाललो होतो. 

जितू बरोबर असलेला १९-२० वर्षाचा मुलगा सुद्धा मागे मागेच चालत होता. त्याच नाव रिषी. म्हणजे खरंतर ऋषीकेष पण रिषी म्हणजे कसं यो वाटतं. म्हणून रिषी. तो खूप बिझी होता. एखादे सुंदर दृश्य दिसले की त्याचा उभं राहून फोटो काढायचा सोडून तो त्याचा गवतात घुसून फोटो काढत होता. लहान मुलात बालिशपणा असतो तशी चौकस बुद्धी पण असते. मग आपसूकच मी पण त्याच्या बरोबर गवताडीत घुसलो. काही न विचारता तो काय करतोय ते पाहू लागलो. मला पाहिल्या पाहिल्या त्याच्या चेहऱ्यावर जे प्रश्नचिन्ह उमटले होते ते हळू हळू विरून गेले. मग तो मला काय करतोय ते सांगू लागला. लांबवर U आकाराची डोंगर रांग होती. त्याचे शुभ्र पांढरे माथे चकाकत होते. तो पांढरा रंग जसा जसा खाली जात होता तसतसा राखाडी आणि हिरवा होत होता आणि सर्व डोंगरांच्या मध्ये एक हिरवीगार दरी होती. दरी मध्ये ऊन पोचत नव्हते त्यामुळे ती अजूनच गडद हिरवी दिसत होती. त्यामुळे डोंगरमाथा ते दारी या मध्ये मस्त कॉन्ट्रास्ट दिसत होता. मी लगेच फोटो काढला. रिषी हसला आणि म्हणाला, “विवेक काका, आता मी कसा फोटो काढतो बघ.”

मी म्हणालो, “काका कोणाला म्हणतोस? तसा फार मोठा नाही मी तुझ्यापेक्षा.” 

हे धादांत खोटं होत. रिषीला पण ते माहित होत. 

पण माझी समजूत काढत तो म्हणाला, “मी जितू ला जितू काका म्हणतो. तू पण मला तितकाच इंटरेस्टिंग वाटतोस. म्हणून मी तशीच हाक मारू?”

माझ्याकडे काही उलटे अर्ग्युमेण्ट नव्हतं. रिषी LLB च्या पहिल्या वर्षाला होता.मला बोलण्यात हार थोडेही जाणार होता. मी निमूटपणे वी-काका वर सौदा तोडला.

“तर वी-काका, तू घेतलास ना त्या फोटो पेक्षा वेगळे टेक्निक दाखवतो तुला.” 

“अरे पण माझा फोटो बघ ना किती छान आलाय.”

“आलाय छान पण हा फेसबुक क्वालिटी आहे. तुला इन्स्टा क्वालिटीचा फोटो पाहिजे का?”

“होय.”

“मग मी म्हणतो ते ऐक, वी-काका.”

रिषी एकीकडे काकापण म्हणत होता आणि शिक्षकपण झाला होता. मी निमूटपणे माझ्या नवीन पुतण्याकडून शिक्षण घ्यायला सुरुवात केली.

“हे बघ. आपण काय करायचं की गवतात जायचं. एखाद छान फूल निवडायचं. आणि ते फोरग्राऊंडला ठेवून सगळी लँडस्केप बॅकग्राऊंडला ठेवून फोटो काढायचा. आणि फोटो एकदम इंस्टा क्वालिटीचा हवा असेल तर फूल पूर्ण फोकसमध्ये ठेवायचं आणि मागचे दरी-डोंगर एकदम ब्लर झाले पाहिजेत.”

“अरे पण त्या डोंगर द-यांचे फोटो काढायला इथे आलो ना? तेच ब्लर करायचे?” मी म्हणालो. 

शिक्षकाचा सूर लावत रिषी म्हणाला, “तुला इंस्टा क्वालिटीचे फोटो हवेत की नकोत?”

