स्थळ : चांगी एअरपोर्ट
काळ: २००८
लाईन नसल्यामुळे झटक्यात इमिग्रेशन करून DFS ला एक छोटी भेट दिली. बेल्टवरून सामान घेतून बाहेर आलो. ओळखीचा चेहेरा काही दिसेना. थोडा वेळ वाट पहिली; पण तो ओळखीचा चेहेरा काही दिसत नव्हता. विमानात बसायच्या आधी सौरभशी बोलणं झालं होत. मला म्हणाला होता मी येतोय घ्यायला आणि तो आला नाही हे फारच त्याच्या नियमात बसण्यासारखं नव्हतं.
फार वेळ न घालवता सरळ टॅक्सी पकडली. आजोबांना पत्ता सांगितल्यावर त्यांनी जाडजूड स्ट्रीट डिरेक्टरी काढली. थोडावेळ त्यात खुडबुड केली आणि म्हणाले ब्बेत्त तू चेक बिफोर. मला काहीच कळलं नाही पण त्यांनी गाडी हाकली म्हणून मी काही बोललो नाही. अपेक्षित जागी सोडल्यावर त्यांना पैसे दिले सामान बाहेर काढलं.आजोबा निघून गेले आणि मी ब्लॉक नंबर शोधायला लागलो. काही केल्या ब्लॉकनंबर सापडेना. थोडं फार इकडेतिकडे फिरून बघितलं आणि मग लक्षात आलं की आजोबांनी मला ॲव्हेन्यू दोन ऐवजी तीन वर सोडले आहे. सगळीकडे पाट्या असल्यामुळे शोधणं अवघड नव्हतं पण बाडबिस्तारा घेऊन, दिवसभराच्या विमानप्रवानंतर इकडून तिकडे जाण म्हणजे मानसिक त्रास जास्त होता.
इच्छित दाराशी आलो आणि त्याला कुलुप नव्हतं. म्हणजे सौरभ घरी आहे तर. विसरला की काय पठ्ठ्या? पण ते ही त्याच्या नियमात बसणार नव्हतं. जाऊदे चुकामुक तर झाली नाही ना. या मी त्यावरच खुश झालो. बेल दाबली पण आतून काहीच हालचाल किंवा आवाज जाणवला नाही. अजून थोडा वेळ बेल दाबत राहिलो; पण दार उघडलं जाण्याची काहीच चिन्हं दिसेनात. काय करावं कळेनासं झालं. परका देश, परके लोक, परके वाटणारे इंग्लिश उच्चार. कंपनीने क्लायंटच्या जीवावर देऊ केलेली राहायची सोय सौरभच्या, मी इथे असताना तू हॉटेलमध्ये राहणार! ह्या एका वाक्यावर नाकारली होती. संभ्रमावस्थेत थोडा वेळ गेला आणि अचानक दार उघडण्याचा आवाज आला. बघतो तर सौऱभ रांगत आला होता दार उघडायला. काय पद्धत ही मस्करी करायची माझं हे वाक्य पूर्ण होण्याआधीच सौरभने दाराशी लोळण घेतली. चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसल्या. मी झटकन पुढे झालो आणि त्याला धरलं आणि म्हणालो काय झालं सौरभ? बोलायला वेळ नाही, ऍम्ब्युलन्सला फोन कर सौरभ अवघडलेल्या अवस्थेत म्हणाला. नंबर मोबाईलमध्ये आहे. मी धावत बेडरूम मध्ये गेलो मोबाईल वरून ऍम्ब्युलन्सला फोन केला. काही मिनिटात ऍम्ब्युलन्स आली. सौरभला स्ट्रेचरवरून गाडीत घातलं. घराला कुलूप लावून मी ही घुसलो त्याच्याबरोबर. गाडीत त्याचा हात हातात घेऊन बसलो.
“मला अपेंडिक्सचा अॅटॅक आलाय”. सौरभ अडखळत म्हणाला. “काल आपण बोललो, माझं जेवण खाणं झालं आणि अचानक पोटात खूप दुखायला लागलं. डॉक्टरकडे गेलो तर तो म्हणाला अपेंडिक्स आहे. त्याने पेनकिलर दिल्या. पणऑपरेशन करून घ्यावं लागेल म्हणाला. घरी आलो पेनकिलर घेतली आणि झोपलो. पहाटेच्या सुमारास असह्य कळा यायला लागल्या. एकदम तीन चार गोळ्या घेतल्या आणि पडून राहिलो.
“पण तेंव्हाच का नाही ऍम्ब्युलन्सला फोन केलास” मला काही कळेना.
“तुझी वाट पाहत होतो मित्रा” सौरभ म्हणाला. “मी जर जाऊन बसलो असतो हॉस्पिटलमध्ये, तर तू काय केलं असतंस? कुठे गेला असतास, कुठे राहिला असतास?”