“हवेत.” सपशेल शरणागती. 

“मग मी म्हणतो तसं कर.”

पाच मिनिटांपूर्वी इन्स्टा फोटो क्वालिटी हे भानगड काय आहे हे ही मला माहित नव्हतं. पण पाच मिनिटात ती क्वालिटी कशी गाठायची आणि कसं जगात यो म्हणून जगायचं असं प्रौढशिक्षण मला माझ्या नवीन पुतण्यानी दिलं. त्याने शिकवल्या प्रमाणे २-४ फोटो काढून आम्ही आमच्या ग्रुपला गाठायला पुढं निघालो. 


हिरवंगार गवत, रान फुलांचे मेडो मागे पडले. मग मध्ये झाडझुडपं लागली आणि अचानक एक छोटं खिंडीवजा चढण पार केल्यावर आजूबाजूचा पूर्ण देखावाच बदलला. आता आम्ही त्या लांबून दिसणाऱ्या बर्फाच्छादित डोंगरांवर पोचलो होतो. आमच्या पायापासून सुरु झालेला बर्फ थेट डोंगरमाथ्यापर्यंत सलग जात होता. आणि त्याच्यावर निळेशार आकाश. तिसऱ्या रंगाची गरज नव्हती. ते निसर्गचित्र इतके सुंदर होते की आमचे देहभान हरपले. त्या चित्राचे फोटो काढायला मला कोणतेही टेक्निक नको होते. निसर्गाने भरभरून दिलेले ते सौन्दर्य अचूक टिपणारा कॅमेरा अजून जन्माला यायचा होता. ह्या चित्राची क्वालिटी इन्स्टाच्या फार वरची होती. तिथेच काही क्षण शांत बसलो. कोणाशी ना बोलता. ते दृश्य डोळ्यात, मनात साठवून घेतले. मग डोळे मिटून काही क्षण काढले. माझी एक स्वतःसाठी तयार केलेली एक थियरी आहे. की आयुष्यात एक वेळ अशी येईल की तुम्हाला बाहेरचे काही दिसणार नाही, ऐकू येणार नाही कशाचा वास येणार नाही. त्यावेळेला तुम्ही मनात खोलवर साठवलेले हे क्षण तुम्हाला साथ देतील. नुसते डोळे मिटून माझ्या ह्या ट्रेकचा विचार केला की मी त्या धवलपर्वतमालेच्या मधोमध जाऊन बसू शकेन. 

स्वित्झरलँडच्या वॅन ड्राइवरप्रमाणेच ल्युक पण म्हणाला की यावेळेला हिवाळा फार कडक होता म्हणूनच आम्हाला तिथे बर्फ मिळालं नाहीतर त्या स्पॉटला जनरली मेडो असतात. ‘दाणे दाणे पे लिखा है खाणे वाले का नाम’ च्या समानार्थी म्हण असायला पाहिजे होती असा वाटून गेलं.

भारावलेले थोडे क्षण संपले आणि मग पोरकटपणा जागा झाला. मी बर्फाचा गोळा करून रिषीला आणि उल्हासला मारला. आधी सगळ्यांनी काय हा पोरकटपणा म्हणून उपहास केला. पण दोन चार बर्फाचे गोळे जेंव्हा त्यांच्या अंगावर आदळले तेंव्हा त्यांच्यातला पोरकट पण खडबडून जागा झाला. थोड्याच वेळात वय वर्ष ४० ते वय वर्ष ६० मध्ये असलेला तो आमचा १०-१२ जणांचा ग्रुप बर्फाची मारामारी करायला लागला. कोणी लहान नाही कोणी मोठे नाही. कोणी ओळखीचे नाही कोणी अनोळखी नाही. घे गोळा आणि मार. 

मारामारी करून सगळे दमले. मग त्या बॅकग्राऊंडवर आपले फोटो काढण्याची चढाओढ सुरु झाली. आजूबाजूला बर्फ आणि सुंदर दृश्य पाहून मला बालपणी मनावर झालेले बॉलिवूडचे संस्कार आठवले. मग मी शाहरुख खानची हात पसरून काजोलला बोलावण्याची पोझ घेऊन फोटो काढला. आता उल्हास, जितू याना उत्सुकता होती. ते म्हणाले आम्हाला पण असा फोटो काढायचा आहे. आम्हाला पोझ शिकव. मग काय? इतके उत्सुक विद्यार्थी मिळाल्यावर मी काय सोडतोय. त्यांना शाहरुख पोझ शिकवली. त्यांनी पण फोटो काढले. मग आम्ही ल्युकला पकडले आणि त्याला पण शाहरुख पोझ करायला लावली. इतकी धमाल त्या दिवसापर्यंत कधी आली नव्हती.
 अशा गोष्टी तुम्हाला ट्रेक मधेच करता येतात. आपली इमेज, लोक काय म्हणतील ही भावना, आपण नाही हं असले पोरकट असे फालतू विचार बाजूला ठेवून आयुष्यातला थोडा वेळ एन्जॉय करायला लांब डोंगरातच जावं लागत. आपणच आपल्या व्यक्तिमत्वावर मुखवटे चढवलेले असतात आणि मग आपण कोण आणि मुखवटा कोणता याची गल्लत व्हायला लागते. माझ्या या वार्षिक ट्रेक मध्ये मी जमेल तितके सगळे मुखवटे काढून फेकून देतो आणि प्रौढत्वी निज शैशवास जपण्याचा प्रयत्न करतो. 

सगळ्यांचा मूड पाहून ल्युकनी लंच ब्रेक तिथेच घ्यायचा ठरवलं. त्याने आपल्या बॅग मधून मोठी चटई काढली. त्याने मोठे बागे ब्रेड आणले होते, चीज, हॅम, टुना, भाज्या, अंडी, थोडी सॅलड ड्रेसिंग असा सगळं मांडून ठेवलं आणि आम्ही सर्वानी आपापली सँडविचेस करून घेतली. साधच जेवण होत पण दमल्यामुळे म्हणा किंवा आधी केलेल्या पोरकटपणामुळे म्हणा किंवा आजूबाजूच्या निसर्गचित्रामुळे म्हणा मला तरी ती मेजवानी वाटली. अन्नाची चवपण आपल्या मूडवर अवलंबून असते बहुतेक. 

मग दुपारी शांतपणे मार्गक्रमणा सुरु केली. मग लक्षात आले की आजूबाजूला बर्फ जरी दिसत असले तरी पाण्याची खळखळ ऐकू येत होती. पाणी कुठे दिसत नव्हते. मग एक छोटासा पूल पार करावा लागला तिथे पाण्याचा ओहोळ दिसला. तो पाण्याचा ओहोळ बर्फाच्या खालून वाहत होता. अजिबात कुठे ही काहीही दिसत नव्हते. उन्हाळा सुरु झाल्यामुळे सर्व बर्फ खालून वितळत होते आणि पाणी वाहत होते. आसमंतात खळखळ आवाज भरून राहिला होता पण बर्फाच्या खाली पाणी लपून राहिले होते.

“सांग सख्या रे!” हा संदीप आणि सलीलचा अल्बम माझा फार आवडता आहे. त्यातली एक कविता आठवली.

बर्फाच्या अस्तराखाली वाहत राहावी नदी 

तशी ती ही जागीच असेल 

मला खात्री आहे तिला झोप आली नसेल 

कविता खूप वेळा ऐकली होती. बर्फाचं अस्तर पहिल्यांदा बघत होतो. 