“वेडा आहेस का”? विजेचा झटका बसावा तसे माझे शब्द बाहेर पडले. “काहीही केलं असतं मी, रस्त्यावर राहिलो असतो. तू कशाला तुझा जीव धोक्यात घातला?” काही उत्तर न देता न बोलता सौरभ शांत पडून राहिला.
हॉस्पिटलमध्ये सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून सौरभला रूममध्ये आणलं. आणि माझा जीव भांड्यात पडला. त्याच्याकडे कॅशलेस इंन्शोरन्स कार्ड असल्यामुळे पैशाच्या काहीअडचणी आल्या नाहीत.
“घरी सांगितलंआहेस ना” मी विचारलं सौरभला.
त्याने नाहीची मुंडी हलवली. “तसेही ते लगेच येऊ शकणार नाहीत. उगीच त्यांना टेन्शन कशाला! हे बघ आता हे मला आणि तुला निस्तरायच आहे.
मी मटकन खालीच बसलो.
“जमेल अरे तुला. माझा विश्वास आहे तुझ्यावर”. सौरभ म्हणाला. एक आडवा आजारी माणूस, उभ्या धट्ट्याकट्ट्या माणसाला धीर देत होता.
रात्र झाली तशी नर्सने मला बाहेर काढलं. सौरभचा मोबाईल माझ्याकडे ठेवून घेतला आणि काही लागलं तर फोन करा अस तीनचार वेळा बजावून मी परत फिरलो.
घरी आलो, अंघोळ केली आणि भूकेची जाणीव झाली. सगळं स्वपाकघर शोधलं. दोनच गोष्टी सापडल्या मॅगीच एक पाकीट आणि मी आणलेली DFS ची बॅग. मॅगी झालं आणि थोडीशी चॉकोलेट झाल्यावर तिथेच सोफ्यावर पडलो नाही कधी झोप लागली कळलंच नाही.
सकाळी क्लायंटच्या ऑफिसमध्ये रिपोर्टींग करायचं होत. त्याआधी सौरभच्या हॉस्पिटलला भेट दिली. मित्राच रात्रीच इमरजेंसी ऑपेरेशन झाल होत. साहेब शुद्धीवर आलेले नव्हते. नर्सकडून ऑपेरेशन चांगलं झाल्याचं कळलं. परत एकदा काही लागलं तर कळवा चा पाढा वाचून मी ऑफिस मध्ये गेलो.
संध्याकाळी घरी जाण्याआधी परत एकदा हॉस्पिटल गाठलं. सौरभ बोलण्याच्या परिस्थितीत होता. हालचाली अतिशय मंद होत्या. छोट्या हालचालींमध्ये वेदना दिसत होत्या. रात्री उशिरा पर्यंत त्याच्या सोबत थांबलो.
पुढचे दोन दिवस हाच दिनक्रम- सकाळी त्याला भेटायचं, दिवसभर ऑफिस, रात्री परत हॉस्पिटल. ह्या काळात हॉस्पिटलच्या स्टाफने त्याची खूप छान काळजी घेतली होती.
खरी परीक्षा होती त्याला घरी आणल्यावर. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी त्याला मदतीची गरज पडत होती. सकाळी लवकर उठून त्याला आवराआवर करायला मदत करण फारस अवघडक नव्हतं, पण त्याच्यासाठी स्वयंपाक करण वाटलं तितकं सोपं नव्हतं. त्याआधी मी कधीच स्वयंपाक केला नव्हता. पण जमेल तसा केलेला स्वयंपाक बिचारा छान आहे म्हणून खात होता. संध्याकाळी परत स्वयंपाक-जेवण करून आम्ही दोघ खाली बागेत चालायला जायचो. दिवसभराचा क्षीण कमी व्हायचा. पुढचा एकआठवडा असाच गेला. हळूहळू सौरभ बरा झाला.
सिंगापूरमधले पहिले दोन आठवडे इतके नाट्यपूर्ण असेल अस मला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. गोष्ट म्हणून लिहिली तर लोक कदाचित विश्वास ठेवणार नाहीत. मागे वळून बघताना गम्मत वाटते, आश्चर्यही वाटत. अचानक अंगावर पडलेलं आव्हान कस निभावून नेलं, कुठून बळ मिळालं असा प्रश्न पडतो.
त्या सगळ्या धुमश्चरकीत सौरभच ते वाक्य आणि ज्यापद्धतीने माझ्याकडेरोखून बघत ते म्हंटल होतं की मला चुकायला, थिजून बसायला परवनगीच नव्हती अस प्रकर्षानी जाणवत.
“जमेल अरे तुला, माझा विश्वास आहे तुझ्यावर”
सत्य घटनेवर आधारीत. ह्या गोष्टीतला मी - तो “मी” नव्हेच!
विश्वास वैद्य
छान लिहिलं आहेस विश्वास 👍
उत्तर द्याहटवावा फारच छान लिहिलंस, मित्रा
उत्तर द्याहटवाMast lihil aahes, Sachin Argade.
उत्तर द्याहटवाVery good Vishvas
उत्तर द्याहटवा