थोडे पुढे गेलो तर अचानक सगळे थांबले. समोर एक हरणांचा कळप होता. हिवाळ्याची मरगळ झटकून उन्हाळ्यात हरणं सहकुटुंब सहपरिवार बाहेर पडली होती. आम्हाला पाहून ती अजिबात बिचकली नाहीत. त्यांना माणसांची सवय असावी किंवा आपल्या हक्कांची जाणीव असावी. आम्ही त्यांच्या इलाक्यात जात होतो. त्यांनी का बिचकावं? आम्ही पण त्यांच्या अस्तित्वाचा मान ठेवत मोठा आवाज ना करता त्यांचे निरीक्षण केले. फ्लॅश बंद करून त्यांचे मनसोक्त फोटो काढले. त्यांचा चालण्यातला डौल, एकमेकांना अंग घासणे, खुरटे गावात शोधात हिंडणे याचे निरीक्षण केले आणि पुढे निघालो.

ट्रेक मध्ये पुढच्या पावलावर काय अनुभव येईल याची तुम्हाला कल्पना पण नसते त्यामुळे क्षणार्धात नवीन अनुभव घ्यायला तयार राहावे लागते. आणि असे २-४ ट्रेक केले की धकाधकीच्या शहरी जीवनातही तुम्हाला ती ऍटिट्यूड साथ देते. 

दिवस मावळती कडे चालला होता. आता आम्ही शांतपणे आपापल्या विचारात मग्न होऊन चालत होतो. माझ्या शेजारी रिषी आणि मागे जितू असे चाललो होतो. अचानक मला आमच्या वाटेपासून १५-२० फूट खाली एक पाण्याचे डबके दिसले. त्या डबक्यात काहीही विशेष नव्हते पण मला एक कल्पना सुचली. 

रिषी ला म्हणलं, “चल त्या डबक्यापाशी जाऊ.”

“कशाला?”

“इन्स्टा क्वालिटी फोटो काढायला.”

त्या डबक्यापाशी गेलो आणि पाण्याच्या अगदी जवळ गेल्यावर समोरच्या पर्वतरांगेचे प्रतिबिंब त्या डबक्यातल्या पाण्यात दिसत होते. पाण्यावर एकही तरंग नव्हता. आम्ही त्या शुभ्र पांढऱ्या डोंगरांचे, वरच्या निळ्या आकाशाचे. त्यातल्या तुरळक ढगांच्या पुंजक्यांचे आणि त्या सगळ्याच्या प्रतिबिंबाचे मनसोक्त फोटो काढले. 

परत येताना रिषी म्हणाला, “शिकलास कि वी-काका तू!”

मी म्हणलं, “मग!! आहेस कुठे. कॉलर ताठ.” 

मी हसलो. त्याला हा वाक्प्रचार गेला नव्हता.

एका दिवसात इन्स्टा क्वालिटी फोटो काढायला शिकलो होतो, शाहरुख पोझ लोकांना शिकवली होती, आवडत्या कवितेचं रसग्रहण केलं होत, मुखवटे भिरकावून पोरकटपण करायला शिकलो होतो आणि लोकांनाही शिकवले होते. एका दिवसात इतक्या गोष्टी ऑफिसमधल्या सगळ्यात जास्त प्रोडक्टीव्ह दिवशी पण नाही होत. 

उन्हं कलली होती, डोंगर उतार चालू झाला होता, पाय थकू लागले होते. आणि स्वित्झर्लंड मधलं अजून एक चित्रासारखं खेडेगाव आमची वाट बघत होतं.




विवेक वैद्य


२ टिप्पण्या:

  1. Inspiring! Enjoyed. Insta quality vs FB quality :-) "आयुष्यात एक वेळ अशी येईल की तुम्हाला बाहेरचे काही दिसणार नाही, ऐकू येणार नाही कशाचा वास येणार नाही. त्यावेळेला तुम्ही मनात खोलवर साठवलेले हे क्षण तुम्हाला साथ देतील." हे खूप आवडलं.

    उत्तर द्याहटवा
  2. फारच सुरेख !! वाचता वाचता मे पण तुमच्यासोबत फिरून आले !!

    उत्तर द्याहटवा